बीसीसीआयसोबत संबंध तोडल्यास याचा आयसीसीला मोठा फटका बसण्याची शक्यता
नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरुन जोरदार चर्चा सुरु असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं टीम इंडिया चॅम्पियन्स ट्राफीसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे आयसीसीला कळवले आहे.आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ईमेलद्वारे कळवले असून त्यामध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला येणार नाही, हे सांगण्यात आले आहे.
आता हे प्रकरण पाकिस्तान सरकार पर्यंत पोहोचले असून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाकिस्तानमधील सरकारसोबत आता यावर चर्चा करणार आहे. पाकिस्तान सरकारने आयसीसी स्पर्धाच नाही, तर बीसीसीआयशी क्रिकेट संबंध तोडण्यास सांगितले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठे पाऊल उचलणार अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयसोबत संबंध तोडल्यास याचा आयसीसीला मोठा फटका बसू शकतो. कारण भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यातून आयसीसीला सर्वाधिक महसूल मिळतो.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील राजकीय संबंध पाहता बीसीसीआयने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होण्यास पाठवायचे की नाही याबाबतचा निर्णय भारत सरकारवर सोपवला आहे.भारताने २००८ नंतर पाकिस्तानसोबत द्वीपक्षीय मालिका खेळलेली नाही. भारताने गेल्या १७ वर्षात पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. मात्र, पाकिस्तानची टीम आशिया कप आणि आयसीसीच्या स्पर्धा खेळण्यासाठी भारतात आली होती.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भारत सरकारची भूमिका पाहता आगामी काळात आयसीसीच्या स्पर्धेत भारताविरुद्ध एकही मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.