दसरा… सण आनंदाचा

नवरात्रीच्या आठव्या दिवशी दसऱ्याचा जागोर असायचा. या दिवशी गुरा-ढोरांना त्यांच्या दाव्यावर बांधून रात्रीचे एकत्र येऊन माटोळी बांधली जाते. त्या माटोळीला विविध फळा-फुलांनी सजवली जायची. या सगळ्या गोष्टी लहानपणापासून मी बारकाईने करत आले.

Story: सय अंगणाची |
12th October, 02:48 am
दसरा… सण आनंदाचा

डोंगराच्या कडेकपाऱ्यांमध्ये पूर्वजांचे वास्तव्य असलेल्या स्वकष्टाच्या आठवणी रानवनात ठेवलेल्या अशा धनगर समाजात माझा जन्म झाला खरा. पूर्वजांच्या हाल-अपेष्टांच्या गोष्टी ऐकत लहानाची मोठी झाले. जंगलाशी अगदी जवळचं नातं असलेला माझा समाज. झाडं-झुडपं ते किड्या-मुंग्या पर्यंतची काळजी त्यांच्यात रुजलेली. आयुष्यातला‌‌ आनंद साजरा करण्याची अशी‌ ठरलेली वेळ नसायची. भर दुपारच्या उन्हात ताकाने भरलेला मोगा घशा खालून उतरवताना‌ एखादा घामाघूम झालेला गडी दिसला की त्याच्या कष्टाचा घाम आणि त्यानंतर जीवाला प्राप्त झालेली शांतता मात्र दिसायची. गुराखी, गडी माणसांच्या सहवासात आमचा‌ प्रवास झाला असेल, तर एक छोट्या दवबिंदू एवढा. दुधा-भातावर, जंगली भाज्यांवर पोटपूजा करून जगणारा हा समाज धाडसाच्या बळावर जगला. लहान लहान गोष्टींमध्ये समाधानाने आपली मुलंबाळं, गुरा-ढोरांसोबत जगत असताना सणांमधील आनंद मात्र तितक्याच उत्साहाने त्यांनी साजरा केला. 

दसरा म्हटला की दोन-तीन दिवस गणेश चतुर्थीच्या सणासारखं एकत्र कुटुंबात आनंदाने नांदणारी घराणी. आमच्या लहान वयापासून दसऱ्यातील आनंद हा सुखद क्षण असायचा आमच्यासाठी. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचा कळस काही घरांमध्ये पूजला जायचा. कळस पूजलेल्या घरात नऊ दिवस गडी माणूस नऊ दिवस उपवास धरून नवव्या दिवशी सोडायचे. 

नवरात्रीच्या आठव्या दिवशी दसऱ्याचा जागोर असायचा. या दिवशी गुर-ढोरांना त्यांच्या दाव्यावर बांधून रात्रीचे एकत्र येऊन माटोळी बांधली जाते. त्या माटोळीला विविध फळा-फुलांनी सजवली जायची. या सगळ्या गोष्टी लहानपणापासून मी बारकाईने करत आले. घरातील मुलापेक्षा बाबा लहानपणापासून मला या गोष्टी करायला द्यायचे. धनगरी वाड्यावर आमचं घर नसल्या कारणाने गेली पंचवीस वर्षे दसऱ्याचा सण आमचे आम्हीच साजरा करायचो. आमच्या माटोळीला पाच-पाच नारळांची दोन तोरणं केवनाच्या दोरामध्ये डाबनाच्या आधाराने गुंतवली जायची. तोरणं माटोळीला बांधताना पाच जणांचे तरी हात त्या तोरणांना लागायचे. “हार हार चांगभलं” म्हणत तोरणं माटोळीला बांधली जायची. सुपारी, नारळ, पत्वा, तांदळे यांना दैवी स्वरूपात पुजले जायचे. नऊ सुपाऱ्या आमच्या देव्हाऱ्यात पुजल्या जायच्या. 

