गोवा : प्रलोभने दाखवून लोकांना लुबाडणार्‍या जोडप्याकडून दागिने जप्त

गहाण ठेवलेले ४४ लाखांचे दागिने म्हापशातील आयसीआयसीआय बँकेतून जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18 hours ago
गोवा : प्रलोभने दाखवून लोकांना लुबाडणार्‍या जोडप्याकडून दागिने जप्त

म्हापसा। वाळपई : डिचोली आणि दोडामार्ग भागात फ्लॅट किंवा भूखंड देण्याचे आमीष दाखवून लोकांची लुबाडणूक करणाऱ्या विदिशा विजयनाथ गावडे व विजयनाथ केळूराव गावडे (रा. होंडा-सत्तरी) यांच्याकडून वाळपई पोलिसांनी ४४ लाखांचे दागिने जप्त केले. म्हापशातील आयसीआय बँकेत हे दागिने गहाण ठेऊन संशयितांनी ३३ लाख रूपये कर्ज घेतले होते.

गहाण ठेवलेले हे दागिने आयसीआयसीआय बँकेच्या म्हापसा व धुळेर येथील शाखेतून पोलिसांनी जप्त केले. धुळेर म्हापसा येथील बँकेच्या शाखेत १३ लाख १५ हजार २८ रूपयांचे दागिने गहाण ठेवले व ९ लाख ८६ हजारांचे कर्ज घेतले. तर बँकेच्या म्हापसा शाखेत ३० लाख ८१ हजार ९०६ रूपयांचे दागिने गहाण ठेवून २३ लाख ११ हजार ४१३ रूपये कर्ज घेतले होते. एकूण ४३ लाख ९७ हजार १३४ रुपयांचे दागिने त्यांनी गहाण ठेवून ३२ लाख ९७ हजार ४३० रूपये कर्ज घेतले होते.

बँकेने कोणतेही बिल न घेता हे दागिने स्वीकारुन ते गहाण ठेवले होते. संशयित जोडप्याने खरेदी केलेल्या दागिन्यांचे कोणतेही वैध बिल सादर केलेले नाही, अशी बँक व्यवस्थापकांनी कबुली दिली आहे. त्यामुळे बँकेने आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे.

पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर म्हणाले की, आरबीआयने अशा बँकांवर कारवाई सुरू केली पाहिजे. बँक प्राधिकरणाच्या अशा निष्काळजीपणामुळे राज्यात गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन मिळते.

दरम्यान, या प्रकरणी वाळपई पोलिसांत रूपाली परवार (रा. मोर्ले) यांनी सप्टेंबर महिन्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार या संशयितांना १३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. संशयितांविरुद्ध वाळपईत २, डिचोली १ व फोंडा १ असे चार गुन्हे पोलिसांत नोंद आहेत. संशयित जोडप्यांकडून फसवणूक झालेल्या इतरांनीही पोलीस स्थानकात तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फिर्यादीला म्हावळींगे डिचोली येथे फ्लॅट मिळवून देण्याचे भासवून तिच्याकडून संशयितांनी २६ लाख रूपये रक्कम घेतली होती. हा व्यवहार २०२१-२०२२ या काळात घडला होता. फ्लॅटच्या निश्चित रकमेतील २३.५० लाख रूपये रोख रक्कम आणि शिल्लक २.५० लाख रूपये रक्कम संशयितांच्या बँक खात्यात जमा केली होती. मात्र, दोन वर्षे उलटून देखील फ्लॅट देण्यास संशयित टाळाटाळ करीत असल्याचे पाहून फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली होती. वाळपई पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

बनावट कागदपत्रांचा वापर करुन फसवणूक

संशयित आरोपी गावडे दाम्पत्य हे बनावट कागदपत्रांचा वापर करुन लोकांना डिचोली व दोडामार्ग येथे मालमत्ता खरेदीसाठी गुंतवणूक करण्याचे आमीष दाखवत होते. लोकांना धनादेश किंवा वचनपत्र (अॅफिडेव्हीट) देऊन त्यांचा विश्वास संपादन करत. नंतर ते मालमत्ता हस्तांतरित करण्यास तसेच पैसे परत देण्यास नकार देत. 

हेही वाचा