भारताचा आफ्रिकेवर विजय

सॅमसनचे वादळी शतक : ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
09th November, 12:31 am
भारताचा आफ्रिकेवर विजय

डर्बन : डर्बनमधील किंग्समेड मैदानात भारतीय फलंदाजांकडून वादळी खेळ पाहायला मिळाला. टी२० वर्ल्ड कप फायनलनंतर पहिल्यांदाच भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ टी२०मध्ये आमने-सामने आले होते. या दोन संघात शुक्रवारी पहिला टी२० सामना खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ६१ धावांनी जिंकला.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद २०२ धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले हाेते. मात्र आफ्रिकेचा संघ १७.५ षटकांत सर्वबाद १४१ धावाच करू शकला. या सामन्यात संजू सॅमसनने खणखणीत शतक ठोकले. मात्र, त्याच्या विकेटनंतर दक्षिण आफ्रिकेने झटपट विकेट्स घेतल्याने भारताला आणखी मोठी धावसंख्या उभारता आली नाहीत.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनीही चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. सॅमसनने आक्रमकच सुरुवात केली, मात्र चौथ्या षटकात अभिषेक शर्माने ७ धावांवर विकेट गमावली. त्याला गेराल्ड कोएत्झीने बाद केले. पण त्यानंतर सॅमसनला कर्णधार सूर्यकुमार यादवने साथ देत अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या ९ षटकातच भारताला ९० धावांचा टप्पा पार करून दिला होता. परंतु, सूर्यकुमार मोठा फटका मारण्याच्या नादात २१ धावांवर बाद धाला. त्याला पॅट्रिक क्रुगरने बाद केले. सूर्यकुमारने १७ चेंडूत २१ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतरही तिलक वर्मा सॅमसनला तोलामोलाची साथ देत होता. सॅमसनची बर्थडे बॉय तिलकसोबतही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. या दरम्यान, सॅसमनने शतकही केले. पण १५ व्या षटकात तिलकला केशव महाराजने मार्को यान्सिनच्या हातून झेलबाद केले. तिलकने १८ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. याच्या पुढच्याच षटकात संजू सॅमसनचा अडथळा एनकाबायोम्झी पीटरने दूर केला. त्याचा झेल ट्रिस्टन स्टब्सने घेतला. सॅमसनने ५० चेंडूत १०७ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १० षटकार मारले. हे त्याचे सलग दुसरे शतक असल्याने सलग दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात शतक करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. दरम्यान, सॅमसन बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या (२), रिंकु सिंग (११), अक्षर पटेल (७) आणि रबी बिश्नोई (१) यांनी झटपट विकेट गमावल्या. सॅमसनचा अपवाद वगळता भारताच्या इतर ८ फलंदाजांनी मिळून ७३ चेंडूत ८७ धावा केल्या. तसेच ८ धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे भारताला २०० धावांचा टप्पा पार करता आला.

दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झीने ३ विकेट्स घेतल्या, तर मार्को यान्सन, केशव महाराज, एनकाबायोम्झी पीटर आणि पॅट्रिक क्रुगर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

संजू आता सलग दुसऱ्या सामन्यात टी-२० शतक झळकावत भारतासाठी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. आता तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत केएल राहुलसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव प्रत्येकी चार शतकांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १७.५ षटकांत सर्वबाद १४१ धावाच करू शकला. आफ्रिकेतर्फे क्लासेनने सर्वाधिक २५ धावा केल्या. तर सलामीवीर रायन रिकेल्टनने २१ व जेराल्ड कोएत्झीने २३ धावांचे योगदान दिले. या व्यतिरिक्त आफ्रिकेचा एकही फलंदाज  भारतीय गोलंंदाजी समोर टिकाव धरू शकला नाही. 

भारतीय संघातर्फे वरुण चक्रवर्तीने २५ धावांत ३ गडी तर रवी बिश्नोईने २८ धावांत ३ गडी बाद केले. तर आवेश खानने २८ धावांत २ व हार्दिक पांड्याने २५ धावांत १ गडी बाद केला. अशा प्रकारे आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव करून भारतीय संघाने ४ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी, १० रोजी गक़ेबरहा येथे खेळविण्यात येणार आहे.

संजूची लागोपाठ दोन शतके

संजू सॅमसनने बांगलादेशविरूद्धच्या टी-२० सामन्यात पहिले टी-२० शतक झळकावले होते. आता संजूने सलग पुढच्याच सामन्यात आफ्रिकेविरूद्ध दुसरे शतक झळकावत कोणालाही जमली नाही अशी कामगिरी करून दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२०क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यांमध्ये शतकं झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला ही कामगिरी करता आली नव्हती. सलग दोन टी-२० सामन्यात शतके झळकावणारा संजू एकूण चौथा खेळाडू ठरला आहे. त्याने गुस्ताव्ह मॅकॉन, रायली रूसो, फिल सॉल्ट यांची बरोबरी केली आहे.

लागोपाठ दोन शतके झळकवणारे खेळाडू

फ्रान्स – गुस्ताव मॅकॉन, २०२२

द.आफ्रिका – रायली रुसो, २०२२

इंग्लंड फिल सॉल्ट – २०२३

भारत – संजू सॅमसन, २०२४

सर्वाधिक षटकार लगावणारा संयुक्त भारतीय फलंदाज

संजू सॅमसनने आफ्रिकेविरूद्धच्या १०७ धावांच्या खेळीत सर्वाधिक १० षटकार लगावत रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने २०१७ मध्ये इंदोरमध्ये झालेल्या श्रीलंकाविरूद्धच्या सामन्यात एका खेळीत १० षटकार लगावले होते. यासह संजूने रोहित शर्माची बरोबरी केली आहे.