तलवारबाजीसाठी गोव्यातून क्रिश गावकर, श्रीरंग दळवीची निवड

जम्मू येथे १७ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय शालेय खेळ प्रतियोगिता

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
13th November, 12:15 am
तलवारबाजीसाठी गोव्यातून क्रिश गावकर, श्रीरंग दळवीची निवड

पणजी : दि. १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ६८व्या राष्ट्रीय शालेय खेळ प्रतियोगितेसाठी गोव्यातून क्रिश आनंद गावकर आणि श्रीरंग सुदेश दळवी यांची निवड झाली आहे. द गोवा फेंसिन्ग असोसिएशनने (गोवा तलवारबाजी संघटनेने) आयोजित केलेल्या पात्रता फेरीतून सेबर प्रकारात क्रिशची, तर ईपीईई प्रकारात श्रीरंगची गोव्यातून निवड झाली आहे. 

जम्मू येथे होणाऱ्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय खेळ प्रतियोगितेत भाग घेण्यासाठी संपूर्ण गोव्यामधून १० स्पर्धक जाणार आहेत. या टीमसोबत पर्वरी येथील एल. डी. सामंत विद्यालयातील (विद्या प्रबोधिनी) इ. सातवीत शिकणारा क्रिश गावकर आणि इ. आठवीत शिकणारा श्रीरंग दळवी यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा एम. ए. स्टेडियम, भगवती नगर, जम्मू-काश्मीर येथे आयोजित करण्यात आली आहे. 

या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून सुमारे ३५० खेळाडूंचा समावेश असणार आहे. देशभरातील ३५ संघ आपले कौशल्य दाखवून सर्वोच्च सन्मान मिळविण्यासाठी सज्ज होतील. विशेष म्हणजे, ६८ व्या राष्ट्रीय शालेय खेळ हे तरुण खेळाडूंना चमकण्यासाठी आणि त्यांच्या प्रदेशांना अभिमान मिळवून देण्यासाठी एक रोमांचक व्यासपीठ असते.   

दरम्यान, राष्ट्रीय प्रतियोगितेसाठी क्रिश आणि श्रीरंगची निवड झाल्याबद्दल एल.डी. सामंत विद्यालयाच्या मुख्याध्यपिका डॉ. नीता साळुंके आणि सर्व शिक्षक वर्गाने त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.