जे योगीजन देह ठेवताना "अग्नी, ज्वालारूप, शुक्ल पक्ष व उत्तरायण" हा मार्ग निवडण्यात यशस्वी होतात, ते या मार्गाने सायुज्य-सिध्दी-सदनास पोचतात. या मार्गास 'अर्चिरा-मार्ग' असे म्हणतात. हा प्रयाणाचा उत्तम काळ समजला जातो.
अध्याय आठवा, श्लोक क्रमांक २३ चे विस्तृत विवेचन - देहनाशाचा काळ समीप आला की त्यातील पंचमहाभूते आपापल्या मूळ ठिकाणी जायला तत्पर होतात. पण पार्था, अशा स्थितीतही जीवाची स्मृती दगा देत नाही. त्याला स्वरूपाचे विस्मरण होत नाही. बुध्दीवर भ्रम-भ्रांतीचे आक्रमण होत नाही. पंचमहाभूतांची झालेली इंद्रिये परतायला निघाली असली तरी त्यांची ज्ञानेंद्रिये शाबूत असून ती प्रफुल्ल व प्रसन्न असतात! अंतिम समय निकट आलेला असतानाची ती स्थिती प्राप्त होईपर्यंतच्या आयुष्यात त्या जीवाने स्वानुभवाने जी काही ब्रह्मभावस्थिती ज्या काही प्रमाणात भोगली असेल ती त्या काळी सुध्दा टिकून राहिलेली असते आणि अंतकाळ येईपर्यंत सगळी इंद्रिये अशी व्यवस्थित असतात. अग्निबळ अंगी असेपर्यंत हे सगळे घडते.
हातातल्या दिव्याच्या ज्योतीच्या उजेडात आपल्या दृष्ट्येंद्रियांना आजूबाजूचे जवळपासचे दिसते. पण ती ज्योत जर वाऱ्यामुळे अथवा पाण्यामुळे (अथवा तेल संपलेल्या निरांजनात वातीवर जमलेली काजळी न काढता एकदम जास्त घातलेल्या तेलाने) विझली, तर आपल्याला काही दिसत नाही. दृष्टी व्यर्थ होते. तसा अंतकाळी अंतर्बाह्य कफ-वायूचा प्रकोप झाल्याने जीवाग्नीचे तेज विझून गेले की मग प्राणासाठी क्रियाशक्तीही शिल्लक रहात नाही. मग तिथे बुध्दी जरी शिल्लक राहिलेली असली, तरी ती तो प्राणाग्नी विझल्याने क्रियाहीन होते. म्हणून अर्जुना, शेवटी या देहात प्राणाग्नी निघून गेल्यामुळे ज्ञानकलाही राहत नाही. कारण अग्नीच निघून गेल्यामुळे तो देह हा देह राहिलेला नसून ओल्या चिखलासारखा झालेला असतो. मग अगदी अंधारात चाचपडावे तशी आयुष्याची स्थिति होते. आणि अशा स्थितीत मागील स्मरण सर्वार्थाने तसेच राखून जीव आत्मरूपात जाऊन मिसळतो. अशा रीतीने मूळ चेतना कफव्याप्त देह-चिखलात बुडून गेल्यावर साहजिकच मागील पुढील सर्व स्मरणही पूर्वी केलेल्या योगाभ्यासासकट त्यात बुझून जाते. म्हणून तो प्राणाग्नी हाच ज्ञानाचा आधार आहे हे तू निश्चित जाण.
अग्निर्ज्योतिरह: शुक्ल: षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना: ।।२४।।
सरळ अर्थ : त्या दोन प्रकारच्या मार्गांपैकी ज्या मार्गांत ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे आणि दिवसाची अभिमानी देवता आहे, तसेच शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे व उत्तरायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गांत मृत होऊन गेलेले ब्रह्मवेत्ते (म्हणजे परमेश्वराची उपासना करून त्याला परोक्ष भावाने जाणणारे) योगीजन (उपरोक्त देवतांकडून क्रमाने नेले जाऊन) ब्रह्माला प्राप्त होतात.
