इराणच्या कट्टरवादी शासनाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून तरुण पिढी संघर्ष करत आहे. आयतउल्लाह खामेनेई सरकारची धोरणे आणि राज्यघटना मध्ययुगीन कट्टर विचारसणीला सामान्य जनतेवर थोपवत असल्याची बाब येथील अनेक समाजसुधारकांनी उघड केली.
तेहरान : इराणमध्ये आयतउल्लाह खामेनेई यांच्या नेतृत्त्वाखालील कट्टरवादी विचारसणीच्या सरकारविरोधात जनमानसात प्रचंड राग आहे. हे सरकार येथील जनतेवर शरिया कायद्यानुसार शासन करत आहे. यामुळे येथील जीवनशैलीवर बराच फरक पडला आहे. येथील तरुणाईवर पाश्चात्य मुक्त जीवनशैलीचा प्रभाव आहे. मात्र सरकारचे हस्तक असलेल्या मोरल पोलिसांमुळे येथील लोकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे दिसून येते. कालपासून समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. विद्यापीठात शिकणारी एक मुलगी पोलिसांसमोरच आपले कपडे उतरवते व केवळ अंतरवस्त्रांत तेथील परिसरात फिरू लागते.
इराणमधील एका पत्रकाराने हा व्हिडिओ आपल्या पेजवर पोस्ट केला. यातून समोर आलेल्या माहितीनुसार, येथील विद्यापीठात कडक ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. महिलांनी बुरखा-हिजाब परिधान करावा, परपुरुषाशी बोलू नये यासारख्या मध्ययुगीन विचारसणीच्या नियमांचा समावेश आहे. या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे काम मोरालिटी पोलिसांचे आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे मोरालीटी पोलीस सदर मुलीला ड्रेसकोडचे पालन करण्यास सांगत होते. मुलीला चुकीच्या उद्देशाने स्पर्श करण्याचा देखील त्यांनी बऱ्याचदा प्रयत्न केला. यास कंटाळून या मुलीने आपले अंतरवस्त्र वगळता सर्व कपडे काढले व येथील परिसरात फिरू लागली. थोड्या वेळात पोलिसांची अजून एक तुकडी बोलावण्यात आली . या मुलीला मानसिक आजार असल्याने तिला वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे सांगत तिला गाडीत घालत रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उशिरा समोर आलेल्या माहितीनुसार तिला इस्लामी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली .
गेल्या काही वर्षांत इराणमध्ये महिलांचा ड्रेस कोडला विरोध वाढला आहे. १९७९ च्या क्रांतीनंतर इराणमध्ये महिलांसाठी हिजाब घालणे अनिवार्य करण्यात आले. या निर्बंधांमुळे समाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी हिजाबला आव्हान देणाऱ्या अनेक चळवळींना जन्म दिला.
सप्टेंबर २०२२ मध्ये मोरालिटी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या महसा अमिनी या तरुण इराणी महिलेच्या मृत्यूमुळे देशभरात हिजाब बंदीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. ही सरकारने जबरदस्तीने दडपली. सरकारी मानकांनुसार हिजाब न घातल्याने अमिनीला अटक करण्यात आली. सरकारने दावा केला की तिला पोलिस स्टेशनमध्ये हृदयविकाराचा झटका आला, ती कोसळली आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी ती कोमात गेली. तथापि, अमिनीसोबत ताब्यात घेतलेल्या महिलांसह प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, तिला जबर मारहाण करण्यात आली आणि पोलिसांच्या क्रूरतेमुळे तिचा मृत्यू झाला.
इराणच्या कट्टरवादी शासनाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून तरुण पिढी संघर्ष करत आहे. आयतउल्लाह खामेनेई सरकारची धोरणे आणि राज्यघटना मध्ययुगीन कट्टर विचारसणीला सामान्य जनतेवर थोपवत असल्याची बाब येथील अनेक समाजसुधारकांनी उघड केली. परिणामस्वरूप अनेकांना २०२२ साली फाशीवर लटकवले गेले. इराण सध्या युद्धाच्या सावटाखाली वावरत आहे. येथील अर्थव्यवस्थादेखील पूर्णतः कोलमडली आहे. अशा परिस्थितीत येथील तरुणाईने आता पुन्हा एल्गार पुकारला आहे.