जागराच्या दिवशी देवाला पुजले जायचे. हळदीचा वापर भंडारा म्हणून या दिवसात नारळाच्या एका वळ्यात हळद ओतून ठेवली जायची. जागराच्या दिवशी परड्यातील करांद्याचा फरावळ, गुळवणी केली जायची. तुपाचा लेप असलेला दूध भात या दिवसात खरी मेजवानी असायची. गुळासोबत नाहीतर वाटाण्याच्या सुख्या भाजीसोबत याचा आस्वाद घेतला जायचा. आमच्या भावडांच‌ं दूधभाताशी जमलंच नाही. त्यामुळे पाण्यातील बेटा भात आमच्या घरी नैवद्य म्हणून असायचा. आमच्या घरी कुड्याच्या पानांवरच नैवद्य दाखवला जायचा. शेणाने सारवलेल्या सुपांमध्ये हा नैवद्य ठेवला जायचा. तो नैवद्य पितळीच्या टोपात केला जायचा. या सगळ्या गोष्टी पाहताना कुड्याचा दाळा, केवनाचे दोर सहजरित्या काढायला शिकले. आरती करण्यासाठी पितळीचा थाळा त्याच्यात पंचारत भंडारा असायचा. आरती करताना सर्व देवांची नावे बाबा श्वास न घेता एका दमात घेत असताना मला काहीच‌ समजत नसे. “हार हार चांगभलं” शेवटाला मी मात्र जोरात म्हणायचे. घोमड्यावर वस्त्रे घालून देव पूजन, जागरा दिवशी दही-ताकाचे दुडगे भरले जायचे. आंंबील, ताकाची कढी, दूधभात हे हमखास माझ्या बालपणात धनगरी वाड्यावर दसऱ्याला महाप्रसाद म्हणून असायचे. दसऱ्याची पाटी ही घराच्या अंगणात नाहीतर माळरानावर काढली जायची. म्हालची पांढर या निराकार दैवी स्वरूप हे आम्हा बांधवांचे दैवत. मग तिचा तो माण असायचा. या वेळीचा आनंदोत्सव गगनाला भिडायचा.

मांडावरील नारळ प्रत्येक घटकाला अनुसरून असायचा ते फोडल्यानंतर एका ताटात घालून खोबरे-खोबरे म्हणून वरती उडवले जायचे. त्यावेळी आम्ही ते जिंकून घ्यायचा प्रयत्न‌ करायचो. त्याचदरम्यान दुडग्यांमधील ताक-शिंपडले जायचे. ते चुकवण्यासाठी आमची एकमेकांना ढकलून पळापळ सुरू व्हायची. त्याचदरम्यान मांडावर गजा नृत्य जोर यायचा.... गडी माणसं आनंदाने गजा नृत्य खेळायचे. घरात धनगरी फुगड्या रंगायच्या. या दिवसांत वर्षातून एकदा मिळालेल्या नवीन कपडे परिधान करण्याचे सुख या दसऱ्याच्या आनंदात आणि सुखद ठरायचे. कालांतराने दुधभाताची चव, आंबील, ताकाची कढी या रूची नुसत्या जीभेवर आजही राहिल्या. ते कष्टाळू हात मात्र कधीचेच नाहीसे झालेत. परंतु दसऱ्याच्या सणातील उत्साह मात्र आजही तेवढाच आहे.

आज गोमंतकातील दसऱ्यात पूर्वीच्या दसऱ्याच्या उणिवा मात्र भासत आहेत. दांडेली, घाट माथ्यावर असलेल्या धनगरी बांधवांच्या दसऱ्यातील चालीराती आजही तशाच आहेत. कालांतराने समाज परिवर्तन घडले तरी‌ आता पुन्हा कुठेतरी आमची पिढी या चालीरिती सांभाळताना दिसत आहेत त्यावरून या सणातील आनंदाला तोटा राहिलेला नाही आहे. आजही केवनाचे दोर रानात शोधताना त्या आठवणी ताज्या होतात. गड्या माणसांसारखं दुडग्यातील ताक घटघट पिण्याचा प्रयत्न आजही असफल ठरतोय माझ्याकडून...


ओनिता वरक, पाल-ठाणे, सत्तरी