टॉप १० पैकी ६ देणगीदारांनी त्यांच्या CSR(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत शिक्षणक्षेत्रातील विकासासाठी देणग्या दिल्या.
नवी दिल्ली : एचसीएलचे सह-संस्थापक शिव नाडर हे देशातील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. शिव आणि त्यांच्या कुटुंबाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात २,१५३ कोटी रुपयांची देणगी दिली. हिशेबानूसार ५.९० कोटी रुपये रोज दान करण्यात आले. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलांथ्रोपी लिस्ट २०२४ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
गुरुवार, ७ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या या यादीत नाडर कुटुंब पहिल्या क्रमांकावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंबानींनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल ४०७ कोटी रुपयांची देणगी दिली. तर बजाज कुटुंबाने ३५२ कोटी रुपयांची देणगी देऊन यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. कुमार मंगलम बिर्ला यांनी ३३२ कोटींची देणगी दिली असून ते चौथ्या स्थानी आहे. गौतम अदानी यांनी ३३० कोटींची देणगी दिली असून ते पाचव्या स्थानी आहेत.
नंदन निलकेणी यांनी ३०७ कोटी रुपयांचे दान दिले आहे, ते सहाव्या स्थानी आहेत. कृष्णा चिवुकुला यांनी २२८ कोटींचे दान दिले असून ते सातव्या स्थानी आहेत. अनिल अग्रवाल अँड फॅम.ने १८१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे व ते आठव्या स्थानी आहेत. सुस्मिता आणि सुब्रतो बागची यांनी यादीत नववे स्थान पटकावले असून १७९ कोटी रुपयांचे दान दिले आहे. दहाव्या क्रमांकावर रोहिणी नीलकेणी यांची वर्णी लागली असून त्यांनी १५४ कोटींची देणगी दिली आहे.
यादीतील सर्वात तरुण देणगीदारांमध्ये, एशियन पेंट्सचे ३५ वर्षीय विवेक वकील यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. त्यांनी ८ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी (2023) सर्वात तरुण देणगीदार ठरलेले झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ (३८) या वर्षी तिसऱ्या स्थानावर आले आहेत. निखिल आणि झेरोधाचे सीईओ नितीन कामथ (४५) यांनी त्यांच्या फर्मच्या माध्यमातून १२० कोटी रुपयांची देणगी दिली. देणगीदारांच्या यादीतील टॉप १० सेलिब्रिटींनी एकूण ४,६२५ कोटी रुपयांची देणगी दिली. तर टॉप १० पैकी ६ देणगीदारांनी त्यांच्या CSR(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत शिक्षणक्षेत्रातील विकासासाठी देणग्या दिल्या आहेत.