विस्तृत विवेचन : देहामध्ये प्राणाग्नी असला म्हणजे त्याच्या ज्योतीचा प्रकाश असतो. तो असणे; देहाबाहेर दिवस शुक्ल पक्षातला असणे आणि वर्षातील दोन अयनांपैकी उत्तरायणाचा तो भाग असणे असा समयोग साधून जे ब्रह्मवेत्ते आपले शरीर ठेवतात ते नि:शंक ब्रह्मरूप होतात, एवढी या काळाची महती आहे! (अंधारात चाचपडत बसावे न लागता) सरळ आत्मस्वरूपात विलीन होता येण्यासाठी हा सर्वतोपरी उजळ मार्ग आहे.
देही अग्नी असणे (म्हणजे विझत आलेल्या निखाऱ्यांत अजून धग शिल्लक असणे) ही पहिली पायरी. ज्वालारूप म्हणजे (रात्र नसता) दिवसाची वेळ असणे ही दुसरी पायरी. तो दिवस शुक्ल पक्षातला दिवस असणे ही तिसरी पायरी आणि वर्षांतल्या दोन अयनांपैकी उत्तरायण चालू असणे ही चौथी पायरी, म्हणजे पुढचा वरील जिना! सूर्य दररोज पूर्वक्षितिजावर एकाच बिंदूत उगवलेला दिसत नाही. पूर्वक्षितिजाच्या मध्यबिंदूपासून तो सुमारे सहा महिने उत्तरेकडे व सुमारे सहा महिने दक्षिणेकडे उगवत असलेला दिसतो. उत्तरायण म्हणजे सूर्य व इतर ग्रहनक्षत्रे यांचे उत्तरेकडे जाणे. मकरवृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत सूर्याच्या क्रांतीस म्हणजे मार्गक्रमणास जो सहा महिन्यांचा काळ लागतो तो, ढोबळ मानाने २२ डिसेंबर ते २२ जून किंवा माघ ते आषाढ. सौर पौष ते सौर ज्येष्ठअखेर. सूर्याने मकर राशीत प्रवेश केला, म्हणजे तेथपासून सहा राशी भोगून होत तोपर्यंत उत्तरायण असते.
अर्जुना, जे योगीजन देह ठेवताना "अग्नी, ज्वालारूप, शुक्ल पक्ष व उत्तरायण" हा मार्ग निवडण्यात यशस्वी होतात, ते या मार्गाने सायुज्य-सिध्दी-सदनास पोचतात. या मार्गास 'अर्चिरा-मार्ग' असे म्हणतात. हा प्रयाणाचा उत्तम काळ समजला जातो.
धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगीप्राप्यं निवर्तते ।।२५।।
सरळ अर्थ : तसेच ज्या मार्गात धूम्राची अभिमानी देवता आहे व रात्रीची अभिमानी देवता आहे तसेच कृष्णपक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात (मरणानंतर गेलेला) सकाम कर्मयोगी (उपरोक्त देवतांकडून क्रमाने नेला जाऊन) चंद्रम्याच्या ज्योतीला प्राप्त होऊन (स्वर्गांत आपल्या शुभ कर्मांचे फल भोगून) परत येतो.
विस्तृत विवेचन : हे धनंजया, जो काळ अकाळ म्हणून वा अयोग्य म्हणून समजला जातो तो ही मी तुला आता इथे वर्णन करून सांगतो. जेव्हा अंतकाळी देह व्याधिग्रस्त होऊन कफ-वाताने भरून जातो त्या वेळी त्याच्या अंतरांत अंधार दाटून येतो. सगळी इंद्रिये काष्ठवत् होतात. तेव्हा मन भ्रमित होते आणि त्या भ्रमांत स्मृती बुडून जाते. मन वेडावल्या गत होते. प्राण कोंडला जातो. देहातल्या अग्नीचे अग्नीपण नाहीसे होते. सगळीकडे धूर भरून राहतो (म्हणजे अस्पष्टता निर्माण होते) आणि त्यात मग चेतना म्हणजे जाणीवही झाकली जाते. आकाशात पाण्याने चिंब भरलेल्या ढगांनी चंद्र झाकोळून टाकल्यावर धड उजेड नाही व धड अंधार नाही अशी धुरकट अवस्था ज्याप्रमाणे होते तद्वतच जीवाला त्यावेळी धड जिवंतपणाही नसतो आणि धड मरणही नसते! आणि अशा अवस्थेत अर्जुना तो जीव मृत्यूची वाट पहात असतो.
(क्रमशः)
मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३