चाळीसावं वरीस धोक्याचं : स्तन कर्करोगाबद्दल जागरूक व्हा

भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग जेमतेम ४० ते ४५ वर्षांच्या आसपास दिसतो. भारतात स्तनाच्या कर्करोगी रुग्ण वाचण्याचे प्रमाण कमी आहेत कारण त्याबद्दल उशीरा समजते. शहरातील महिलांमध्ये कर्करोग हे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाणाचे कारण तर ग्रामीण भागात दुसऱ्या क्रमांकाचे आहे.

Story: आरोग्य |
19th October, 05:02 am
चाळीसावं वरीस धोक्याचं : स्तन कर्करोगाबद्दल जागरूक व्हा

महिलांच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक स्तरावर कर्करोग परिणाम करू शकतो. पण विशेषतः चाळीशीतल्या वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात स्तन कर्करोग आढळून येतो. परदेशातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग साधारणपणे वयाच्या ५० ते ५५ वर्षानंतर आढळून येतो. पण भारतीय महिलांमध्ये जेमतेम ४० ते ४५ वर्षां आसपास दिसतो. भारतात स्तनाच्या कर्करोगी रुग्ण वाचण्याचे प्रमाण कमी आहेत कारण त्याबद्दल उशीरा समजते. शहरातील महिलांमध्ये कर्करोग हे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाणाचे कारण तर ग्रामीण भागात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. तसेच तरुण महिलांमध्ये प्रजननक्षम वयोगटात सक्रिय संप्रेरकांच्या चढउतारांमुळे स्तनाचा कर्करोग अधिक असल्याचे जाणवते तर पुरुषांमध्ये हे प्रमाण १% आहे. स्तनाच्या कर्करोगाला प्रतिबंध करता येत नाही. पण सुरुवातीलाच निदान झाले तर त्यावर उपचार करता येतात.

स्तनातील सर्वच गाठी कर्करोगाच्या नसतात. त्यापैकी केवळ ३० ते ४० टक्के गाठी कर्करोगाच्या असतात व त्यासोबत पुढील  लक्षणे दिसू शकतात.

  1.  स्तनाच्या आकारात कोणताही बदल होणे.
  2.  स्तनावरील त्वचा सुरकुतलेली दिसणे.
  3.  स्तनाग्रातून दुधाव्यतिरिक्त स्राव बाहेर पडणे.
  4.  स्तन किंवा काखेमध्ये नवीन गाठी किंवा लम्प तयार होणे.
  5.  स्तनाग्रांच्या आकारात बदल, वेदना किंवा लालसरपणा जाणवणे.
  6.  स्तनामध्ये वेदना, सूज आढळून येणे.

वरील शारीरिक लक्षणांसोबत स्तनाच्या कर्करोगामुळे रुग्णावर भावनिक आणि मानसिक परिणामही होतात.

कारणे कोणती?

अनुवंशिक कारणांमुळे, कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. या महिलांसाठी कमी वयापासूनच नियमितपणे कर्करोगाच्या संबंधित विविध तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. कमी वयात मासिक पाळी सुरू झाल्यास किंवा खूप लवकर किंवा उशिरा रजोनिवृत्ती झाल्यास स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते. कुटुंब नियोजन औषधांच्या अतिरेकाने देखील स्तन कर्करोगाचा धोका वाढतो. व्यसनाधिनतेमुळे, लठ्ठपणामुळे, अधिक चरबीयुक्त आहाराचे सेवन करणाऱ्या महिलामध्ये स्तन कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी स्तनाच्या नियमित तपासण्या महत्त्वाच्या आहेत. नियमित स्वयं स्तन तपासणी आणि मॅमोग्राम स्तनातील विकृती वेळीच शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीराशी संबंधित सूक्ष्म बदलांकडे लक्ष देऊन आरोग्यासंबंधित समस्यांना आपण प्रतिबंध करु शकतो.

निदान कसे करतात?

स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राम, अल्ट्रासाऊंड, बायोप्सी इत्यादींसोबत हल्ली जेनेटिक टेस्टचाही वापर केला जातो. रुग्णाला औषधे, स्तनाची शस्त्रक्रिया, अत्याधुनिक स्थितींमध्ये केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोनल इंजेक्शन्स इत्यादी उपचार दिले जातात.

जेनेटिक टेस्ट

स्तनाचा कर्करोग हा बीआरसीए जनुकाद्वारे (जीन) एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचतो. यामुळे कर्करोग झालेल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पूर्वी कर्करोग झालेला असेल तर या अनुवांशिक धोक्याची चाचणी बीआरसीए जेनेटिक टेस्टद्वारे ओळखळी जाऊ शकते. या चाचणीद्वारे, एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या स्तन कर्करोगाचा धोका कितपत आहे हे शोधणे शक्य होऊ शकते.

मॅमोग्राम चाचणी

मॅमोग्राम या स्क्रीनिंग चाचणीमध्ये स्तनाचा एक्स-रे केला जातो व यातून स्तनाचा कर्करोग किंवा ट्यूमर ओळखला जाऊ शकतो. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलेने दर दोन वर्षांनी एकदा नियमित चाचणी करून घेतली पाहिजे. मॅमोग्राम कर्करोगाचा प्रतिबंध करत नाहीत, पण ते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग ओळखू शकतात, ज्यामुळे लवकर उपचार शक्य होतात. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांनी कमी होऊ शकते.

महिलांमध्ये गेल्या काही वर्षांपासून स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. फक्त नवे रुग्णच नाही, तर एकदा कर्करोग झालेल्या रुग्णांना तो पुन्हा होण्याचा धोकाही गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. आकडेवारीनुसार स्तन कर्करोगाच्या प्रथम निदानानंतर १० वर्षांच्या आत तो परतण्याची शक्यता ३० टक्‍के ते ६० टक्क्‍यांपर्यंत दिसून येते.

थोडक्यात, ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया, विशेषत: ज्यांना कौटुंबिक इतिहास किंवा जीवनशैलीच्या समस्यांसारख्या जोखीम घटक आहेत, त्यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीला प्राधान्य दिले पाहिजे. ही एक साधी पायरी आहे जी आपले जीवन वाचवू शकते. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि ४० व्या वर्षापासून स्वतःची नियमित तपासणी करा.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर