ज्यूस

आपल्याला जे सहज वाटते ते या बायकांसाठी सहज नसते. एकत्र जमल्यावर पुरुष खाण्या-पिण्यात व्यग्र होऊन, बायकांचा विसर पडल्यासारखे वागणार असतील तर मग कुटुंबाला प्राधान्य द्यायचा तर विचार फार दूरच राहिला.

Story: आवडलेलं |
19th October, 03:05 am
ज्यूस

पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या वडिलांच्या नोकरीनिमित्त ते इंडोनेशियामध्ये होते. माझी दहावीची परीक्षा झाली होती आणि मी सुट्टीसाठी एकटीच त्यांच्याबरोबर गेले होते. मोठी बहीण आणि आई भारतातच होत्या. त्यावेळी वडिलांना ऑफिसच्या एका कामासाठी रविवारी दिवसभर बाहेरगावी जावे लागणार होते. आधीच आठवडाभर ते ऑफिसमध्ये असायचे, फक्त शनिवार रविवार काय तो आम्हाला मिळायचा. त्यातही रविवार पूर्ण दिवस बाहेर गेला, तर घरी मला एकटीला कंटाळा येईल म्हणून त्यांनी मला बरोबर घेऊन जायचे ठरवले. त्यांच्याबरोबर ऑफिसमधले दोघेजण येणार होते. त्यांनाही आपापल्या कुटुंबाला घेऊन यायला सांगितले. 

खरेतर काम जास्त नव्हते. आम्ही जाणार होते ते गावही थंड हवेचे, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण होते. येता-जाता लागणारा वेळ आणि तिथे काम झाल्यावर फिरणे असा आम्ही बेत ठरवला. त्यांच्या बरोबरचे जे होते त्यातल्या एकाची फक्त बायको आली होती. ती वयाने बरीच लहान होती, म्हणजे कदाचित माझ्यापेक्षा सहा-सात वर्षांनी मोठी. दुसऱ्यांबरोबर त्यांची बायको आणि आठ-नऊ वर्षांचा मुलगा. आम्ही घरापासून निघून, मध्ये कुठेतरी या दोन कुटुंबांना भेटलो. तिथून पुढे आम्ही एकत्रच जाणार होतो. 

मला वाटले, एकत्र म्हणजे आता इथून पुढे कदाचित मला त्या दोन बायका आणि मुलाबरोबर जावे लागेल आणि हे तिघेजण, एकत्र काम करणारे, एका कारने जातील.  तीन पैकी एक कार वाटेतच कुठेतरी ठेवतील. पण असे काहीच झाले नाही. मग वाटले, बरोबर आहे.. अजून ओळख कुठे झाली आहे? जरा खायला वगैरे थांबलो की होईल ओळख आणि मैत्री. पण तसेही काही झाले नाही. संपूर्ण दिवसभरात आम्ही हाय/हॅलोच्या पुढे बोललोच नाही. बरे, मी लहान, वेगळ्या देशातली म्हणून माझ्याशी काय बोलणार? असा प्रश्न त्या दोघींना पडलेला असू शकतो. बहुतेक भाषेचाही अडसर वाटत असेल, पण त्या दोघीही एकमेकींशी बोलत नव्हत्या. अगदी खायला, जेवायलाही आम्ही स्वतंत्र टेबलवर बसलो होतो. 

माझे वडील तिथे बरीच वर्षे काम करत होते. त्यामुळे त्यांना हा अनुभव तितका नवीन नव्हता. माझ्या मात्र तो कायम लक्षात राहिला. त्यादिवशी काम थोडेच असल्यामुळे उरलेला वेळ सगळ्यांनी आपापल्या कुटुंबाला दिला. त्यावेळीच माझे वडील मला म्हणाले, “हेच जर भारतात असते तर?” उत्तर आम्हाला दोघांना माहीत होते. “वेगवेगळे अनुभव घेत राहावे...” त्यांनी पुढे सांगितले. खरेतर, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अनुभव घेत राहावे हे त्यांचे म्हणणे देखील अगदी खरेच होते कारण आज या घटनेचा, इतक्या वर्षांनी विचार करताना जाणवते की किती सहज घडतात या गोष्टी? 

आपण नातेवाईकांकडे गेलो तरीही आणि मित्रमंडळीत गेलो तरीही पटकन बायका एकत्र जमतात. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर तिलाही पटकन सामावून घेतले जाते. इतकेच काय, जर कुणाकडे एखादी नातेवाईक काही दिवसांसाठी राहायला आली असेल तर तिलाही परकेपणा वाटू नये म्हणून काळजी घेतली जाते. पुरुषांच्या बाबतीतही असेच होते. याबद्दल कुणाला तक्रार असत नाही. बायका आणि पुरुषांच्या थोड्यावेळ वेगवेगळ्या गप्पा झाल्या की एकत्र गप्पाही होतात. मजा, मस्ती, चिडवाचिडवी होते. पण, हे खरेच असेच होते का कधीतरी काही वेगळे घडण्याची शक्यता आहे? हा प्रश्न पडला तो हल्लीच बघण्यात आलेल्या एका लघुपटामुळे - ‘ज्यूस’. 

बायकांना हे असेच आवडते हे गृहीत धरले जाते का? त्यांनी घरात राबावे आणि खाण्या-जेवणाचे बघावे अशी अपेक्षा त्यांच्यावर लादली जाते का? आपल्या देशातील काही भागातल्या, बऱ्याचशा घरांमध्ये अजूनही पुरुष वरचढ असल्याच्या भ्रमात असतो. त्यातूनच या गोष्टी घडत असाव्यात. आपल्याला जे सहज वाटते ते या बायकांसाठी सहज नसते.  एकत्र जमल्यावर पुरुष खाण्या-पिण्यात व्यग्र होऊन, बायकांचा विसर पडल्यासारखे वागणार असतील तर मग कुटुंबाला प्राधान्य द्यायचा तर विचार फार दूरच राहिला. अर्थात, हा लघुपट केवळ एक विशिष्ट मानसिकता असलेल्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केला आहे. संपूर्ण भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व तो करत नाही. कदाचित, त्यात अतिशयोक्ती असेल. सर्वांना ते पटणार नाही किंवा असे असू शकते असे वाटणारही नाही. पण, काहींना मात्र ‘हे असेच असते त्यात काय?’ असेही वाटू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हा लघुपट बघितल्यावर; अगदी नेहमी नाही, पण काही प्रसंगांमध्ये किंवा कधीतरी वेगळ्याच कोणत्या संदर्भात असे पुरुषप्रधान संस्कृतीचे अनुभव बायकांना आलेले आठवू शकतात किंवा आपल्या वागण्यामुळे बायकांवर नकळत अन्याय होत आहे अशी जाणीव पुरुषांना होऊ शकते.   

याच गोष्टीचा विचार करताना, सुरुवातीला कथन केलेला अनुभव मनात आल्यावाचून राहत नाही. दोन्ही अगदी टोकाच्या गोष्टी. कोणतेच टोक गाठणे हे धोकादायक असते असे म्हणतात. पण, मग काय? सुवर्णमध्य साधताना अनावधानाने एका बाजूचे पारडे जड होत नाही ना हे पडताळून बघत राहणे. शेवटी, एक माणूस म्हणून आपल्या वैयक्तिक आयुष्याइतकेच आपले सामाजिक आयुष्यही सुरळीत असेलच पाहिजे ना?


मुग्धा मणेरीकर, फोंडा