पंचमहाभूते संतुलित ठेवू

जागतिक तापमानवाढीमुळे असंतुलित होणारे अग्नी तत्व, पाण्याचा दुष्काळ, बर्फवृष्टी, अतिवृष्टीमुळे बिघडणारे जल तत्व, वादळ-वाऱ्यामुळे असंतुलित वायू तत्व, भूकंप, भूस्खलनामुळे बिघडणारे पृथ्वी तत्व, ढगफुटीमुळे असंतुलित आकाश तत्व सृष्टीचे संतुलन बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे.

Story: साद निसर्गाची |
10th November 2024, 03:40 am
पंचमहाभूते संतुलित ठेवू

सृजनकर्त्याने सृष्टीची निर्मिती करताना पशु-पक्षी, वातावरण, वन्यजीव, ग्रह, वनस्पती, मानव, प्राणी, तारे अशा कित्येक सजीव व निर्जीव घटकांची निर्मिती केली. हे सर्व घटक पंचमहाभूतांपासून निर्माण करण्यात आले. पंचमहाभूतांमध्ये क्षिति (पृथ्वी), आप (जल), तेज (अग्नि), पवन (वायु) आणि आकाश (अंतराळ) या पाच मूल तत्त्वांचा समावेश केला गेला. या घटकांनी सृष्टीचे संंतुलन न बिघडवता गुण्यागोविंदाने नांदावे म्हणून प्रत्येक घटकामागे कोणत्या पंचमहाभूतांचे किती प्रमाण असावे याची नियमावली बनविण्यात आली.

ज्याप्रमाणे ही सृष्टी पंचमहाभूतांनी नटली आहे त्याचप्रमाणे या सृष्टीतील घटकांमध्येही पंचमहाभूतांचे अस्तित्व सामावण्यात आले. आरोग्यशास्त्रानुसार मनुष्याच्या शरीरात ७२% जल तत्त्व, १२% पृथ्वी तत्त्व, ६% वायु तत्त्व, ४% अग्नी तत्त्व व ६% आकाश तत्त्वाचे संतुलित प्रमाण असते. पृथ्वी तत्त्व शरीरामध्ये नवीन पेशी तयार करण्याचे काम करते. अग्नी तत्त्व अन्न पचनाचे काम तर रक्ताभिसरणाचे कार्य आप तत्त्व करते. वायु तत्त्व श्वसनक्रियेचे कार्य करते. आकाश तत्त्व मन ताब्यात ठेवण्यास मदत करते. 

सनातन शास्त्रामध्ये पूजा-अर्चा करताना किंवा सृजनकर्त्याला नैवेद्य दाखवताना हाताच्या बोटांनी केलेल्या मुद्रा मनुष्याचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करत. हाताचा अंगठा अग्नि तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो तर करंगळी जल तत्त्वाचे. तर्जनी वायु तत्त्वाशी निगडित आहे. हाताचे मधले बोट आकाश तत्त्वाचे तर अनामिका पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. दासबोधात पंचमहाभूतांचा उल्लेख करताना स्वामी रामदास म्हणतात, 

जे जे जड आणि कठीण। ते ते पृथ्वीचे लक्षण।
मृद आणि वोलेपण। तितुके आप।
जे जे उष्ण आणि सतेज। ते ते जाणवे पै तेज।
आता वायोही सहज निरोपिजे। चैतन्य आणि चंचळ। तो हा वायोजि केवळ।
मुख्य आकाश निश्चळ।आकाश जाणावे।

माणसाच्या शरीरात पंचमहाभूतांचे बिघडलेले संतुलन विविध व्याधींना निमंत्रण देते.

हे जग, ही सृष्टी म्हणजे एक मोठे कुटुंब. सृष्टीचा निर्माता हा कुटुंबाचा प्रमुख. निर्सगातील प्रत्येक घटकाने सृष्टीचे संतुलन सांभाळत आपले जीवन व्यतीत करावे यासाठी कुटुंब प्रमुखाने कुटुंबातील सदस्यांसाठी आवश्यक अशी नियमावली बनवली. प्रत्येक घटकाने सृष्टीच्या संवर्धनासाठी झटावे यासाठी प्रत्येक घटकाला एकमेकांवर अवलंबून ठेवण्यात आले, जेणेकरून हे सर्व घटक एकमेकांशी संघर्ष केल्याशिवाय मिळून-मिसळून गुण्यागोविंदाने नांदतील. 

नियमानुसार, मनुष्यप्राणी हा ससा, रानडुक्कर, रानकोंबडी, साळिंदर यासारख्या रानटी प्राण्यांची शिकार करून, रानभाजी-पाला खाऊन आपला उदरनिर्वाह करु लागला. मोठ्या प्राण्यांनी छोट्या प्राण्यांवर ताव मारावा. वनस्पती, झाडे- झुडुपे खाऊन छोट्या प्राण्यांनी आपले जीवन व्यतीत करावे अशी नियमावली आखण्यात आली. वनस्पतीने सूर्य प्रकाशाच्या मदतीने आपले जेवण तयार करावे व त्यावर संपूर्ण जगाने अवलंबून रहावे अशी रचना होती. 

मनुष्याच्या वाट्याला बौद्धिक संपदा जोडलेली असल्याने आज मनुष्य स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजू लागला आहे. निर्माणकर्त्याने बनवलेले सारे नियम मोडून स्वतःच्या स्वार्थापोटी प्राण्यांशी संघर्ष, वन्यजीवाशी वैर, ग्रह-ताऱ्यांवर अतिक्रमण, पशु-पक्षांवर अत्याचार इत्यादी अनावश्यक बाबीमध्ये आपले समाधान शोधू लागला आहे.

संस्कृत भाषेत ‘अति सर्वत्र वर्जयेत’ अशा आशयाची एक म्हण प्रचलित आहे. भौतिक सुखांच्या मागे धावणारा मनुष्य नेमके हेच विसरत चालला आहे. सृष्टीच्या निर्मात्याने आखलेल्या नियमांना पायाशी तुडवत बुद्धी कौशल्याच्या जोरावर जग जिंकू पाहणारा मनुष्य दिवसेंदिवस सृष्टीचा नाश करण्याच्या दिशेने वाटचाल करु लागला आहे. ‘विनाशकाले विपरित बुद्धिः’ मुळे पंचतत्त्वे असंतुलित होऊन नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण देत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे असंतुलित होणारे अग्नी तत्त्व, पाण्याचा दुष्काळ, बर्फवृष्टी, अतिवृष्टीमुळे बिघडणारे जल तत्त्व, वादळ-वाऱ्यामुळे असंतुलित वायू तत्त्व, भूकंप, भूस्खलनामुळे बिघडणारे पृथ्वी तत्त्व, ढगफुटीमुळे असंतुलित आकाश तत्त्व सृष्टीचे संतुलन बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे. हे असेच चालू राहिल्यास संपूर्ण पृथ्वीतलावर हाहाकार माजेल. त्यासाठी आपण सर्वांनी सजग होण्याची आवश्यकता आहे. 

नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे, पाण्याची बचत, मृतिकेची सुपीकता राखणे, जैवविविधतेचे रक्षण करणे, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण यासारख्या गोष्टींवर भर द्यावा. पंचमहाभूतांचे संतुलन सांभाळले तरच निसर्गाचे संवर्धन करणे शक्य होईल. निसर्गाचे संवर्धन केले तरच आपले आरोग्य सुदृढ राहील. म्हणूनच पंचमहाभूतांंना संतुलित ठेवण्यासाठी आपण सर्वजण सजग  होऊया.


- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)