लोकरीपासून बनवलेला पर्यावरणपूरक कंदील ही नवीन संकल्पना आजकाल आपल्याला पहायला मिळते. ही मूळ संकल्पना आहे, मडगाव येथील देवकी राजेश नाईक यांची !
दिवाळी जवळ आली की वेध लागतात ते आकाशकंदीलाचे! रंगीत कागदांपासून तयार केलेले हे आकाशकंदील आपले लक्ष वेधून घेतात. लोकरीपासून बनवलेला पर्यावरणपूरक कंदील ही नवीन संकल्पना आजकाल आपल्याला पहायला मिळते. ही मूळ संकल्पना आहे, मडगाव येथील देवकी राजेश नाईक यांची! त्यांनी सर्वात प्रथम लोकरीचा कंदील बाजारात आणला. त्यांची ही संकल्पना अनेकांनी शिकून घेतली आहे.
आज देवकी यांनी बनवलेल्या या कंदीलांना केवळ मडगावमध्येच नाही, तर इतर थिवी, वाळपई, बिचोली, वास्को, पणजीतूनही मोठी मागणी आहे. इतकेच नव्हे, तर आता त्यांचे हे कंदील साता समुद्रापार म्हणजे अमेरिकेतही पोहचले आहेत. अमेरिकेतही त्यांच्या कंदिलांना फार मोठी मागणी असून आता तिथेही देवकी यांनी बनवलेल्या कांदीलाचा झगमगाट पसरला आहे.
समाज सेवा संघाच्या व्यवस्थापन समितीवर असलेल्या देवकी यांनी एम.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. मधुर आवाजाची देणगी लाभलेल्या देवकी नाईक म्हणजे जणू काही प्रसन्न हास्य! आणि हातातील कला म्हणाल तर तीही फार सुरेख!! एकदा दिवाळीला घरच्या आकाशकंदीलसाठी योग्य ते नक्षीकाम मिळाले नाही, म्हणून त्यांनी तो आकाशकंदील घरातील सुतापासून बनवला. त्यांच्यातील ही सृजनशीलता त्या कंदिलात पुरेपूर उतरली आणि तेव्हाच देवकी यांना आपल्यातील सृजनशीलता योग्य ठिकाणी कशी वापरावी हे उमगून आले. मग त्यांनी आकाश कंदील बनवताना नारळाच्या झावळया, सूती साड्या, सुतळीचा दोरा, नारळाच्या काथ्या यापासून अनेक पर्यावरणपूरक कंदील बनवले.
तेव्हाच मग रंगीबेरंगी लोकरपासून कंदील बनवावेत अशी कल्पना त्यांच्या मनात डोकावली आणि त्यांनी आपल्या या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी सुरुवात करण्याचे ठरवले. यासाठी त्या नेहमीची साधी लोकर न वापरता फेदर वुल नावाची लोकर वापरतात. ही लोकर साध्या लोकरीपेक्षा टिकाऊ, चमकदार, रंगीत आणि सुबक आकारात मिळते.
देवकी या गेली १२ वर्षांपासून आकाशकंदील बनावत आहेत. सुरुवातीला आपली हौस आणि आपली कला जतन करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या कामाला पुढे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी लोकरीपासून तयार केलेले हे आकाश कंदील पाहून मडगाव महिला मंडळाच्या तेव्हाच्या अध्यक्षा रंजिता पै आणि नंदा कारे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि महिला मंडळात हे बनवलेले आकाश कंदील विक्रीकरता ठेवण्यास सांगितले. या कंदिलाची विक्री तिथे हातोहात झाली.
त्यानंतर देवकी यांना महिला मंडळात लोकरीपासून बनवण्याच्या आकाश कंदीलाची कार्यशाळा घेण्यास रंजिता पै यांनी उद्युक्त केले. या कार्यशाळेसही उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत देवकी यांनी अनेकांना हे लोकरीचे कंदील कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले आणि अनेकांनी ही कला देवकी यांच्याकडून शिकून घेतली. त्यानंतर रवींद्र भवन मडगाव तर्फे देवकी यांना नक्षत्रे बनवण्याच्या कार्यशाळेत खास आमंत्रित करण्यात आले आणि देवकीच्या या कंदिलांना मग घराघरात स्थान मिळाले. म्हार्दोळ येथील म्हाळशेच्या देवळातही भव्य असा आकाश कंदील बनवण्याचे भाग्य देवकी यांना लाभले. देवीच्या मंदिराच्या आवारात झगमगणारा हा भव्य आकाशकंदील पाहून देवकी यांना आपल्या कामाचे खरे चीज झाल्यासारखे वाटते.
कंदिलाच्या आतील फ्रेम ही लाकडाची, पत्र्याची असते, त्याला ही फेदर वुल योग्य रितीने गुंडाळत जावे लागते. कंदिलाच्या आतील फ्रेमला ही फेदर वुल गुंडाळताना एक राऊंड जरी चुकला तरी सगळे सोडवावे लागते. एका कंदिलात जवळजवळ दहा रंग असतात. त्यामुळे ही वुल गुंडाळताना रंगसंगती चुकली तरी सर्व सोडवावे लागते. त्यासाठी एकाग्रतेची खूप गरज असते. त्यामुळे हे कंदील बनवणे म्हणजे एक प्रकारचे ध्यान करण्यासारखेच आहे असे देवकी सांगतात. हे असे कंदील देवकी दिवसाला चार बनवू शकतात. लोकरीचा हा कंदील दिवाळी सण संपल्यावर घरीही शोभेसाठी लावू शकतो. कारण या कंदिलासाठी जी वुल वापरलेली असते, ती खराब होत नाही. त्यामुळे दिवाळी नंतरही या कंदीलमुळे आपल्या घराची शोभा वाढते.