धरित्रीचं शृंगार लेणं - रांगोळी

रंगातून अभिव्यक्त होणं म्हणजे रांगोळी. आपल्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेत रांगोळीला महत्त्वाचे स्थान आहे. धरणीच्या सौंदर्याचा साक्षात्कार आणि तिचे मांगल्य रांगोळीद्वारे घडते म्हणून तिला रंगवल्ली असेही म्हणतात.

Story: मनातलं |
19th October, 03:01 am
धरित्रीचं शृंगार लेणं - रांगोळी

पावसाने काढता पाय घेतला की आपल्या सणवारांची लगबग सुरू होते. दिवाळी, दसरा म्हणजे घरादाराची स्वच्छता सजावट आलीच. रंगरंगोटी झाली की मन आणि वातावरण प्रसन्न होऊन जातं. रंगांची पखरण हा आपला स्थायीभाव. अंगणात दारोदारी, मंदिरात रांगोळ्या रेखाटल्या जातात. रंगातून अभिव्यक्त होणं म्हणजे रांगोळी. आपल्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेत रांगोळीला महत्त्वाचे स्थान आहे. धरणीच्या सौंदर्याचा साक्षात्कार आणि तिचे मांगल्य रांगोळीद्वारे घडते म्हणून तिला रंगवल्ली असेही म्हणतात. शुभ सूचक अशी चिन्हे वापरलेली असल्याने ती मंगलतेचे प्रतीक असते. सण, उत्सव, शुभ कार्ये, कुलाचार, व्रतवैकल्ये, पूजाविधी, स्वागत अशा प्रसंगी रांगोळीला महत्त्वाचे स्थान असते. अंगण, उंबरठा, देवघर, यज्ञ वेदी, तुळशी वृंदावन, ओवाळताना, जेवणाच्या ताटा कडेने मंदिरातल्या प्रांगणात हिचे रेखाटन मंगलमय शुभकारक मानले जाते. 

आपल्या प्राचीन वेद आणि ग्रंथामध्येही रांगोळीचा उल्लेख आढळतो. अनेक प्रकारच्या चित्ररचना करून जमिनीचे केलेले सुशोभन म्हणजे रांगोळी ती विविध प्रकारे करण्याची पद्धत आहे कुठे फुलांच्या, कुठे तांदळाच्या पिठाच्या, कुठे दगडाचे चूर्ण वापरुन. वाळू, पाण्यावर तेलाचा तवंग पसरून त्यावर रांगोळी रेखटली जाते. शेणाने सारवलेल्या जमिनीवर चैत्रारंगण हे खास शुभ प्रतीके वापरुन काढले जाते. घराच्या प्रवेश द्वारावर रांगोळी काढण्यामागे घरामध्ये कुटुंबात सुख, समृद्धी नांदावी. देवी लक्ष्मीचा वरदहस्त लाभवा हीच सदिच्छा असते. दिवाळी, सणवार, पोंगल, ओनम, तिहार अशा सणांना तर ती काढली जातेच पण रोज सुद्धा दारासमोर देवापुढे आपण रांगोळी काढतो. त्यात गोपद्म, लक्ष्मीची पाऊले, स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, कलश, कमल अशी प्रतीके काढून उंबरठा सुशोभित करतो. 

चौसष्ट कलांमध्ये रांगोळी काढणे या कलेचा समावेश होतो. आजकाल तर स्त्रियांच्या बरोबरीने पुरुष ही सुंदर रांगोळी पोट्रेट काढताना दिसतात, संस्कार भारतीच्या मोठमोठ्या रंगपूर्ण अशा वर्तुळाकार आकारातल्या रांगोळ्या आपले लक्ष वेधून घेतात. प्रत्येक प्रदेशानुसार रांगोळीला वेगळे नाव आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये रांगोळी म्हणतात तर तामिळनाडूत कोलम राजस्थानमध्ये मांडणा, मध्यप्रदेशात चौक, बंगालमध्ये अलिपना किंवा अल्पना, केरळमध्ये कलम, बिहारमध्ये अरीपण म्हणतात. तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी मी मललपुरं येथे पाहिली होती ती लवकर पुसली जात नाही, काही ठिकाणी कायम स्वरूपी राहण्यासाठी रंग वापरुन काढतात. काही ठिकाणी फक्त पांढऱ्या रंगाच्या डिझाईन काढून रेखाटली जाते माझ्या लहानपणी दिवाळीत आमच्या वाड्यात राहणाऱ्या सुळे वहिनी शेणाने सारवलेल्या जमिनीवर फक्त पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने खूप सुंदर आणि मोठ मोठ्या फ्री हँड डिझाईनच्या रांगोळ्या रेखाटायच्या, त्या अगदी पहात राहाव्याश्या वाटतं. तेव्हा प्रत्येकाच्या दारासमोर एकमेकांच्या इरीशिरेने काढलेल्या रांगोळ्या बघायला मिळत. कुणी ठिपक्यांच्या कुणी भौमितिक डिझाईन काढून कुणी पानाफुलांच्या, कुणी प्रतीके असलेल्या अशा असत. रंगाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या जात. देवदेवता आणि सणांसाठी येणारे पाहुणे यांच्या स्वागतासाठी रांगोळीचे प्रयोजन. 

