आंब्याचं कोडं!

Story: कथा |
03rd November, 12:32 am
आंब्याचं कोडं!

दुपारचे तीन वाजले तरीही अनिल घरी पोहोचला नव्हता. दुपारचे जेवण बनवून अनिलची बायको माली व्हरांड्यावर मोगरीचे कळे गुंफित त्याची वाट पाहत बसली होती. अनिल तिचा नवरा सुतारकामाला जायचा व रोज दुपारी एकच्या दरम्यान जेवायला घरी यायचा. आज मात्र त्याचा पत्ता नव्हता. वाट पाहता पाहता तिला कधी डुलकी लागली तिचे तिलाच कळले नाही. तेवढ्यात ‘गुर्रर्रर्र’ असा त्याच्या जुन्या स्कुटरचा आवाज आल्याने मालीला तो आल्याचे कळले व ती न्हाणीतून पाणी काढण्यासाठी हातातील गजरा केसात माळीतच घरात गेली.

 एवढ्यात मोठ्याने एकच आवाज आला. “माली...” नंतर “मा...मा...आ...आ...भू...” असे विचित्र आवाज कानावर आले. ती धावत बाहेर आली. अनिल “आ...आ...भू...भू...” काहीतरी बरगळत होता. जणू तो काहीतरी सांगू पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलीशी भीती होती. पण त्याच्या तोंडातून भीतीने शब्द फुटत नव्हते. तो तसाच जमिनीवर अर्ध्या शुद्धीत बसला. त्याला पाहून माली कावरीबावरी झाली. काय करावे तिला काहीच सूचेना. तिने धावत जाऊन अनिलला पाणी आणून पाजले पण तो ते पीत नव्हता. माली रडकुंडीला आली व “अनिल... अनिल...” म्हणून ओरडू लागली. 

 आवाज ऐकून शेजारची लताकाकी धावून आली. म्हातारी लताकाकी अनिलला विचारू लागली. तिने अनिलच्या डोक्याला हात लावला तर डोकं तापाने फणफणत होतं. “ माली याला ताप आलाय गं जरा थंड पाणी व कपडा आण घड्या घालूया.” मालीने पटकन सांगितल्याप्रमाणे केले पण ताप काही उतरेना. काकी म्हणाली, “थांब मी काकांना बोलावते.” मालीला काकांना बघून थोडा धीर आला. काकांनी अनिलला हाक दिली पण अनिलची वाचाच फुटेना. अनिलला खायला प्यायला पण नको झाले होते. काकांनी मालीपाशी अनिलच्या तब्येतीबाबत चौकशी केली. मालीने सकाळी अनिल एकदम ठीकठाक होता, सुमारे सहा वाजता तो कामासाठी आमराईतील भगवान वाड्यावर प्रभुगावकरांकडे गेल्याचे सांगितले. आमराईतील भगवान वडा एकदम टोकाला होता मध्ये वाटेत खूप भरगच्च आंब्याची झाडे होती.

अनिलची अवस्था बघून काकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सकाळी धडधाकट गेलेला अनिल दुपारी असा काय घरी पोहोचतो? त्यांनी मालीला सांगितले, “चल याला जोशी काकांकडे नेऊया.” काकांनी आपली मारुती कार सुरू केली व चौघेही गावच्या वेशीवरील वेताळाच्या देवळापाशी पोहोचले. जोशी काका हे वेताळाच्या देवळात गेली चाळीस वर्षे पुरोहिताचे काम करीत असत. ते एक नावाजलेले वैद्यबुवा म्हणूनही प्रसिद्ध होते. जोशी काकांनी अनिलला बघितले व देवळात जाऊन देवाचा अंगारा आणून त्यांनी अनिलला लावला. मालीला देवाच्या अंगावरची फुले दिली. सर्वांना आपल्या ओसरीवर बसवून जोशी काका आत गेले. त्यांनी अनिलला काढा आणून प्यायला दिला व तासभर थांबण्यास सांगितले. अनिल खांबावर डोके टेकून बसला होता जोशी काका माळ जप करू लागले. 

एक पाऊण तास झाला व अनिल जरा सावरला. मालीने त्याच्या डोक्याला हात लावला, डोके थंड झाले होते. जोशी काकांनी अनिलला पाणी दिले व “आता सांग काय झाले ते...” असे म्हटले. मालीने मनोमन वेताळाला साकडे घातले. अनिलने हळू आवाजात सांगायला सुरुवात केली...

