आरसीसी-साल्व्हादोर द मुंदला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद

आरसीसी पेडे द्वितीय तर आरसीसी फातोर्डाला तृतीय क्रमांक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
11th November 2024, 11:16 pm
आरसीसी-साल्व्हादोर द मुंदला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद

पणजी : गोवा हौशी बॉक्सिंग असोसिएशनतर्फे बॉक्सिंग हॉल, पेडे येथे ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित ऑल-गोवा सब ज्युनियर आणि ज्युनियर मुले आणि मुली राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप शनिवारी यशस्वीरित्या पार पडली. ६ सुवर्ण आणि ९ रौप्य पदकांसह आरसीसी साल्वादोर द मुंदोने ३६ गुणांसह चॅम्पियनशिप जिंकली.
या स्पर्धेत राज्यभरातील ११ केंद्रांवरून १२२ बॉक्सर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ७ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांसह आरसीसी पेडे द्वितीय तर आरसीसी फातोर्डा ७ सुवर्ण आणि १ रौप्य पदकांसह तृतीय क्रमांकावर आला.
यावेळी अध्यक्ष फ्रान्सिस व्हिएगस म्हणाले, सब ज्युनियर आणि ज्युनियर स्टेट चॅम्पियनशिपमध्ये गोव्यातील १२२ बॉक्सर्सचा विक्रमी सहभाग होता. अलीकडच्या काही महिन्यांत, विशेषत: वास्को आणि फोंडा येथे केंद्रे उघडल्यानंतर बॉक्सरच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आम्ही मडगावमध्ये प्रशिक्षण सुरू केले आहे आणि आमच्या टॅलेंट पूलचा विस्तार करण्यासाठी विविध ठिकाणी बॉक्सिंग सुरू करण्यासाठी माजी बॉक्सर्सना प्रोत्साहित करत आहोत. तथापि, युवा प्रतिभेच्या या मोठ्या समूहाला प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी आणि जिंकण्याचे लक्ष्य आहे.
गोवा हौशी बॉक्सिंग असोसिएशन १५ नोव्हेंबरपासून दर शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता बॉक्सिंग हॉल पेडे येथे ३८ व्या राष्ट्रीय खेळांच्या तयारीसाठी आणि पात्रता मिळविण्यासाठी संपूर्ण गोवा राज्यातील बॉक्सर्सना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नियमित सरावसत्र आयोजित करणार आहे. ही स्पर्धा जानेवारी ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उत्तराखंडमध्ये होणार आहे.
स्पर्धेतील इतर विजेते
इतर बक्षिसे: सब कनिष्ठ श्रेणी: सर्वोत्कृष्ट बॉक्सर : मुलगे: वीर राणा-(आरसीसी पेडे), प्रॉमिसिंग बॉक्सर : मुलगे : शौर्य पांचाळ, सर्वोत्कृष्ट बॉक्सर : मुलगी: सुमन पाटील (साई पेडे), प्रॉमिसिंग बॉक्सर : लक्ष्मी लमाणी, कनिष्ठ श्रेणी : सर्वोत्कृष्ट बॉक्सर : मुलगा: साहिल शुक्ला (आरसीसी पेडे), प्रॉमिसिंग बॉक्सर - मुलगे : रौनक निंबोरिया (आरसीसी-एसडीएम), सर्वोत्कृष्ट बॉक्सर : मुली: रेहाना आलम (आरसीसी पेडे), प्रॉमिसिंग बॉक्सर-मुली: शगुन शिंदे (आरसीसी-एसडीएम).