सातवी सरसांगण सुपर सीरिज क्रिकेट स्पर्धा
पणजी : सातव्या सरसांगण सुपर सीरिज क्रिकेट २०२४-२५ स्पर्धेच्या दुसर्या दिवशी एमएलटी क्रिकेट क्लबने सिंक रेंजर्सचा ५ गडी व १४ चेंडू राखून पराभव केला. आर्लेम क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळविण्यात आला. दिवसातील दुसर्या सामन्यात विमसन पणजी पॉवरप्ले संघाने डीएनएस-व्हीएमजे रुकीजवर ६ गडी व ५.३ षटके राखून विजय मिळविला.
एमएलटी क्रिकेट क्लब वि. सिंक रेंजर्स सामन्यात प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर सिंक रेंजर्सने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या. यामध्ये सनथ म्हापणे (नाबाद ३६, २४ चेंडू, १ चौकार, २ षटकार), पराशर पै खोतने २६ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह ३५ धावा केल्या. स्मित दळवी (२१ धावा, २० चेंडू, १ चौकार), सचिन केंकरे (११) व संप्रभ फळदेसाईने १५ धावांचे योगदान दिले. एमएलटीकडून अनीश पै काकोडे याने १३ धावांत १ गडी बाद केला. सिद्धेश बोडके, शशांक केंकरे, सचिन सरदेसाई व मनीष पै काकोडे यांनी देखील प्रत्येकी १ विकेट मिळवली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना एमएलटीने १७.४ षटकांत ५ बाद १४९ धावा करत त्यांनी विजयी लक्ष्य गाठले. अच्युत नाईक दलाल (३३ धावा, ३० चेंडू, ४ चौकार) व सिद्धेश सिनाय आमोणकर (१८ धावा, १४ चेंडू, १ षटकार), मनीष पै काकोडे (४० धावा, १७ चेंडू, ४ चौकार, २ षटकार), साईश प्रभुदेसाई याने २१ धावांचे योगदान दिले. रेंजर्सकडून नीलय नाईक दलाल याने १९ धावांत ३ गडी बाद केले. कौशिक पै फोंडेकर व साहील अडवलपालकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मनीष पै काकोडेला सामनावीर, सनत म्हापणेला सर्वोत्तम फलंदाज, नीलय नाईक दलालला सर्वोत्तम गोलंदाज घोषित करण्यात आले.
विमसन पणजी पॉवरप्ले वि. डीएनएस-व्हीएमजे रुकीज सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डीएनएस-व्हीएमजे रुकीज संघाने निर्धारित २० षटकात त्यांना केवळ ८ बाद ९६ धावा केल्या. यामध्ये सुकृत पै (४), ईशान कामत ३३ चेंडूंत ३५ धावा तर शिवम वारिक (११) धावा केल्या. विमसनकडून सिद्धांत कुंदेने ५ धावांत २ गडी बाद केले. अनुराग बोरकर याने १६ धावात २, प्रथम प्रभुगावकर याने २२ धावांत २, वृषभ कुंकळ्येकरने ३ धावांत १ व प्रणव कामतने १२ धावांत १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विमसन पणजीने १४.३ षटकांत विजयी लक्ष्य प्राप्त केले. प्रसाद भेंडे (१९ धावा, २१ चेंडू, १ चौकार) व शिराज पै खोत (१५ धावा, २२ चेंडू, २ चौकार), वर्धन प्रभू मिस्किन (नाबाद ३० धावा, २३ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) व प्रणव कामतने नाबाद १९ धावांचे योगदान दिले. रुकीजकडून वेद म्हांबरे याने १९ धावांत १ गडी बाद केला. प्रणव कामतला सामनावीर, ईशान कामतला सर्वोत्तम फलंदाज, तर सिद्धांत कुंदेला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून घोषित करण्यात आले.