पोलीस स्टेशनवर पोचला वाद
भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक अजब-गजब प्रकार घडला. एका आस्थापनात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने आपल्या सोबत काम करणाऱ्या एका सफाई कामगाराचा मोबाईल घेतला आणि त्यात माय इलेव्हन सर्कलवर या स्पोर्ट्स फँटसी अॅपवर एक टीम तयार केली. सामना संपल्यानंतर त्याला ५ लाख रुपये व एसयूव्हीचा जॅकपॉट लागला. आता यावरून दोघांत वाटणीवरून वाद सुरू झाला असून, दोघांना पोलीस स्थानकाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आहेत. जाणून घ्या नेमका प्रकार.
एका आस्थापनात काम करणारे हाऊसकीपिंग सुपरवाइजर वेदप्रकाश रघुवंशी आणि सुरक्षा रक्षक राकेश भगत एकत्र बसले होते. तेव्हा राकेश याने वेदप्रकाशकडून मोबाइल घेतला व त्यात माय इलेव्हन सर्कलवर हे स्पोर्ट्स फँटसी अॅप डाउनलोड केले व त्यावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड (महिला टी-२० वर्ल्डकप) सामन्याच्या आधारे टीम बनवली. यात वेदप्रकाशच्या खात्यातून ४९ रुपये वजा झाले. यावर वेदप्रकाशने त्याला 'माझ्या मोबाईलवर का खेळतोयस ? माझे पैसे गेले' असा प्रश्न केला. त्यावर ' मी खूप प्रयत्न केले पण कधी जिंकलो नाही, तुझ्या मोबाईलवर खेळून पाहूया' असे उत्तर राकेशने दिले. यावर लॉगिन करण्यासाठी वेदप्रकाशची केवायसी आणि बँकेची कागदपत्रे वापरण्यात आली होती. राकेशने फक्त यावर टीम बनवली.
या सामन्यात न्यूझीलंडचा दारुण पराभव झाला. दुसऱ्या दिवशी वेदप्रकाशच्या मोबाईलवर आलेल्या एका मेसेजने हादरून गेला. त्याने हा मेसेज राकेशला दाखवला. राकेशला देखील धक्का बसला. त्याला जॅकपॉट लागले होते. बक्षीसाची रक्कम ५ लाख रुपये व एक टाटा एसयूव्ही कार असे बक्षीसाचे स्वरूप होते.वेदप्रकाशने त्वरित स्क्रीनशॉट घेऊन आपल्या स्टेटसवर लावला. राकेशने पुन्हा वेदप्रकाशकडे मोबाइल मागितला. त्याने नकार दिल्यानंतर दोघांत वाद झाला. 'माझा मोबाइल, माझी कागदपत्रे आणि इतर माहितीही माझीच म्हणून पैसाही माझाच' असे म्हणत वेदप्रकाश भांडू लागला व थोड्या वेळात रागाच्या भरात तेथून निघून गेला.
दरम्यान दुसऱ्या दिवशी 'माय इलेवन सर्कल'च्या प्रतिनिधींनी वेदप्रकाश यांना फोन करत, बँक अकाऊंट व्हेरीफिकेशन केले व २ लाख ४० हजार ( कर वगैरे कापून) खात्यात जमा केले. पुन्हा कॉल करत गाडीच्या रजिस्ट्रेशनसाठी इतर गोष्टींची माहितीही घेतली. त्याचवेळी त्याच्या घरी राकेश आला. 'बक्षीस मीच जिंकले' म्हणत राकेश हुज्जत घालू लागला तर 'मोबाइल आणि कागदपत्रे माझीच' म्हणत वेदप्रकाशही हट्टास पेटला.
दरम्यान वेदप्रकाशने यावर तोडगा काढत समसमान वाटणी करू असे सुचवले. राकेश काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान प्रकरण हातघाईवर आले व यात राकेशने वेदप्रकाशचा मोबाइल जमिनीवर आपटून तोडून टाकला. यानंतर हे प्रकरण बागसेवनिया पोलीस स्थानकात पोहोचले. वेदप्रकाश आणि त्याच्या पत्नीने झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली व बँक खात्यात आलेला पैसा होल्ड केला. गाडीची प्रक्रिया कुठवर आली याची माहितीदेखील वेदप्रकाशला मोबाइल तुटल्यामुळे मिळू शकली नाही
.
आतापर्यंत दोघांनी यावर तक्रार नोंदवलेली नाही. मात्र प्राथमिक कृती करत बँक खात्यातील रक्कम होल्डवर ठेवली आहे. दोघांनी तक्रार नोंदवल्यानंतरच यावर पुढील कारवाई केली जाईल असे येथील बागसेवनिया पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अमित सोनी म्हणाले. दरम्यान वेदप्रकाश तडजोड करत बक्षिसाच्या रकमेची वाटणी करण्यास तयार आहे. मात्र राकेश संपूर्ण बक्षिसावर हक्क सांगत आहे. भोपालचे सहायक महानिरीक्षक (सायबर क्राइम) वैभव श्रीवास्तव यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, कायद्यानुसार कागदपत्रे व इतर गोष्टींच्या आधारे यावर तोडगा काढला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.