आली दिवाळी पटापट करा हो तयारी

Story: विशेष |
19th October, 04:08 am
आली दिवाळी पटापट करा हो तयारी

‘यशाची रोषणाई, कीर्तीचे अभ्यंग स्नान 

 मनाचे लक्ष्मीपूजन, समृद्धीचा फराळ 

 प्रेमाची भाऊबीज, असा आनंदाचा लखलखाट’

असा हा आपला हिंदू धर्मातील सर्वात मोठा प्रकाशाचा, मांगल्याचा दिवाळीचा सण आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. दिवाळीच्या उत्साहाबरोबर तेवढीच धावपळ व तयारी खूप मोठी जबाबदारीच म्हणावी. आता फक्त दहा-बारा दिवस असतानाच नियोजनबद्ध तयारी केल्यास ऐनवेळी होणारी तारांबळ टाळून आपण मनसोक्त दिवाळी साजरी करू शकतो. त्यासाठी खालील काही टिप्स वापरू शकता. 

साफसफाई आणि रंगरंगोटीची कामे : 

 दिवाळीत सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सफाईचे पण दोन दिवसांपूर्वी सुरुवात करण्यापेक्षा साफसफाईची आणि रंगरंगोटीची कामे आताच नियोजनबद्ध आखली पाहिजेत. घरातील प्रत्येक सदस्याने खोलीप्रमाणे दर दिवशी दोन तास काढून सफाई केल्यास ही कामे अगदी सहज होऊ शकतात. नियमित आठवड्याची साफसफाई केल्यास डोक्यावर येणारा साफसफाईचा ताण कमी होऊ शकतो. 

फराळाचे काम :  

यावेळी तेलात, तुपात तळलेल्या फराळाऐवजी आरोग्यदायी सुक्यामेव्यापासून केलेल्या पाचक आणि पौष्टिक पदार्थांना फराळांमध्ये समाविष्ट करू शकता. रेडिमेड पेक्षा घरात सहज बनवता येणारे पदार्थ बनवावेत. बाहेरून मिठाई आणण्याऐवजी घरातच दुधापासून खवा बनवून वेगवेगळे पदार्थ बनवण्यास शिकता येईल. दिवाळी सण म्हटल्यानंतर बाहेरच्या पदार्थांमध्ये भेसळही खूप होऊ लागते. माव्यापासून त्यातील रंग, गंध, वर्ख यामध्ये केमिकल्स मिसळलेले दिसून येतात. त्यामुळे घरच्या घरी आरोग्यदायी असे पदार्थ बनवण्यास प्राधान्य द्यावे.

खरेदी : 

आपल्याला दिवाळीत काय हवे आहे याची सूची बनवूनच बाजारात जाऊन हवे तेच निवडक सामान आणून वेळ व पैसे आपण वाचवू शकतो. यावर्षी सामानाच्या यादीतून फटाक्यांना वगळून त्याच पैशांनी घरात काहीतरी नवीन वस्तू आणू शकता. सणानिमित्त बाजारात अनेक सेल लागतात. मात्र या सेलमध्ये खरेदीला जात असाल तर वस्तूंची योग्य ती पारख करून नंतरच खरेदी करा. कारण अनेकदा अशा सेलमध्ये जुन्या, काही त्रुटी असलेल्या किंवा विकल्या न गेलेल्या वस्तू विक्रीस काढल्या 

जातात.

परंपारिक स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य: 

 दिवे, कंदील, कपडे खरेदी करताना आपण परंपारिक स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य दिल्यास मॉल, ऑनलाईन शॉपिंगमुळे नुकसानाला सामोरे जाणाऱ्यांनाही थोडासा मदतीचा हात मिळू शकतो. छोट्या छोट्या स्थानिक व्यापाऱ्यांकडून त्यांनी कष्टाने बनवलेल्या वस्तूंची खरेदी केल्यास त्यांच्या घरातही दिवाळीचा सण आनंदात साजरा होऊ शकतो. चायनीज, प्लास्टिक, पर्यावरणास हानिकारक ठरेल अशा वस्तूंची खरेदी न करणे कधीही उत्तम. 

 घरातील सदस्यांच्या नव्या विचारांना व सर्जनशीलतेला महत्त्व द्या : 

यावर्षी आपल्या मुलांना व ज्येष्ठांना नवनवीन कंदील बनवण्याचा अनुभव घेऊ द्या. यानिमित्त घरातले सदस्य एकत्रित येतील. विचारांचे आदान प्रदान होईल. घर आनंदाने भरून जाईल. जर का त्यांना नवीन रांगोळी, भेटवस्तू, सजावट किंवा एखादा पदार्थ बनवायचा असल्यास त्यांना ती मुभा द्या, त्यांना त्यासाठी प्रोत्साहित करा. प्रत्येकाचे मत घेऊन जबाबदाऱ्या वाटून देऊन, एकत्र काम करा. 

अशा रीतीने आपण पर्यावरण पूरक व सृजनशील पद्धतीने दिवाळीचा सण साजरा करूया. चला तर मग, काढा पेपर पेन आणि करा तुमची यादी व लागा तयारीला कारण ‘आली दिवाळी, पटापट करा हो तयारी!’


 श्रुती करण परब