दिवाळीतल्या पणत्या म्हणजे सृष्टीतली महन्ममंगल गोष्ट आहे. प्राचीन काळापासून या दिव्याचे महत्त्व सर्वांना ठाऊक आहे. दिवा अगदी निरपेक्षपणे जळत असतो, प्रकाश देत असतो.
दारोदारी आकाशकंदिलांचं तोरण लागलं, अंगणी रांगोळ्या सजल्या, दिव्यांच्या प्रकाश फुलांनी सजलेल्या माळा घरे, दुकाने, इमारतींना उजळून टाकू लागल्या की त्या लखलख प्रकाशाने आणि पणत्यांच्या मंद तेजाने जेव्हा आसमंत प्रकाशून जातो तेव्हा मनामनात उतरतं आनंदाचं चांदणं. कारण तो सण असतो आनंदाचा हर्षाचा उल्लासाचा अर्थात दिवाळीचा. दिवाळीचा प्रत्येक दिवस आपल्याबरोबर घेऊन येतो एक महागडं गिफ्ट आनंदाचं. घराघरातून गोडाधोडाच्या पदार्थाचा घमघमाट आसमंतात पसरू लागतो आणि चाहूल लागते ती येणाऱ्या मंगल सणाची. आणि सांगत असते आता वाट कसली बघता या सर्वांनी एकत्र येऊन खमंग अशा गप्पा मारूया कुरकुरीत असा फराळ तोंडी लावत एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देऊ या. सणाचा आनंद एकट्याने थोडीच साजरा करायचा असतो त्यासाठी तर आपल्या आजूबाजूला आपली माणसे हवीतच. कसलीही कुरकुर आणि कुरबुर न करता फराळावर ताव मारत आनंद साजरा करा हीच तर वेळ असते मनामनात आनंदाचं चांदणं उतरवण्याची.
पहाटपारी सुगंधी उटणे, तेल आणि साबण वापरुन तन तर सुगंधित झालेलेच असते. तनाबरोबर मनही खुशबूदार होऊन जातं. सगळीकडे रोषणाई, लख्ख उजळलेले दिवे तेवतात, आकाशकंदील मंद वाऱ्यासवे झोके घेतोय त्या सोबत मनही आनंदाने हिंदोळे घेतेय, छोट्याछोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधत आनंदित व्हायची ही वेळ. अशा वेळी सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्या विकासाच्या कक्षा वाढवणं म्हणजे दिवाळी साजरी करणं. हा दिवाळीचा खरा अर्थ आणि हेच खरे प्रयोजन.
भारतीय संस्कृती आणि आपलं मन प्रकाश पूजक आहेच आणि दिवा हे त्याचे प्रतीक आहे. दिव्याच्या मंगल प्रकाशात मंगलकार्ये सिद्धीस जातात. दिवा लावल्याने वातावरणात मांगल्य येते. मनातले वाईट विचार नष्ट होतात विकाराची जळमटे जळून खाक होतात. मातीपासून बनलेली पणती किंवा दिवा म्हणजे माती ही माता झाली तर आकाश हे पित्याचे प्रतीक असते. भूमी आणि आकाश यांची निर्मिती म्हणजे प्रकाश उजेड हा प्रकाश सृष्टीला चराचराला चिरंजीव करतो. जीवनदान देतो. म्हणून या दीपरूपी प्रकाशाचे पूजन यावेळी करण्याची त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ.
दीपानां आवली-दीपावली. दिव्यांच्या ओळी किंवा पंक्ती म्हणजे दीपावली. संस्कृत आणि इतर भाषेत दीपावली असेच म्हणतात पण मराठीत मात्र याला दिवाळी म्हणतात. पणत्या, दिवे, मेणबत्त्या, लाईटच्या माळा, आकाश कंदील याद्वारे केलेली रंगीबेरंगी, प्रकाशमय रोषणाई म्हणजे दिवाळी. प्रत्येक दिवशी लावला जाणारा दिवा हा खास काही कारणासाठी असतो. वसुबारसेला संध्याकाळी लावलेले दिवे गोमातेच्या प्रती कृतज्ञता म्हणून किंवा त्यांच्या पूजेसाठी लावतो. सवत्स धेनु म्हणजे गाय वासराची पूजा करून दिवे ओवाळणे या कृतीने दिवाळीची मंगलमय शुभ अशी सुरुवात होते. त्यानंतर यम दीप दान यमाला प्रसन्न करण्यासाठी दिवे लावले जातात. संध्याकाळी धनाची पूजा करतात आरोग्यासाठी धन्वंतरी पूजन करून दिवे लावले जातात. नरक चतुर्दशीला नरकासुर राक्षसाला मारून विजयी होऊन आलेल्या श्री कृष्णाला ओवाळण्यासाठी दिवे लावले जातात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीचा सर्वत्र संचार असतो तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिच्या स्वागतासाठी दिवे लावले जातात. पाडवा हा नवीन संवत्सरचा वर्षारंभ मानला जातो त्याच्या सुरुवातीचा पहिला दिवस शुभ शकुनाचा. तेव्हा तर दिवे लावलेच पाहिजेत. भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी येतो. त्याचे स्वागतही दारी आरास करून, दिवे लावून केले जाते. आश्विन एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत शंकर, विष्णु, यम आणि इतर देवता आणि आपले पितर यांच्यासाठी दररोज दिवे लावावेत असा पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना दिव्यांच्या लखलखाटात उजळलेला असतो.
आपला हा पूर्वापार चालत आलेला उत्साही वातावरणाने भरलेला आनंदाची पर्वणी घेऊन येणारा सण म्हणजे शुभ मंगल घटनांच्या क्षणांची मालिका असते. दिवाळीच्या निमित्ताने माणसे एकमेकांना भेटतात, शुभेच्छा देतात, भेटींचे आदानप्रदान होते. सौख्य वाढीस लागते. आणि त्यातून नात्यांची वीण घट्ट होत जाते. ती प्रेमाने जपता येतात. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात प्रत्यक्ष भेटीला आनंदाच्या क्षणी आणि गंभीर प्रसंगीसुद्धा काही दुसरा पर्याय नसतो तो नसावा. भेटीत असतात ते जिवंत सळसळते क्षण. दिवाळी सारख्या सणाच्या वेळी ते अनुभवता आले पाहिजेत. पण त्यासाठी नुसता मोबाइलवर मेसेज टाकून उपयोग नाही तर प्रत्यक्षात जाऊन भेटून एक आपुलकीची झप्पी देणं, आपलेपणाचा स्पर्श करणं गरजेचं आहे त्याद्वारे तुम्ही दिलेल्या सदिच्छा योग्य प्रकारे पोहचतील. आणि त्यांच्या मनात ही या दिवाळीत आनंदाचे चांदणे फुलेल.
प्रतिभा कारंजकर, फोंडा