एकवेळ घटक पक्ष आपसात उमेदवार वाटून घेतात हे समजू शकते, मात्र काही नाराज चक्क विरोधात जाऊन दुसऱ्या आघाडीतील उमेदवारी पदरात पाडून घेतात, असे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळाले. त्यांना उमेदवारी देणारे नेते त्याच प्रतिक्षेत असावेत, असे दिसत होते.
देशातील आयाराम, गयाराम प्रवृत्ती रोखण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी सहजपणे दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, अशी तरतूद त्यात आहे. मात्र काही अशा तरतुदी आहेत की, एकगठ्ठा पक्षांतर केले जाऊ शकते. गोव्याने याचा अनेक वेळा अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रात जे काही सध्या चालले आहे, ते याहून फारच वेगळे आहे. असेही होऊ शकते याची कल्पना कोणी केली नसेल असे प्रकार घडताना दिसत आहेत. निवडणूकपूर्व पक्षांतरांना त्या राज्यात जोर आला आहे. त्या राज्यातील स्थिती एवढी विचित्र बनली आहे, की कोण कोणत्या पक्षात गेला किंवा आला याबद्दल जनता गोंधळात पडली आहे. मागील सत्तांतरानंतर जे काही घडत गेले, ते विलक्षण होते. प्रथम म्हणायचे तर भाजप-शिवसेना ही निवडणूकपूर्व युती केवळ मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून तुटली. विरोधकांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे सर्वोच्च पद दिले. त्यांची महत्त्वाकांक्षा आणि इच्छा पूर्ण झाली, पण राजकीय ओढाताणीत तेही थकल्यासारखे वाटले. राष्ट्रवादी व काँग्रेसचा पाठिंबा घेत ठाकरे सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या खेळीत शिवसेना जशी फुटली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही शकले झाली. या पार्श्वभूमीवर सत्तेवर आलेले शिंदे सरकार हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या टेकूवर टिकले. हा इतिहास तसा जुना नाही, पण त्याचे परिणाम आता सर्वच पक्षांना उमेदवार ठरवताना भोगावे लागले आहेत. निष्ठावान कोण, कार्यकर्ते कोण, उमेदवार कोण याचा कोणताही मुलाहिजा एकाही पक्षाने बाळगलेला नाही, असे चित्र स्पष्टपणे पुढे आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या क्षणापर्यंत कोण कोणत्या पक्षातर्फे लढतो आहे, तेच समजत नव्हते. प्रसार माध्यमांना असे खाद्य क्वचितच मिळाले असेल.
महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता, भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती आणि विरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची महाआघाडी यात लढत होणार असे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात कोणत्या पक्षाला किती जागा हे अद्याप म्हणजे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही स्पष्टपणे पुढे येत नाही. यासाठीच तेथील राजकीय स्थिती संशयाची बनली आहे. सामान्य मतदार संभ्रमित व्हावा एवढी विविधता डावपेचांत आली आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून दीडशेच्या आसपास पोचला असे दिसत असले तरी प्रत्यक्षात या पक्षाचे १६० उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी काही जण घटक पक्षाच्या चिन्हावर लढत आहेत, तरीही ते भाजपशी निष्ठा ठेवून आहेत. उदाहरणच द्यायचे तर नीलेश राणे यांचे देता येईल. एवढेच कशाला भाजपचे ज्येष्ठ नेते दानवे यांची कन्या संजना जाधव, विलास तरे, संतोष शेट्टी, मुरली पटेल, शायना एन. सी., दिग्विजय बागल, बळीराम क्षीरसागर आदी नेते काही वर्षे भाजपसाठी सक्रिय होते, पण ते १२ जण शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहेत. याचप्रमाणे राजकुमार बडोले, प्रताप पाटील चिखलीकर, संजय पाटील, निशिकांत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढत असले तरी काल परवापर्यंत ते भाजपचे सक्रिय नेते होते. अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागावाटपात उमेदवारांची देवाणघेवाण करताना दिसला. खुद्द केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत. कलिना विधानसभा मतदारसंघात रिपाईकडून उमेदवारी आणि भाजपचे चिन्ह अशी उमेदवारी अमरजीत सिंह यांना देण्यात आली आहे. माहीमध्ये शिंदे गटाचा उमेदवार असताना भाजप नेते मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरेंना पाठिंबा देत आहेत. आघाड्या बनवलेल्या पक्षांनी आपसात दाखवलेले सामंजस्य एवढे आश्चर्यकारक आहे की, प्रमुख उमेदवार कोणत्या तरी पक्षाचे तिकिट मिळाले म्हणून समाधानी आहेत, तर काही जण बंडखोर बनले आहेत. कायम आम्ही पक्षकार्य करायचे आणि बक्षिसी मात्र आयत्या वेळी पक्षात आलेल्यांना कशी, असा प्रश्न अनेक इच्छुक उमेदवार आपल्या नेत्यांना करीत होते. यापैकी काही जणांना कसले तरी आमिष दाखवून थंड करण्यात आले. काहींना म्हणे विधान परिषदेत विनानिवडणूक जाता येईल, अशी लालूच दाखवली गेली.
एकवेळ घटक पक्ष आपसात उमेदवार वाटून घेतात हे समजू शकते, मात्र काही नाराज चक्क विरोधात जाऊन दुसऱ्या आघाडीतील उमेदवारी पदरात पाडून घेतात, असे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळाले. त्यांना उमेदवारी देणारे नेते त्याच तयारीत असावेत असे दिसत होते. असे करताना आपल्या पक्षासाठी राबलेल्या नेता तथा कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, असे कुणालाच वाटत नाही, ही खरी चिंतेची बाब आहे. भारतीय जनता पक्षाला आपण लढवत असलेल्या १४८ (की १६०) जागांपैकी सर्वाधिक जागा आपण निवडून आणल्या पाहिजेत, असे वाटणे साहजिक आहे.