जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली. मार्शल्सने आमदारांना बाहेर काढले.
श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही कलम ३७० वरून वाद सुरूच होता. अधिवेशन सुरू होताच सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी तसेच बाचाबाची झाली. अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी सभागृहात पोस्टर लावून निषेध केला, त्यामुळे मार्शलला हस्तक्षेप करावा लागला. या घटनेने सभागृहाचे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.
भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांच्यावर नॅशनल कॉन्फरन्सची बाजू घेत असल्याचा आरोप केला. त्यामुळे विरोधकांनी सभापतींविरोधात हौदात जाऊन निषेध केला. सभापती राथेर यांनी यास सत्तेचा अहंकार असल्याचे म्हटले आणि भाजपचे आमदार सभागृहाच्या प्रतिष्ठेचे व मर्यादांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले. आपण सभागृहाचे कामकाज निःपक्षपातीपणे चालवत असल्याचेही सभापतींनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी हा वाद सुरू झाला असून आज तिसऱ्या दिवशी देखील हा वाद सुरूच होता. नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता व यामुळे विधानसभेत तणाव वाढला होता. याच मुद्द्यावर पीडीपीने दुसरा ठरावही मांडला. यानंतर विधानसभेत अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.