बार्देश : कामुर्ली कोमुनिदादने फेटाळला सनर्बन आयोजनाचा प्रस्ताव

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th October, 04:39 pm
बार्देश : कामुर्ली कोमुनिदादने फेटाळला सनर्बन आयोजनाचा प्रस्ताव

म्हापसा : कामुर्ली कोमुनिदादने सनबर्न संगीत महोत्सव आयोजनाचा प्रस्ताव सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते फेटाळला आहे. पुढील पाच वर्षे अशा ईडीएम महोत्सवांना परवानगी न देण्याचा निर्ण़यही बैठकीत घेण्यात आला. हा महोत्सव होऊ नये म्हणून रहिवाशांनी विरोधाची भुमिका घेतली होती.  

आज  रविवारी ६ रोजी सकाळी पंचायत सभागृहात सुमारे दीड तास बंद दाराआड कोमुनिदादची ही सभा घेण्यात आली. गावकारांनी एकमताने गावाच्या पठारावर सनबर्न आयोजित करण्यास विरोध केला व हाच ठराव सर्वानुमते मंजूर केला.  

दरम्यान कोमुनिदादच्या जागेत सनबर्न आयोजित करण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव स्पेस बाऊंड वेब लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक कार्यालयाकडे सादर केला होता. नंतर हा प्रस्ताव कामुर्ली कोमुनिदादकडे पाठवून देण्यात आला. 

त्यानुसार कोमुनिदादने गावकारांची  बैठक बोलावली होती. या सर्वसाधरण बैठकीत एकूण १९८  गावकारांपैकी फक्त ६८ गावकार हजर राहिले.  सभागृहाबाहेर सनबर्नला विरोध करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर कोमुनिदादचे अध्यक्ष वासुदेव नाईक गावकर व अ‍ॅटर्नी हरी प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना, सनबर्न आयोजनासाठी जागा देण्यासंदर्भात प्रस्ताव कोमुनिदादकडे आला होता. यावर सर्वसाधारण बैठकीत सविस्तर चर्चा झाली व एकमताने सनबर्नला गावात परवानगी देवू नये, असा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती दिली. 

 सनबर्नमुळे गावाचा फायदा होणार नाहीच उलट गावाची शांतता भंग होईल. सदर जागेवर नैसर्गिक संपत्ती आणि जागृत गोबरेश्वर देवस्थान आहे. याच देवाने सर्वांच्या मनावर दृष्टी पाडत, एकमताने महोत्सवास विरोध करीत आयोजकांचा प्रस्ताव फेटाळून लावला, असे माजी सरपंच शरद गाड म्हणाले. 

अशाप्रकारच्या महोत्सवात ड्रग्सचे व्यवहार सर्रास होतात. काहींनी याचे गावात आयोजन व्हावे यासाठी प्रयत्न करून ग्रामस्थांना त्रासात घालण्याचे काम केले. मात्र गावकार आणि इतर ग्रामस्थांनी त्यांचे मानसुभे उधळून लावल्याचे गाड यांनी म्हटले. दरम्यान, कामुर्ली कोमुनिदादने या जागेत सनबर्नचे आयोजन करण्यास नकार दिल्यामुळे आता आयोजकांना महोत्सवासाठी  जागेचा शोध इतरत्र घ्यावा लागणार आहे.


हेही वाचा