गोवा : व्यावसायिकाचे सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीतील चौथ्या संशयिताला अटक

म्हापसा पोलिसांची दिल्लीत कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd October, 11:28 pm
गोवा : व्यावसायिकाचे सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीतील चौथ्या संशयिताला अटक

म्हापसा/वाळपई : दिल्ली नार्कोटिक ब्युरोचे अधिकारी असल्याचे भासवून म्हापशातील एका व्यावसायिकाचे सेक्सटॉर्शन करुन त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील मोहम्मद बशीद खान (रा. दिल्ली) या चौथ्या संशयित आरोपीला म्हापसा पोलिसांनी दिल्लीतून शिताफीने अटक केली.

संशयित आरोपी मोहम्मद शान हा देश सोडून परदेशी पलायनाच्या तयारीत होता. दिल्लीमध्ये सापळा रचून म्हापसा पोलिसांनी त्याला अटक केली. म्हापसा न्यायालयाने संशयिताला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणातील आणखी संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

हा लुबाडणूकीचा प्रकार ऑगस्ट २०२३ मध्ये घडला होता. फिर्यादींच्या म्हापशातील बंगल्यावर संशयितांनी दिल्लीतील नार्कोटिक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून छापा टाकला. फिर्यादींना मारहाण केली व नंतर पीडित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत ३० लाख रुपयांची खंडणी उकळली.

पीडिताने पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी संशयित निवेदिता शर्मा व भूवन अरोरा या दोघांना ३० मार्च २०२४ रोजी तर संशयित फैजान खान यास २१ जून २०२४ रोजी अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणी भादंसंच्या ३४२, १७०, ३२३, ५०६(२), ३८९ व ३४ कलमान्वये गुन्हा नोंद केला होता.

ही टोळी सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करत होती. या सेक्सटॉर्शनमध्ये मुलींचा वापर करुन श्रीमंत व्यावसायिकांना ही टोळी लक्ष्य करायची. धनवंत लोकांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून, नंतर त्या माध्यमाद्वारे पीडितांकडून खंडणी वसूल करत होती. श्रीमंत लोकांच्या सामाजिक प्रतिष्ठेला यामाध्यमातून हानी पोहचविणे हा हल्लीच्या काळात मोठा गुन्हेगारी व्यवसाय बनला आहे.

दिल्लीत उघडले रेस्टॉरंट

संशयित टोळीने सेक्सटॉर्शनचा वापर करुन अनेक लोकांना लुटले आहे. यातून मिळालेल्या खंडणीच्या पैशांतून या टोळीने दिल्लीमध्ये भागीदारीवर रेस्टॉरंट सुरू केले आहे. बहुतेक व्हाईट कॉलर व्यवसायिकांना ही टोळी लक्ष्य बनवत होती. या रेस्टॉरन्टमध्ये आलेल्या लोकांनाही त्यांनी आपले सावज बनवले आहे, अशी माहिती पोलीस चौकशीतून उघडकीस आली आहे. 

हेही वाचा