गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज

जेवणानंतर छातीत जळजळतंय, आंबट ढेकर येतात, खाताना वारंवार ठसका लागतोय का? हे ऍसिड रिफ्लक्समुळे तर नाही ना??

Story: आरोग्य |
28th September, 05:26 pm
गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स  डिसीज

आपल्या पोटाच्या निरोगी स्थितीनुसार खाल्लेली कोणतीही गोष्ट फक्त एका दिशेने, खालच्या दिशेने सरकली पाहिजे. पण जेव्हा आपल्या पोटातील आम्ल मागे उलट दिशेने वर येते म्हणजे अन्ननलिकेकडे आणि घशात जाते, तेव्हा त्याला ऍसिड रिफ्लक्स म्हणतात. असे सातत्याने होत राहिल्यास ते गॅस्ट्रोएसोफेजल 

रिफ्लक्समुळे असू शकते. जीईआरडीची व्याप्ती प्रत्येक पाचव्या व्यक्तीला प्रभावित करण्याची शक्यता असते व ही स्थिती महिलांमध्ये जास्त प्रभावित असते.

‘जीईआरडी’ची लक्षणे

  • जीईआरडीमध्ये पुढील सामान्य लक्षणांचा समावेश असू शकतो.
  • जेवणानंतर घशात व छातीत जळजळ जाणवणे.
  • घशात किंवा तोंडात आंबट द्रव परत येणे.
  • गिळण्यास त्रास होणे.
  • जेवणादरम्यान छातीत तीव्र अस्वस्थता जाणवणे.
  • खाताना ठसका लागणे व सततचा खोकला येणे.

‘जीईआरडी’ची कारणे

अन्ननलिका स्फिंक्टर, अन्ननलिकेच्या तळाभोवती असलेला स्नायूचा एक वर्तुळाकार बँड, गिळताना आराम करतो ज्यामुळे अन्न आणि द्रव आपल्या पोटात जाऊ शकतात, मग स्फिंक्टर नंतर पुन्हा बंद होते. हे स्फिंक्टर कमकुवत झाल्यास किंवा हवे तसे सैल न झाल्यास आपल्या पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येऊ शकते. ऍसिडच्या या सततच्या बॅकवॉशमुळे अन्ननलिकेच्या आतील स्तरात जळजळ होते. अॅसिड रिफ्लक्सची समस्या गंभीर म्हणजे क्रोनीक झाल्यास जीईआरडी आजार होतो. ज्यांना सतत अपचनाचा त्रास होतो किंवा पचनसंस्थेशी संबंधित कोणतीही समस्या असते, त्यांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

‘जीईआरडी’चे परिणाम 

गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसऑर्डर उपचार न केल्यास विविध रोगस्थिती उद्भवू शकतात. अन्ननलिकेच्या अस्तराच्या भागाला इजा झाल्याने सूज येऊन एसोफॅगायटिस होऊ शकतो. पोटातील ऍसिड घशाच्या मागे पोहोचल्यावर घशात जळजळ होऊ शकते. आवाजात कर्कशपणा जाणवू शकतो. फुफ्फुसात जळजळ झाल्यास न्यूमोनिया, ब्राँकायटिस आणि दमा होण्याचा धोका असू शकतो. पोटातील ऍसिडच्या वारंवार संपर्कात आल्याने दातांवरील स्तर नष्ट होऊ शकतो, ज्यामुळे दात किडतात किंवा संवेदनशील होतात. जळजळ झाल्यामुळे अन्ननलिकेतील अल्सर आणि रक्तस्त्राव होऊ शकतो.

‘जीईआरडी’चे निदान

वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि लक्षणांवर आधारित, डॉक्टर जीईआरडी चे निदान करू शकतात. जीईआरडीचे निदान नक्की करण्यासाठी अप्पर एंडोस्कोपी, एसोफेजियल पीएच मॉनिटरिंग, एक्सरे, एसोफेजियल मॅनोमेट्री या तपासण्या केल्या जाऊ शकतात. 

‘जीईआरडी’वर उपचार

गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज यावर उपचाराचा उद्देश लक्षणे कमी करणे, अन्ननलिकेची जळजळ कमी करणे आणि पुढील परिणाम टाळण्यासाठी आहे. त्रास गंभीर नसल्यास जीवनशैलीत बदल करून ऍसिड रिफ्लक्स कमी केला जाऊ शकतो. क्रोनिक ऍसिड रिफ्लक्ससाठी मात्र औषधांची आवश्यकता असते. यात अँटासिड्स, H2 ब्लॉकर्स, प्रोटॉन पंप इनहिबिटर, प्रोकिनेटिक्सचा वापर केला जातो. सर्जिकल उपचारांत लिनक्स डिव्हाइस, ट्रान्सोरल इन्सिजनलेस फंडप्लिकेशन सारख्या उपचारपद्धती वापरल्या जातात.

जीवनशैली आणि घरगुती उपचार

  • जीवनशैलीतील बदलामुळे ऍसिड रिफ्लक्सची वारंवारता कमी होऊ शकते. 
  • निरोगी वजन ठेवा.
  • रात्री उशिरा जेवणे, भुकेपेक्षा अधिक जेवणे टाळा.
  • धूम्रपान, मद्यपान सोडा.
  • आम्लयुक्त जेवण आणि पेये, जास्त चहा-कॉफी, तळलेले पदार्थ खाण्याचे टाळा.
  • जेवताना सर्वकाही नीट आणि हळूहळू चाऊन खा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका.
  • झोपताना आपले डोके बेडच्या पातळीपासून थोडे वर ठेवा.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर