हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय?

हिवाळ्यात त्वचेवर होणाऱ्या वेगवेगळ्या एलर्जीला कसे सामोरे जायचे व त्वचेचा तजेलपणा थंडीतही कसा टिकवून ठेवायचा याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Story: आरोग्य |
12th October, 02:41 am
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय?

अश्विन महिन्यात नवरात्रीत एकदा परतीचा पाऊस अगदी विजांसकट प्रकटला की, त्यानंतर हिवाळा हळूहळू वातावरणात आपली पावले सरकावू लागतो. ‘ऑक्टोबर हिट'चा इफेक्ट संपता संपता आता गारवा जाणवायला लागतो. या बदलादरम्यान अनेकांना असे वाटते की उन्हात त्वचेचा जो तजेलपणा असतो तो थंडीत काहीसा गायब होतो व हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू लागते. अशी कोरडी झालेली त्वचा मग थोडी जरी ताणली गेली तरी लगेच ती भुरकट- पांढरट दिसू लागते व अशा कोरड्या त्वचेचे टॅनिंगही खूप लवकर होते. त्यामुळे अनेकदा अंग काळवंडल्यासारखे दिसते. त्याचबरोबर हिवाळ्यात सोरियासिस, एक्झिमा सारखे अनेक त्वचा विकार होऊ शकतात. हिवाळ्यात थंडीमुळे आपल्या त्वचेवर एक तेलाचा थर असतो. यामुळे आपल्या शरीरात असलेल्या तेलाच्या ग्रंथीतून कमी प्रमाणात तेल बाहेर निघतं व त्वचा कोरडी पडू शकते. 

सोरियासिस : सोरियासिसमध्ये त्वचेवर लाल रंगाचे चट्टे पडतात व त्यावर पांढऱ्या रंगाचे पापुद्रे जमा होतात. हे पापुद्रे दर्शनी भागावर जास्त दिसतात. जसे की, हातांवर, पायांवर, चेहऱ्यावर आणि बऱ्याच वेळेला डोक्यावर असे आजार उद्भवतात. 

अॅटोपिक एक्झिमा (इसब) : आपल्याला सर्दी- दमा हे एलर्जीचे त्रास माहीत आहेत. पण त्वचेचीसुद्धा दम्यासारखी काही एलर्जी असते, ज्याला 'अॅटॉपिक एक्झिमा' म्हणतात. हे प्रमाण शक्यतो लहान मुलांमध्ये पाहायला मिळते, ज्यांची त्वचा फारच सेन्सिटिव्ह असते. यामध्ये त्वचा अतिशय लाल होते, बारीक पाणी भरणाऱ्या पुटकुळ्या येतात आणि तीव्र प्रमाणाची खाज येते.

बऱ्याच वेळा असे त्वचा विकार असताना अनेकदा आपल्याला थंडीत कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ करायला, जोरात साबण लावून घासणे, कडकडीत पाण्याने अंघोळ करणे हे सांगितले जाते. पण या गोष्टी त्वचेसाठी विरूद्ध प्रकारच्या असल्याने, अशाने आजारांना जास्त फोफवायला मदत होऊ शकते.

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?

अति गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे : थंडी असल्याने आपण हिवाळ्यात कडक पाण्याने आंघोळ करतो. पण यामुळे त्वचेतला तेलकटपणा निघून जातो आणि त्वचा कोरडी पडते, खाज सुटू शकते. यामुळे हिवाळ्यात शक्यतो कोमट पाण्यानेच आंघोळ करावी.

मॉईश्चरयुक्त साबण निवडावा : हिवाळ्यात आपण जो साबण निवडतो तो मॉईश्चरयुक्त असला पाहिजे. साबणाच्या दिसण्यावरून किंवा वासावरून तो वापरू नये. पूर्वीच्या काळी लोक नारळाचं दूध काढून अंगाला लावायचे यामुळे त्वचेला खूप फायदा व्हायचा. असे त्वचेला हानिकारक नसणारे घरगुती उपाय आपण करू शकतो.  

भरपूर प्रमाणात पाणी प्यावे : थंडीत तहान जास्त लागत नसली तरी त्वचेमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दिवसात कमीतकमी ३ ते ५ लीटर पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे आहे. 

मॉईश्चरायझरचा वापर करावा : थंडीमध्ये आंघोळीनंतर अंग थोडे ओलसर असतानाच माॅईश्चरायझर लावावे. म्हणजे ते नीट शोषले गेल्याने त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. शक्यतो रात्री झोपताना मॉईश्चरायझर लावावे. त्याचबरोबर ओठांसाठी नियमितपणे लिप बाम किंवा मध आणि साजूक तूप सुध्दा लावल्यास चांगला परिणाम दिसतो. घरामध्ये ओलावा टिकवण्यासाठी ह्युमिडिफायरचा उपयोग करावा.

जास्त स्क्रब करू नये : काही जणी हातापायांना आठवड्यातून दोन- तीन वेळा स्क्रब करतात. पण हिवाळ्यात त्वचा नाजूक झालेली असल्याने वारंवार स्क्रबिंग टाळावे. 

अंग पुसण्याची योग्य पद्धत : काही जण खूप खरखरीत टॉवेलने खूप जोरात घासून अंग कोरडं करतात. असे न करता अंग कोरडे करण्यासाठी टॉवेल अलगदपणे अंगाला लावून फक्त ओलसरपणा टिपून घ्यावा.

सूर्यप्रकाशापासून संरक्षण करावे : हिवाळ्यात सूर्यप्रकाश जास्त तीव्र नसतो पण तरीसुद्धा युवी किरणांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते म्हणूनच हिवाळ्यामध्ये सुद्धा एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा अधिक अशा सनस्क्रीनचा वापर करावा. सुती आणि सैल कपडे वापरावे. 

चांगला आहार घ्यावा : जास्त फॅट्स असणारे पदार्थ किंवा शिळ्या फळभाज्या किंवा पालेभाज्या खाल्ल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते त्यामुळे आहारामध्ये योग्य प्रमाणात विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट असलेली ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर