गोवा। पूजा यादवला कोल्हापुरातून डिचोली पोलिसांकडून अटक

सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th November 2024, 12:10 am
गोवा। पूजा यादवला कोल्हापुरातून डिचोली पोलिसांकडून अटक

डिचोली/ म्हापसा : रेल्वेसह इतर खात्यांमध्ये सरकारी नोकरीचे आमिष दाखवून डिचोलीतील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा उर्फ प्रिया यादव हिला पोलिसांनी अटक केली. रविवारी डिचोली पोलिसांनी कोल्हापूर येथून संशयित महिलेला पकडून गोव्यात आणले व नंतर तिला रितसर गजाआड केले.

संशयित पूजा उर्फ प्रिया यादव हिच्यासोबत या फसवणूक प्रकरणात रोहन वेंजी या पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याचे पोलीस चौकशीत आढळून आले होते. त्यामुळे गेल्या २४ ऑगस्ट २०२४ रोजी वेंजी यास पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

डिचोलीतील अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करत लाखो रुपये लुटल्याचा प्रकार समोर येताच गेल्या २१ ऑगस्ट रोजी आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी पीडितांसमवेत डिचोली पोलीस स्थानकात धडक देत संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयितांविरूद्ध भा.दं.सं.च्या ४२० कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता. तेव्हापासून संशयित आरोपी पूजा यादव ही फरार होती.

१० लाख उकळले!

दि. १६ ऑगस्ट रोजी बोर्डे - डिचोली येथील अनिकेत दलवाई यांनी फसवणुकीची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. कोल्हापूर येथील आपली जमीन रेल्वे ट्रॅकसाठी जात असल्याने आपल्याला ५ नोकर्या रेल्वेकडून मिळणार आहेत. यातील एक नोकरी फिर्यादींना देण्याचे आमिष संशयित पूजा यादव हिने दाखवले व त्याबदल्यात १० लाखांची रक्कम घेतली होती. हा आर्थिक व्यवहार जुलै २०२३ मध्ये घडला होता, अशी तक्रार त्यांनी नोंदवली होती.