शक्तीच्या भक्तीचा आनंद सोहळा

दसऱ्याच्या दिवशी माता नवदुर्गेने महिषासुराला ठार मारून विजय मिळवला होता. प्रभू श्रीरामचंद्राने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला होता. म्हणूनच दसऱ्याला ‘विजयादशमी’ म्हणतात.

Story: विशेष |
12th October, 02:46 am
शक्तीच्या भक्तीचा आनंद सोहळा

गणेश चतुर्थी, दिवाळी, नाताळ हे गोमंतकात अगदी घराघरातून साजरे होणारे सण जरी असले, तरी नवरात्री आणि दसरा हा उत्सव मात्र गोमंतकातील प्रत्येक मंदिरातून साजरा होणारा उत्सव आहे. दसरा या उत्सवाची सुरुवात नवरात्री उत्सवापासून होते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना केल्यानंतर मग नवरात्रीत, नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा, आराधना, भक्ती घराघरातून आणि मंदिरातूनही नित्यनेमाने केली जाते. 

पहिल्या दिवशी म्हणजेच नवरात्र प्रारंभीला शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. त्यानंतर ब्रह्मचारिणी मातेची पूजा, त्यानंतर चंद्रघंटा, कुशमांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धधात्री अशा नवदुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून संपूर्ण गोमंतकात नवरात्री उत्सव निमित्त मखरोत्सवाचा सोहळा सुरू होतो. हे नवरात्री उत्सवाचे गोव्यातील वैशिष्ट्य आहे. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गोमंतकीय देवता नवरात्रीनिमित्त नऊ दिवस फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मखरात विराजमान होतात. मखरात विराजमान काही मंदिरात  ईश्वराच्या रूपांची तर काही मंदिरात आदिमायेच्या शक्ती रूपांची भक्तीमय पूजा केली जाते. मंगेशीचा श्री मंगेश, नागेशीचा श्री नागेश, रामनाथीचा श्रीरामनाथ देव, ऋषीवनातील श्री विमलेश्वर देव, तसेच बोरी येथील श्री नवदुर्गा, शिरोडा गावची कामाक्षी, म्हार्दोळ येथील श्री म्हाळसा, कवळेची श्री शांतादुर्गा, बांदोडेची महालक्ष्मी या साऱ्या देवदेवतांचे मखरात विराजमान अशा मनोहरी रूपाचे दर्शन शिवाय भजन, कीर्तन, आरत्या, महाप्रसाद यात नवरात्रीचे नऊ दिवस अगदी आनंद, उत्सवात साजरे करतात. कर्नाटक आणि महाराष्ट्रात आरंभीच्या प्रथम तीन दिवसात महालक्ष्मी मातेची, यथासांग पूजा आराधना केली जाते. त्यानंतर तीन दिवसात शारदा मातेची पूजा आराधना केली जाते. पण शेवटच्या तीन दिवसात माता दुर्गेची पूजा, आराधना व तिच्या नावाने जागर केला जातो.

दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याला घराघरातील देवघरातून तसेच गावातील शहरातील देवदेवतांच्या मंदिरातून स्थापना केलेल्या घटाची सांगता होते. म्हणजेच दुर्गा मातेच्या पूजनाची सांगता होते. त्यानंतर दहाव्या दिवशी दसरोत्सव साजरा केला जातो. दसरा म्हणजे कृषीप्रधान संस्कृतीतला लोकोत्सव स्वरूपातला उत्सव आहे. आपल्या भारतात प्रत्येक प्रदेशातील दसरा आगळ्यावेगळ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात आणि गोमंतकात दसरा एक प्रमुख सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घराघरातून तसेच मंदिरातून खास झेंडूंच्या फुलांनी देवदेवतांची पूजा करण्याची प्रथा पूर्वपार चालत आलेली आहे. म्हैसूर राज्यातील दसरा त्याच्या आगळ्यावेगळ्या मनमोहन विद्युत रोषणाईसाठी व मिरवणुकीसाठी अख्ख्या जगभर प्रसिद्ध आहे. तामिळनाडूत दसरा ‘गोलू’ या नावाने अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यात दसऱ्याला रामलीला सादर केली जाते.

गोव्यातील अनेक मंदिरातून खास आगळ्यावेगळ्या, पारंपरिक पद्धतीने दसरा सण साजरा केला जातो. गोमंतकीय मंदिरामधून दसऱ्यानिमित्त ‘अवसर’ (भार) भाविकांना कौल प्रसाद देतात. रिवण येथील श्री विमलेश्वर देवाचा दसरा अगदी आगळावेगळ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी श्री विमलेश्वर देवाला केळी अर्पण करून देवदर्शन घ्यायची पारंपरिक पद्धत आहे. या दिवशी शेजारच्या कोळंब गावात निवास करणारी माता श्री शांतादुर्गा देवी आपला बंधुराज श्री विमलेश्वर या भाऊरायाच्या भेटीस पालखीत विराजमान होऊन रिवणगावात यायला निघते. तिच्या स्वागतास भक्तगण अवसरा समवेत वाजत गाजत गावच्या सीमेवर पाचारण करतात. सीमेवर दोन्ही देवतांच्या अवसरांची अगदी कडकडून गळाभेट होते. फटाके, आताषबाजी, ढोल, ताशांच्या गजरात मातेला मानाने गावातील श्री विमलेश्वर मंदिरात आणले जाते. देवीची खणा-नारळाने ओटी भरून तिचा सन्मान केला जातो. माहेरवाशीणीची पालखी परत आपल्या गावाकडे प्रस्थान करताना अवसर परत तिला रिवण गावच्या सीमेपर्यंत जाऊन निरोप देतात.

अशा प्रकारे गोव्यातील प्रत्येक गावातील मंदिरात वेगवेगळ्या, आगळ्या, पारंपरिक पद्धतीने दसरा सण साजरा केला जातो. जांबावली येथील श्री दामोदर यासारख्या कित्येक मंदिरात ‘तरंगोत्सव’ साजरा केला जातो. गोव्यात व गोव्याबाहेर व्यवसाय, कामधंद्याच्या निमित्ताने विखुरलेले भक्तगण, गावकरी दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या गावातील दैवताच्या भेटीस आवर्जून येतात हे विशेष. दसरा म्हणजे पवित्र दिवस, शुभ दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा दिवस. या दसऱ्याच्या दिवशी माता नवदुर्गेने महिषासुराला ठार मारून विजय मिळवला होता. प्रभू श्रीरामचंद्राने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला होता. म्हणूनच दसऱ्याला ‘विजयादशमी’ म्हणतात. या विजयादशमीच्या शुभ आणि पवित्र अशा दिवसाला कोणत्याही चांगल्या कामासाठी मुहूर्त लागत नाही. नवीन सदनिकेत प्रवेश केल्याने वास्तुत, सुख, शांती, वैभव, समृद्धी प्राप्त होते अशी मानवी धारण आहे. अनादी कालापासून दसऱ्याला एक खास असे महत्त्व आहे. यंदा हा दसरोत्सव अश्विन शुद्ध दशमीला म्हणजेच शनिवारी १२ ऑक्टोबरला आहे. तेव्हा आपल्या सर्वांना या मंगलमय दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!


शर्मिला प्रभू, मडगाव. मो. ९४२०५९६५३९