ते पिल्लू घाबरून बाजूच्या मोकळ्या जागेतील झाडाझुडपात लपून बसले. एक-दोन दिवस असेच गेले, पण पोटाची भूक काही त्याला सहन होईना. शेवटी ते आमच्या गेटजवळ येऊन थांबले.
आमच्या घराच्या वरच्या रस्त्याच्या बाजूला असलेले मांसाहारी जेवणांचे हॉटेल बंद पडले आणि त्याचा विपरित परिणाम तेथे आजूबाजूला वस्तीला राहणाऱ्या श्वान पथकावर झाला. तिथल्या ग्राहकांनी पानांत सांडलेल्या, उरलेल्या, उष्ट्या खरकट्यावर जगणारी बिचारी कुत्र्याची चिल्ली पिल्ली उपाशी पडू लागली. शेवटी पोटाची भूक सहन न होऊन ती बिचारी विखुरली आणि आजूबाजूच्या गल्लीत, वस्तीत हळूहळू घुसू लागली.
त्यातील एक बिचारे अगदी अशक्त असे किडकिडीत पिल्लू आमच्या गेटपाशी येऊन थबकले. आमच्या पाळीव कुत्र्याने तसेच रस्त्यावरच्या कुत्र्यांनी सगळ्यांनी मिळून भुकून भुंकून अगदी वाडा डोक्यावरच घेतला. ते पिल्लू घाबरून बाजूच्या मोकळ्या जागेतील झाडाझुडपात लपून बसले. एक-दोन दिवस असेच गेले, पण पोटाची भूक काही त्याला सहन होईना. शेवटी ते आमच्या गेट जवळ येऊन थांबले. जेव्हा मी रस्त्यावरच्या कुत्र्यांना जेवू घालायचे, तेव्हा ते दुरून पाहायचे व त्यांचे जेवण झाल्यावर त्यांनी सांडलेले उष्टे खरकटे चाटून फुसून साफ करायचे.
हे पाहून मी त्याला हळूहळू जेवण घालायला सुरुवात केली व त्याचे राणी असे नामकरण केले. का कोण जाणे, काही दिवसातच आमच्या गेट जवळच्या कुत्र्यांना तिची दया येऊ लागली व ते पिल्लू हळूहळू वाड्यावर हिंडू फिरू लागले आणि मग त्यांच्याच मधले एक कधी होऊन गेले ते कोणालाच कळले नाही.
ती जसजशी मोठी होऊ लागली, तशी माझी चिंता वाढू लागली कारण हिला मातृत्व आले तर तिला त्रास होईल या विचाराने मी चिंतीत झाले. तशी वाड्यावरच्या सगळ्या कुत्र्यांना आम्ही ऑपरेशन करून आणले होते आणि सगळी अगदी गुण्यागोविंदाने, आनंदाने, सुखाने वाड्यावर नांदत होती. म्हणून मला राणीबद्दल चिंता वाटू लागली. मग माझे याला फोन कर, त्याला फोन कर, याला सांग, त्याला सांग असे सत्र सुरू झाले. तिच्यासाठी मी जनावरांच्या डॉक्टरांच्या शोधात होते. शेवटी एका सरकारी जनावरांच्या डॉक्टरांचा फोन नंबर सापडला. ते म्हणाले, “ऑपरेशन करण्यासाठी तिला येथे आणावे लागेल.” मग त्यांनी जनावरांच्या दवाखान्यात ऑपरेशनसाठी नेणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरचा फोन नंबर दिला.
तो म्हणाला, “गाडी घेऊन येतोलो माका दोन हाजार पागार कोच्चे पोट्टेले.” मला आश्चर्य वाटले. रागाही आला! पण मी राग गिळून त्याला मायेच्या सुरांत हो म्हणाले. “माझ्या राणीला तू गाडीत घालले की लगेच मी कॅश देते.” असे मी त्याला फोनवरच अगदी विनम्रपणे सांगितले. दोन दिवसांनी येतो म्हणाला आणि अचूक त्या दिवशी तो येऊन टपकला.
त्याची गाडी दारात दिसताच तिने धूम ठोकली आणि ही गायब झाली मी किती हाका मारल्या पण गाडी जाईपर्यंत आलीच नाही. तो थोडा वेळ थांबला आणि निघून गेला. त्याच्यानंतर चार दिवसांनी मी त्याला परत बोलावले. यावेळी मी थोडी सावधगिरी बाळगली. त्याला सांगितले, “तू गाडी दूर ठेव.” त्याने येताना एक मोठा पिंजरा आणून आमच्या गेटच्या तोंडाशी ठेवला. त्या सापळ्यात त्याने चिकन ठेवले. मी राणीला हाका मारल्या, पण राणी काही येईना. ऑपरेशन केलेल्या एका दुसऱ्या वाड्यावरच्या कुत्रीने पिंजऱ्यात प्रवेश करून ते चिकन खायला सुरुवात केली. कशीबशी तिला सापळ्यातून बाहेर काढली.
आता तो रागावलाच होता. “तुम्ही माझा टायम वेस्ट केला. पुढच्या वेळी मी यायला पाहिजे तर तुमच्या राणीला गेटच्या आत साखळीला बांधून ठेवा.” असं म्हणून तो गेला पण राणीला बांधायचे धाडस वाड्यावर कोणाजवळ होते? कारण राणी मुक्त प्राणि... रस्त्यावर वाढलेली, मोकळी फिरणारी आणि तिला बांधताना ती चावली तर?
मी तर प्रयत्नांची पराकष्टा करून थकले होते. आता म्हटलं ‘झक मारू दे, शेवटी तिचे नशीब आणि ती. व्हायचे ते होणार’ आणि जे व्हायचे ते झाले. भर उन्हाळ्यात तिने दोन पिलांना जन्म दिला. मात्र तिच्या गरोदरपणात वाड्यावरच्या सगळ्यांनी तिला पोटभर खाऊ घातले. तिला गुटगुटीत दोन पिल्ले झाली. एक गोरा आणि दुसरी काळी.
हळूहळू ती मोठी होऊ लागली आणि त्यांची भूक वाढू लागली, तशी ती अन्नाच्या शोधात हळूहळू वाड्यावर रस्त्यावर फिरू लागली. आमच्याही गेट शेजारी येऊन बसू लागली. आता ही राणीची दोन्ही पिल्ले मोठे होऊ लागली. जो पांढरा कुत्रा होता त्याला ‘गोरू’ नाव ठेवलं आणि मी तिच्या काळ्याभोर पिल्लूला ‘शाणी’ नाव ठेवलं.
आता परत माझी चिंता वाढायला सुरुवात झाली कारण ‘शाणी’ आता मोठी होऊ लागली होती. आता म्हटलं शेवटचा प्रयत्न करूया म्हणून एक दिवस मी जनावरांच्या दवाखान्यातील त्या गाडी ड्रायव्हरला परत या दोन्ही राणी आणि शाणीला जनावरांच्या दवाखान्यात ऑपरेशनसाठी घेऊन जाण्यासाठी बोलावले. तो दूर गाडी ठेवून हात हलवत आला. परंतु त्याला पाहताच परत ही राणि शाणी गायब! यावेळी मी राणी, शाणीला आमच्या गेटच्या आत घेण्याचा प्रयत्न करणार होते. एकदा गेटच्या आत ती आली. की त्यांना कसे तरी गाडीत किंवा सापळ्यात अडकवता येईल म्हणून मी प्रयत्न करणार होते...
पण दोघी महाठक! लपून बसल्या आणि तो गेल्यावर बाहेर आल्या. आता मी कानाला खडा लावला परत कधीही गाडी बोलवायची नाही. आता राणी आणि शणीला दोघांनाही पिल्ले झाली आहेत. पिल्लांना जन्म दिल्यावर मग दोघीही जेवण जेवण्यासाठी गेटजवळ आल्या. मी दोघींनाही पाहून माझ्या कपाळाला हात मारला आणि म्हटलं “अशी कशी माझी राणी शाणी?”
शर्मिला प्रभू, मडगाव. मो. ९४२०५९६५३९