“माझे काम आज अकराच्या सुमारास संपले घरी लवकर पोहोचू म्हणून मी निघालो होतो. सुमारे बारा वाजता मी स्कूटरवरून जात होतो. मोठी आंब्याची झाडे चैत्राच्या गर्मीत रस्त्या बाजूला जणू धावत होती. एवढ्यात माझ्या स्कुटरच्या पुढ्यात एक आंबा पडला. स्कूटर थांबवून तो आंबा उचलून पिशवीत टाकून ती पिशवी स्कूटरला अडकवली आणि स्कूटर सुरू करून मी पुढे चाललो. अजून दोन मिनिटांनी रस्त्याकडेला विहिरीजवळ दोन पिवळे धमक आंबे पडलेले दिसले. मोह न आववल्याने मी तेही आंबे उचलून पिशवीत टाकले व स्कूटर चालू केली.”

“ कडकडीत ऊन होतं, रस्ता भगभगणारा, किण्ण होतं. इतक्यात ‘मला थांब रे, मला थांब रे’ असा एका बाईचा आवाज आला. पाठी वळून बघताच एक बाई दिसली. दुपारच्या उन्हात कुठे ही चालेल म्हणून मी तिला लिफ्ट द्यायचे ठरवले व बस गं म्हटले. ती पाठीमागे बसलीसुद्धा. कुठे सोडू तुला? विचारल्यावर ‘पुढे सांगते’ असे उत्तर मिळाले. ‘आंबे चांगले मिळाले तुला. मला पण आवडतात हा आंबे’ असे आंब्यावर आशा दाखवीत ती बडबडत होती. मी फक्त ‘हं’ म्हटलं कारण मला त्यातला एकही आंबा तिला मुळीच द्यायचा नव्हता. थोड्या वेळाने विचारले ‘तू कधी उतरणार?’ तर ती गप्पच राहिली. परत दहा मिनिटांनी विचारतो, पण तेच उत्तर मिळालं. ती शांतच होती. मला आमराईतून जाणारी वाट माहीत होती, पण आज वाट खूप लांब आहे असं वाटू लागलं. परत मी विहिरीजवळचा रस्त्यावर पोहोचलो. जणू वाट संपतच नव्हती व ही बाई उतरत नव्हती. वाटेत एरवीप्रमाणे वाटसरू व इतर गाड्या पण नव्हत्या. काय कोडं आहे हे समजेना. मी जोरात विचारले उतरतेस ना? तरी ती गप्पच होती. मी देवा वेताळाला हाक मारली. मला फक्त घरी पोहोचव म्हटले. तेवढ्या सर्रर्रर्रकन वारा आला अन आंब्याची पिशवी हलली. मला जणू तो संकेतच होता. मी आंब्यासह पिशवी फेकून दिली. तेवढ्यात ती म्हणाली ‘उतरव मी पोहोचले. मला मिळाले ते.’ आणि गेली. मी तिच्या तोंडाकडे पाहिले नाही व त्या आंब्यांकडे सुद्धा. माली, खूप घाबरलो गं मी... मी पाठीमागे पाहिले तर ती बाई नव्हतीच मी तशीच स्कूटर सुरू केली. राम नामाचा जप करीत घरी आलो. मला चकवा लागला हे समजले. तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण भीतीने दातखिळी बसली. जोशीबुवा उठले व त्यांनी अनिलला दोन पुड्या दिल्या व दोन वेळा पाण्यातून घेण्यास सांगितल्या. माली मात्र “देवा वेताळा पाव रे! तुझ्यामुळे माझे सर्वस्व आज वाचले.” म्हणून परत परत देवाला पाया पडू लागली. जोशी काकांनी अनिलला दुपारच्या किंवा रात्रीच्या वेळेला एकटा आमराईत न जाण्याचा सल्ला दिला. खूप वर्षांपूर्वी आमराईच्या विहिरीत म्हणे एका विधवेने सासरच्या जाचाला कंटाळून जीव दिला होता असेही नंतर जोशी काकांच्या भावाने सांगितले. सर्वांनी अनिलला न घाबरण्याचा सल्ला दिला कारण देव वेताळ सर्वांची रक्षा करतो. अनिल व मंडळी घरी आली ताप उतरला अनिल पण सावरला पण त्याला एकच प्रश्न पडला, कोण होती ती बाई? भूत की त्याचा भास? की आणखी काही?


श्रुती करण परब