सत्ताधाऱ्यांकडून मारहाण झाल्याने भाजपचे ३ आमदार जखमी. मार्शलने काढले बाहेर
श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज आधी २० मिनिटांसाठी आणि नंतर उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.
आज सुरवातीला आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी 'कलम ३७०' मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. ' कलम ३७० आणि ३५ ए पुनर्स्थापित करा.' तसेच 'सर्व राजकीय कैद्यांची सुटका करा' अशा आशयाचे हे फलक होते. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी आक्षेप घेतला व यानंतर भाजपच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.
भाजप आमदारांनी सभापतींच्या हौदात जात खुर्शीद अहमद शेख यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेतला. यावेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडले. दरम्यान प्रकरण हातघाईवर आले व यात भाजपचे ३ आमदार जखमी झाले. यावेळी मार्शल्सनी हस्तक्षेप करत आरएस पठानिया यांच्यासह अनेक भाजप आमदारांना सभागृहाबाहेर काढले. मात्र, त्यानंतरही भाजप आमदारांनी ‘विशेष दर्जाचा प्रस्ताव मागे घ्या’अशा घोषणा दिल्या. यावर सभापतींनी 'सर्वांनी सभागृहाची मर्यादा पाळावी, हा मासळी बाजार नव्हे' अशा शब्दांत एकूण प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान काल ६ नोव्हेंबर रोजी, जम्मू आणि काश्मीर विधानसभेने कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्मीरमधील लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपने केला. कोणतीही विधानसभा कलम ३७० आणि ३५ ए परत आणू शकत नाही कारण हा कायदा संसदेने पारित केला आहे असेही भाजपने म्हटले.