थिवीवासीयांचा निर्धार : गावची नैसर्गिक संपदा नष्ट होण्याचा दावा
थिवी पंचायत सभागृहात आयोजित राज्य खासगी विद्यापीठ विरोधी जनजागृती सभेत बोलताना माजी आमदार किरण कांदोळकर व उपस्थित ग्रामस्थ. (उमेश झर्मेकर)
म्हापसा : थिवी येथील डोंगर माथ्यावर कोमुनिदादच्या मालकीच्या दोन लाख चौरस मीटर जागेत नियोजित राज्य खासगी विद्यापीठ स्थापन करण्याच्या सरकार व कोमुनिदादच्या निर्णयाला थिवीवासीयांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या विद्यापीठामुळे गावची नैसर्गिक संपदा नष्ट होणार असल्याचा दावा करीत या विद्यापिठाच्या विरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
रविवारी ६ रोजी संध्याकाळी ग्रामपंचायत सभागृहात या प्रकल्पा संदर्भात स्थानिकांनी जनजागृती सभा घेतली. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या संस्थेच्या या खासगी विद्यापीठाला सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने तत्वत: मान्यता दिली आहे. शिवाय या जमिनीचे म्यूटेशनद्वारे मालकीहक्क संबंधित संस्थेच्या नावे हस्तांतरित केले आहेत. या प्रकाराला या बैठकीत जोरदार आक्षेप घेण्यात आला.
या बैठकीत माजी आमदार किरण कांदोळकर, माजी सरपंच प्रेमानंद म्हावळींगकर, पर्यावरणप्रेमी स्वप्नेश शेर्लेकर, रॉबर्ट कुलासो, गॉडफ्री डिमेलो आदींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार किरण कांदोळकर म्हणाले की, सरकार लोकांना अंधारात ठेवून हा प्रकल्प राबवू पाहते. गोवा गुंतवणूक प्रोत्साहन व सुविधा मंडळांतर्गत सरकार हा प्रकल्प थिवीवासियांच्या माथी मारू पाहत आहे. या प्रकल्पास हरकत घेण्याचे अधिकार स्थानिक पंचायतीजवळ नाहीत. यातून कोमुनिदादला ५ कोटी रुपये मिळाले असले असून प्रत्यक्षात २०० कोटींची जमीन कोमुनिदादने या खासगी संस्थेला दिली आहे. या एकंदरीत प्रकारात महाघोटाळा झाला आहे. सरकार आणि स्थानिक आमदार लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी सरपंच प्रेमानंद म्हावळींगकर म्हणाले की, आम्हाला गावातील डोंगर व निसर्ग हे भावी पिढ्यांसाठी राखायचे आहेत. अशाप्रकारे खासगी विद्यापीठाच्या नावाने डोंगर उद्धवस्त करू देणार नाही. ज्यास्थळी विद्यापीठ येवू पाहते, तिथे धनगर समाजाचे वास्तव्य आहे. त्यांच्या उपजीविकेवर गंडातर येईल. वीज, पाणी तसेच या विद्यापीठाच्या सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होऊन गाव नष्ट होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
गोवा विद्यापीठाच्या दर्जाकडे लक्ष द्या!
रॉबर्ट कुलासो म्हणाले की, आम्ही हे विद्यापीठ इथे येवू देणार नाही. राज्यातील विद्यापीठचा दर्जा घसरत चालला आहे, याकडे सरकारने लक्ष द्यावे. हे प्रकरण तसेच कोमुनिदाद व्यवस्थापकीय समितीच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार. आमच्या बाजूने अॅड. कार्लुस फेरेरा हे बाजू मांडतील. शिवाय आम्हाला माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर व माजी आमदार किरण कांदोळकर यांचा पूर्ण पाठिंबा आहे.