टीम इंडिया दोन बदलांसह उतरणार मैदानात

द. आफ्रिकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना : भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
13th November 2024, 12:12 am
टीम इंडिया दोन बदलांसह उतरणार मैदानात

सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळणार आहे. रविवारी झालेल्या सामन्यात यजमानांनी सूर्यकुमार यादवच्या संघाचा तीन विकेट राखून पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. आता भारतीय संघाला या सामन्यात पुनरागमन करावे लागणार आहे.
तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे. मागील सामन्यात संपूर्ण संघ अपयशी ठरला होता. भारताच्या चिंतेचे कारण म्हणजे त्याच्या फलंदाजांचा खराब फॉर्म. दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांमुळे भारतीय संघाला ६ बाद १२४ धावाच करता आल्या. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आणि मालिका बरोबरीत आणली. आता भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल, तर मालिकेतील तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे.
सलामी जोडी बदलणार?
या मालिकेसाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीला डावाची सुरुवात करताना दिसून आले होते. संजूने पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर माघारी परतला. तर दुसरीकडे अभिषेक शर्मा दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. पहिल्या सामन्यात तो ४ धावांवर माघारी परतला. तर दुसऱ्या सामन्यात त्याला अवघ्या ७ धावा करता आल्या. ही जोडी फ्लॉप ठरली असली तरीदेखील या तिसऱ्या सामन्यासाठी सलामी जोडीत कुठलाही बदल केला जाणार नाही. तर कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
रमनदीप, वैशाकला मिळणार संधी
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर, भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नाही. फलंदाजांनी एकापाठोपाठ एक रांग लावली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. तिसऱ्या सामन्यासाठी अष्टपैलू रमनदीप सिंग आणि गोलंदाज विजय कुमार वैशाकला संधी दिली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत रमनदीपने शानदार अष्टपैलू कामगिरी केली होती. तर गेल्या सामन्यात धावांचा बचाव करताना आवेश खान महागडा ठरला होता. त्यामुळे त्याला या सामन्यातून विश्रांती देऊन वैशाकला संधी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
द. आफ्रिकेच्या अनुभवी खेळाडूंवर नजर
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम, डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केलेला नाही. तर गेराल्ड कोएत्झी यांनी दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीस संघाला विजय मिळवून दिला. आता अनुभवी फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे.
वरुण, बिश्नोईकडून घातक गोलंदाजीची अपेक्षा
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने डरबनमध्ये २५ धावांत १ गडी बाद केेला होता पण दुसऱ्या सामन्यात त्याने ४१ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. त्याने तिसऱ्या आणि चौथ्या षटकात २८ धावा दिल्या ज्यात ट्रिस्टन स्टब्सने चार चौकार मारले. त्यालाही आपली कामगिरी सुधारावी लागेल अन्यथा यश दयाल किंवा विशाक विजयकुमार यांना संधी मिळू शकते. गेल्या सामन्यात ५ बळी घेणाऱ्या वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन 

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रमनदीप सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, विजय कुमार वैशाक, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका : रयान रिकेल्टन (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कप्तान), डेविड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले सिमलेन, केशव महाराज, नकाबायोमजी पीटर, गेराल्ड कोएत्जी