जीवनात रंग भरायचे असतील तर रांगोळी ही हवीच ती मनात सकारात्मकता निर्माण करते. शुभ विचार मनात जागृत होतात. रांगोळी काढताना आपण अंगठा आणि बोट याच्या सहाय्याने रांगोळी हातातून सोडतो तेव्हा बोटाची ज्ञान मुद्रा तयार होते. त्यामुळे आपल्या मेंदूला ऊर्जा मिळते. तणावापासून मुक्ती मिळते. ओणवे होऊन बसण्याने शरीराचा कमरेचा आपोआप व्यायाम होतो. विविध रंग पाहून आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. रांगोळी काढल्याशिवाय आपला कुठलाच सण पूर्ण होत नाही. रंगोळीतील शुभ चिन्हे नकारात्मक ऊर्जेचा नायनाट करतात. 

दक्षिण भारतात तिरूमल यांचा विवाह दिवाळी दिवशी झाला होता म्हणून त्यांच्या स्वागताला दारी रांगोळी घालतात. प्रभूराम वनवासातून परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी नगरीत सर्वांनी आपल्या दारी रांगोळ्या काढल्या, तोरणे गुढ्या उभारल्या होत्या. रांगोळीचे महत्त्व प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत वर्णीले आहे. रांगोळीमध्ये स्वस्तिक चिन्हाला महत्त्व आहे स्वस्तिकच्या चार भुजा म्हणजे विष्णूचे चार हात आणि मध्यभागी नाभी कमल म्हणून ते शुभ आणि सर्जनात्मक प्रतीक मानले जाते. आकृतिप्रधान आणि वल्लरी प्रधान असे दोन प्रकार रंगोळीत बघायला मिळतात. सुरुवातीला शिकण्यासाठी ठिपक्यांची रांगोळी सोप्पी पडते. संस्कार भारतीची रांगोळी ही पाची बोटे एकत्र करून हळूहळू रांगोळी त्यातून सोडत जायची असते त्यात चिमटीपेक्षा पाच बोटांनी तयार केलेले ठिपके आणि रेषा असतात. एका अर्थाने ती रांगोळीचा गालीचाच म्हटलं पाहिजे इतका त्याचा आकार मोठा आणि रंगीबेरंगी अशा आकृती यांनी युक्त असतो. वर्तुळाच्या केंद्रबिंदुतून तयार होणाऱ्या रंगांच्या वल्ली म्हणजे वेली किंवा ओळी म्हणजे रंग वल्लिका तयार होत असतात. रंग भरण्यासाठी चाळणी, गाळणी यांचा वापर केला जातो त्यामुळे मोठमोठ्या रांगोळ्या लवकर पूर्ण व्हायला मदत होते. अशी डिझाईन्स तयार करताना आपले मन एकाग्र होते त्यावेळी आपल्या मेंदूचे कार्य ही सक्षम होते. ही कलाकृति पूर्ण झाल्यावर तिच्याकडे पाहून लोकांच्या प्रतिक्रियांनी मन सुखावते आपल्या मनाला ही काहीतरी वेगळेआगळे केल्याचे समाधान मिळते. मनाला सुख आणि आनंद देणारी गोष्ट केली की शरीर ही स्वस्थ रहाते. सणाचे प्रयोजन तेच तर असते. आपले जीवन जास्त सुखमय आनंदी आणि उत्साहपूर्ण रहावे. रंगीबेरंगी रांगोळी ही आपल्या जीवनाचे प्रतीक ठरावी अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. याचे शारीरिक आणि मानसिक फायदेही बरेच आहेत. 

आपलं आयुष्य म्हणजे लहानपणापासून आपण ठिपक्यांना जोडत तयार केलेली एक रांगोळीच असते. आपल्या भोवतीची माणसे म्हणजे एकेक ठिपका त्यांना जोडत जोडत आपण आपल्या जीवनाचा आकृति बंध तयार करत असतो कधी कधी त्यांना मध्ये सेंटरला ठेऊन त्यांच्याभोवती ही आपले जीवन गुंफत जातो पण त्या ठिपक्यांची जागा आणि महत्त्व अनमोल असते. त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ, दिशा आणि आकार प्राप्त होत असतो.


प्रतिभा कारंजकर, फोंडा