श्रद्धा गवंडी

श्रध्दा गवंडी ह्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत. कोवळ्या वयात त्यांनी नृत्य, नाट्य, काव्यलेखन, सूत्रसंचालन, निवेदन यात आपला ठसा उमटविला. वाढत्या वयात नाटकांचे सुमारे पाचशेहून अधिक प्रयोग केले.

Story: प्रेरक सर्जक |
10th November, 03:35 am
श्रद्धा गवंडी

ती रंगमंचावर उभी राहिली की, वाटतेय ती आपल्या वाट्याला आलेली भूमिका खरोखरच जगत आहे. नाटकाची आवड तिच्या नसानसात भिनलेली असून मराठी संगीत नाटकांनी तिला तिच्या तेराव्या वर्षापासून आकृष्ट केलेले आहे. आज हीच नाटके तिचा श्वास झालेली आहेत. एका बाजूला अभिनय तर दुसऱ्या बाजूने लेखन यांना समांतरपणे पुढे नेताना गोव्याच्या नाट्य, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात तरुण वयात भरारी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्रद्धा भानुदास गवंडी. अकरावीत असताना तिने लेखनाला सुरुवात केली. त्यासाठी निमित्त ठरले ते एका कार्यशाळेचे. नृत्य, नाट्य, लेखन यासारखे अनेक विषय त्यात होते. कथालेखन कसे करायचे यावर मार्गदर्शन होते. या कार्यशाळेत एका शालेय मुलीने कथा लिहिली. तिला सर्वांनी शाबासकी दिली. येथेच कोठेतरी श्रध्दा यांच्या मनात लेखनाची सूक्ष्म ऊर्मी जागी झाली. त्या निरागस वयाला वाटले की अरे आपणही काहितरी लिहावे, म्हणजे आपल्यालाही शाबासकी मिळेल. शब्द मनात असतात. संवेदनशील मन सतत नवनवीन गोष्टींचा वेध घेत असते. परंतु त्याला अभिव्यक्तीची योग्य जागा सापडत नसते. इथे श्रद्धा यांनी मात्र स्वतःच्या मनाचा कौल घेतला. मी ही लिहू शकते... असा विचार करून कविता लिहिली... आणि पुढे त्या लिहितच राहिल्या. श्रद्धा गवंडी यांचा जन्म पेडणे तालुक्यातील पार्से गावचा. कलेची पार्श्वभूमी त्यांना घरातूनच मिळाली. संपूर्ण कुटुंब मूर्तिकलेत रंगणारे. चतुर्थीच्या दिवसात वडील भानुदास, आई बिंदीया आणि स्वत: श्रद्धा मातीपासून गणपतीच्या मुर्त्या घडवून त्यांना रंगवणे, आकार देणे यातच व्यस्त. शिक्षण... नृत्य, अभिनय आणि लेखन असा त्यांचा प्रवास सुरु झाला. तरुण वयात कविता लिहिली जाते ती प्रेमाची असे बऱ्याच जणांचे मत असते. परंतु श्रद्धा यांच्या कवितांतून सभोवताल डोकावतो. आपल्या मातीत होऊन गेलेली थोर व्यक्तिमत्त्वं, मनाला सतत खुणावणारे त्यांचे भव्यदिव्य व्यक्तिमत्त्व त्यांना नेहमीच प्रेरणा देत राहिलेली आहेत. त्या लिहितात...

घडविले शिवबास ज्यांनी, संस्कार नी परंपरेच्या घरी
ताठ मानेने जपले ज्यांनी, एक भगवे तोरण दारी
स्वाभिमानी माता साजे, स्वराज्याची खरी आई
भाग्य उजळले प्राक्तनी, रयतेची निगा ती राखी

या शब्दांतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचा उदात्त भाव आहेच शिवाय जिजाबाई सारखी कणखर करारी बाण्याची आई असणे यातूनही आपल्या देशातील स्त्रियांची कर्तृत्ववान परंपरा अधोरेखित करताना हृदय अभिमानाने भरून येतानाची भावना ही तेवढ्याच आदराने व्यक्त होते.

धन्य ती माऊली ज्यांनी, भगव्याची शान राखली
संकट लाख येता पुढ्यात, ढाल होवून ती झिजली
शत शत प्रणाम अर्पिते, कल्याणकारी रयतेच्या आई
घडविण्या एक शिवबा नवा, पुन्हा पुन्हा जन्माव्या जिजाबाई

