योग गुरु अंजली अनिल पाटील

अंजली यांनी कोविड काळात सुरू केलेले ऑनलाइन वर्ग आजही लोकांच्या आग्रहास्तव सुरू आहेत. त्यावरून समाजात योगाची आवड निर्माण होत असून समाजात योग विषयीची जागरूकता वाढत असल्याचे लक्षात येते.

Story: तू चाल पुढं |
05th October, 03:23 am
योग गुरु अंजली अनिल पाटील

गोव्यात योगाचे महत्त्व आज सर्वांना पटत असून कित्येक जण नियमित योग करत आहेत. योगशास्त्रात एम.ए. केलेल्या अस्नोडा येथील अंजली अनिल पाटील या योग गुरु शिक्षिका नियमित योगाचे वर्ग तसेच कार्यशाळा आयोजित करून समाजात योगाचे महत्त्व पटवून देण्याचे काम अगदी निष्ठेने करत आहेत. स्वत: विविध आसनांचे आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक करताना रोजच्या जीवनात योगाचे किती महत्त्व आहे, हे त्या पटवून देतात.

अंजली यांनी योगाचे प्राथमिक शिक्षण पतंजली योगपीठ हरिद्वार येथून घेतले. त्यानंतर योगामध्ये एक वर्षाचा त्यांनी डिप्लोमा केल्यावर त्यांना योग या विषयाबद्दल आवड निर्माण झाली. मग त्यांनी तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करत डिग्री घेतली. व पुढे दोन वर्षे योगशास्त्रामध्ये एम.ए. पूर्ण केले. आता योगामध्ये पीएच.डी. करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या त्या गोवा इंस्टिट्यूट ऑफ स्किल ट्रेनिंग, साखळी येथे योगा आणि वेलनेस हा एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे, तेथील विद्यार्थ्यांना फिलॉसॉफी आणि फाउंडेशन ऑफ योगा हा विषय शिकवतात. 

योगाभ्यास शिकताना त्यांना भारतीय दर्शनाबद्दल माहिती मिळाली. भारतीय दर्शन म्हणजेच Indian philosophy, जो त्यांच्या आवडीचा विषय आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत. जसे की भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग, अष्टांगयोग इत्यादी. ज्यांना योगाबद्दल माहिती आहे, अशी कोणतीही व्यक्ती योगा करू शकते असे अंजली सांगतात. लहानपणापासून योगा करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपले शरीर हे लवचिक बनण्यास मदत होते. अंजली यांनी कोविडच्या काळात ऑनलाइन योगाचे वर्ग सुरू केले. त्याचा अनेकांना फायदा झाला. कोविड काळात सुरू केलेले हे वर्ग आजही लोकांच्या आग्रहास्तव सुरू आहेत. त्यावरून समाजात योगाची आवड निर्माण होत असून समाजात योग विषयीची जागरूकता वाढत असल्याचे लक्षात येते.

जमिनीवर बसून करण्याचे योगासने म्हणजेच पद्मासन, अर्धमत्स्येंद्रासन, धनुरासन, भुजंगासन, नौकासन, सुखासन, गोमुखासन, सर्वांगासन आदी आसने ही कोणीही करू शकतात तसेच त्रिकोणासन, ताडासन, हस्तपादासन, वीरभद्रासन, हस्तपादासन ही उभी राहून करायची आसने थोड्या सरावानंतर सहज जमू शकतात. त्यामुळे जर आसने जमत नसतील तर योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे असे अंजली सांगतात.

प्राणायाम, भ्रामरी  हे प्रकार प्रत्येकाने रोज करणे आवश्यक आहे, त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो आणि शरीरात उत्साह टिकून राहण्यास मदत होते. प्राणायाम करण्यासाठी आपल्या श्वासावर आपला अंकुश ठेवावा लागतो. हे सर्व प्रकार नियमित केल्याने मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. त्यामुळे प्राणायाम सर्वांनी नियमित करावा असा सल्ला अंजली देतात.

जर मन सुदृढ असेल तर शरीरामध्ये रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढते. जितकी शरीराची सुंदरता आवश्यक आहे, तितकीच मनाची ही सुंदरता आवश्यक आहे. मन जर निरोगी असेल, तर मनात अनेक सकारात्मक विचार उत्पन्न होतात आणि मनात येणारे नकारात्मक विचार दूर होतात. त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही सुंदर राहण्यास मदत होते. योगाचे हे महत्त्व शिकवताना अंजली वृत्तपत्रातूनही आपल्या लेखाद्वारे  मार्गदर्शन करत असतात. योगाची माहिती सांगणारे त्यांचे लेख वाचून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे आणि आपल्या जीवनात त्यांनी योगाला स्थान दिले आहे. समाजात जेव्हा हा बदल घडून येतो, तेव्हा आपल्या कामाचे चीज झाले, असे अंजली यांना वाटते.


कविता आमोणकर