शालेय जीवनात साहित्याचे बीज अंकुरत होते खरे, परंतु त्याला व्यासपीठ आणि प्रेरक शब्दांची आश्वासक थाप मिळाली ती महाविद्यालयीन जीवनात. सेंट झेवियर महाविद्यालय म्हापसा येथे प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेतला आणि तेथे भेट झाली ती प्रा. डॉ. वृंदा केळकर मॅडमची. युवा साहित्य संमेलने, महाविद्यालयातील साहित्यिक उपक्रम, इतर अनेक ठिकाणी होणारी साहित्य संमेलने, काव्यसंमेलने इत्यादी उपक्रमात सहभागी होण्यासाठी केळकर मॅडमनी प्रेरित केले... वेळोवेळी मार्गदर्शनही केले त्यामुळे माझी साहित्याची खास करून कविता लेखनाची रुची वाढली. मला अस्वस्थ करणारे विषय मी माझ्या कवितेतून मांडते. कवितेला तसा कोणताच विषय वर्ज्य नाही. एखादा बरा वाईट अनुभव सतत मनात असतो. त्यालाच शब्दांचा आकार प्राप्त होतो. मुलगी... स्त्री म्हणून जगताना काही प्रश्न... समस्या जाचत... बोचत... टोचत असतात. त्याची कळ कोठेतरी आत सलत असते. परंतु ती कलेच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे जेव्हा आविष्कृत होते तेव्हा खूप मोकळं वाटतं, असेच त्यांचे मत आहे. मुळात श्रध्दा गवंडी ह्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत. कोवळ्या वयात त्यांनी नृत्य, नाट्य, काव्यलेखन, सूत्रसंचालन, निवेदन यात आपला ठसा उमटविला. वाढत्या वयात नाटकांचे सुमारे पाचशेहून अधिक प्रयोग केले. गोमंतकीय कलाकारासोबत तर काम केलेच शिवाय चारुदत्त आफळे, गौरी पाटील, सिद्धी बोंद्रे या कलाकारांबरोबर ही काम केले. २०१६ साली इफ्फित प्रदर्शित झालेल्या ‘दिशा’या चित्रपटातही काम केलेले आहे. एका बाजूला सुरुवातीपासून त्यांना कविता जवळची वाटत होतीच, तर दुसऱ्या बाजूने नाटकाची सर्व अंगे नेपथ्य, पार्श्वगायन, संगीत, नृत्य यातही त्यांचा सहभाग उत्स्फूर्त राहिलेला आहे. रिमा गडकरी, जान्हवी बोन्द्रे यांच्याकडून भरतनाट्याचा पाया शिकून घेतला. कै. विजयकुमार नाईक यांचे हंस संगीत नाट्यमंडळ असो की इतर नामांकित संस्थाच्या नाटक, एकांकिकामधून काम केले... एकांकिका लिहिल्या... त्या दिग्दर्शित केल्या आणि पारितोषिके ही प्राप्त केली. कला अकादमी ‘अ’ गट नाट्यस्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक, यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविता तसेच इतर, दिगग्ज कवींच्या आवडलेल्या कवितांचे सादरीकरण केले. इनक्रेडिबल गोवा नियतकालिका मधील मुलाखत, आकाशवाणी, दूरदर्शन वरील कार्यक्रम, साहित्य संमेलनामधील सहभाग... अशा असंख्य उपक्रमात सातत्याने सहभागी होत स्वतःला उन्नत केलेले आहे.

काहीतरी घडतंय इथे, सिंहाचा छावा, शंभूराजे, तळहातावरच्या नाजूक रेषा, तुका अभंग अभंग अशा अनेक नाटकातून काम केलेले आहे. अनुबंध, राष्ट्रीय कला गौरव असे सन्मान पुरस्कार प्राप्त झालेले असून राज्य, राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होत शोधनिबंध सादर केलेले आहेत.

गोवा, महाराष्ट्र कर्नाटक राज्यातही त्यांनी स्वतःच्या साहित्यिक, सांस्कृतिक कौशल्याचे वेगळेपण निर्माण केले. त्यांच्या या कामाची दखल विविध वर्तमानपत्रांनी जशी घेतलेली आहे तशीच ती निवृत्ती शिरोडकर यांच्या रंगसम्राज्ञी या पुस्तकातूनही घेण्यात आलेली आहे. नोकरी, संसार आणि साहित्यिक उपक्रम, नाटकात सहभाग या सर्व गोष्टी आजही एका स्त्री कलाकारांसाठी साध्या सोप्या निश्चितच नाहीत. त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. इथे जिद्द हवी. ही अशी जिद्द, आत्मविश्वास, स्पष्टपणा श्रध्दा गवंडी यांच्याकडे आहे. अर्थात यामागे आईवडिलांचे आशीर्वाद आहेतच शिवाय पती गजेश यांची आश्वासक सोबत आणि श्रद्धा यांची कष्ट करण्याची क्षमताही आहेच. प्रथम उच्च माध्यमिक विद्यालय तसेच आता चौगुले महाविद्यालयात शिकविताना मुलांमध्ये ही साहित्यिक मूल्ये रुजविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक संस्थांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात त्या स्वतः मुलांना सोबत घेऊन सहभागी करून घेत त्यांना प्रेरणा देतात. अनेक सांस्कृतिक साहित्यिक उपक्रमात व्यस्त असूनही त्यांनी स्वतःच्या आतील शिक्षक सतत जागृत ठेवलेला आहे. आयुष्याच्या वळणावरील हेच शिक्षक सात्विक साद असतो.

मातीच्या आकारात रंगलेला
पक्का कुंभार तो शिक्षक
पाषाणी पाझरात फुटलेला
कसाचा शिल्पकार शिक्षक
सुरेल मैफलीत वर्गाच्या
स्वर स्तब्ध तो शिक्षक
प्रतिभेच्या क्षणी निर्मिलेला
माझ्या कवितेचा शब्द होतो शिक्षक...

अनुभव... निरीक्षण शक्ती, माणसांचा संग्रह, भ्रमंती इत्यादीमुळे जीवन जाणिवा रुंदावत जातात... जीवनात पुढे काय करायचे आहे हे एकदा पक्के ठरवले की पावलं डगमगत नाहीत... विस्तारत जाणारे आकाश अशा कृतिशीलतेला सर्जकतेचे पंख बहाल करण्यास नेहमीच सज्ज असते.


- पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)