‘अफू’च्या गोळीपासून दूरच रहा!

धर्माधर्मांत फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे लक्ष न देता गोव्यातील धार्मिक सलोखा टिकवून ठेवतानाच गोव्याच्या अस्मितेचा, गोव्याच्या अस्तित्वाचा विषय जेव्हा उपस्थित होईल त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची तयारी ठेवायला हवी. कुठल्याही छुप्या कारस्थानांना बळी न पडता आणि खासकरून राजकीय शक्तींपासून अंतर ठेवून गोव्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याचा निर्धार करण्याची गरज आहे. शेवटी धर्म ही अफूची गोळी आहे, असे कार्ल मार्क्स यांनी म्हटले होते. या गोळीपासून सावध राहणे यातच गोव्याचे हीत आहे.

Story: उतारा |
4 hours ago
‘अफू’च्या गोळीपासून दूरच रहा!

सुभाष वेलिंगकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नेते. गोव्यातील संघचालक. एकेकाळी संघाच्या निर्णायक फळीमध्ये वेलिंगकर यांचे स्थान मोठे होते. संघाने भाजपला दिलेल्या काही नेत्यांना वेसण घालण्याचे कामही वेलिंगकरच करायचे. सुरुवातीला गोव्यात भाजप सरकार स्थापन झाले, त्यावेळी वेलिंगकरांच्या बोटावरच सरकार नाचायचे. पर्रीकरांना पणजीतून निवडणुकीत उतरवण्यामागेही वेलिंगकरच होते. त्यामुळे वेलिंगकरांचा भाजपवर, भाजप सरकारवर सुरुवातीच्या काळात वचक होता. भाजपचे सरकार कोसळल्यानंतर २००५ ते २०१२ पर्यंत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी त्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती, त्यातही भाजपने वेलिंगकरांचा आधार घेतला. मातृभाषा आंदोलन उभे करून काँग्रेस सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती केली. पण सत्ता मिळाल्यानंतर वेलिंगकरांना वैयक्तिक मतभेदांमुळे दूर ठेवण्यात आले. वेलिंगकरही निवृत्तीनंतर सर्वच नेत्यांवर आगपाखड करू लागले. त्यामुळे शेवटी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर ठेवलेच. पण, त्यांचे वैयक्तिकरित्या मोठे नुकसान करण्याचाही प्रयत्न केला.

वेलिंगकर यांनी नेहमीच आपल्या मोठ्या मुलाची नोकरी हा राजकीय सूड होता असे जाहीरपणे सांगितले आहे. वेलिंगकरांनी नंतर राजकीय पक्षही स्थापन केला. पण त्यांना यश आले नाही. राज्यात संघाला समांतर संघ स्थापन केला. पण तो कार्यकर्ता बऱ्याच आधी भाजपच्या आश्रयाला गेला. त्यामुळे गेल्या दशकभरात वेलिंगकरांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले. सध्या त्यांनी नवा विषय काढला आहे तो म्हणजे, जुने गोवे येथे असलेल्या सेंट झेवियर अर्थात गोंयच्या सायबाच्या शवाचा ‘डीएनए’ तपासण्याचा.

दरवर्षी वेलिंगकर नोव्हेंबर-डिसेंबरच्या काळात सेंट झेवियरच्या काळातील गोष्टींना उजाळा देत प्रसिद्धी पत्रके काढत असतात. आपल्याला जे सिद्ध करायचे आहे, त्यासाठी वेलिंगकर समाजातील शांतता बिघडेल याचा विचार न करता आपले मत मांडत असतात. कदाचित लक्ष वेधण्यासाठी त्यांचा हा खटाटोप असावा. अन्यथा कोणाच्याही श्रद्धा दुखावण्यासाठी कोणाच्या श्रद्धास्थानांवर बोलण्याचा अधिकार कोणाला नाही. एकमेकांच्या देव, धर्मांवर बोलून, श्रद्धास्थानांविषयी बोलून, एकमेकांच्या धर्माचा अनादर करून गोव्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आणि दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून होत आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरूनही असाच वाद निर्माण केला गेला. त्यावेळी शिवाजींचा अवमान करणारे फादर बोल्मेक्स परेरा यांनी वेलिंगकरांच्या विषयावरून सुरू झालेल्या वादात चांगली भूमिका घेतली. बहुतेक बोल्मेक्स परेरा यांना आपली चूक समजली असावी. एखाद्या धर्माच्या श्रद्धास्थानांवर बोलून दुसऱ्यांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणाला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एकमेकांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणे नव्हे. यापूर्वी फादर बोलमेक्स यांनी शिवाजींविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शिवभक्तांनी पोलीस स्थानकावर मोर्चा नेला होता. त्यावेळी ख्रिस्ती बांधव बोल्मेक्स यांच्या समर्थनात उतरले होते. आता वेलिंगकर यांनी थेट सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा ‘डीएनए’ तपासण्याची मागणी केल्यामुळे ख्रिस्ती बांधव राज्यभर आंदोलन करत आहेत. वेलिंगकरांवर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. 

पोलिसांनी वेलिंगकर यांच्यावर गुन्हा नोंदवला. त्यांचा शोधही सुरू केला. पण वेलिंगकरांचे फोनही बंद आहेत आणि ते अद्यापही सापडलेले नाहीत. त्यांनी लगेच पणजीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. अर्जावर सुनावणी झाली, पण त्यांना अंतरिम दिलासा मिळालेला नाही. पण पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

वेलिंगकर यांच्या विधानामुळे ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. शेकडो वर्षांपासून सेंट फ्रान्सिस झेवियर यांना ‘गोंयचो सायब’ म्हणत देश-विदेशातून लाखो भाविक त्यांच्या शवाच्या दर्शनासाठी येतात. दहा वर्षाने होणाऱ्या शवप्रदर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. शासकीय स्तरावर संपूर्ण खर्चाने शवप्रदर्शन आयोजित केले जाते. सुमारे चारशे कोटी यासाठी खर्च केले जातात. भाजपच्या राजवटीत चांगल्या सोयी सुविधा यासाठी तयार केल्या गेल्या हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे भाजपकडूनच वेलिंगकर यांना पेरले गेल्याचा जो दावा केला जात आहे, त्याला काहीही अर्थ नाही. वेलिंगकर आणि सरकार किंवा भाजपचे गोव्यातील नेते त्यांच्यातून विस्तवही जात नाही. वेलिंगकरांचे एकेकाळचे सरकारवरील वर्चस्व आता राहिलेले नाही. उलट तेच सरकारवर आगपाखड करत असतात. त्यामुळे जमीन रुपांतरणावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी वेलिंगकरना पेरल्याच्या दाव्यामध्ये अर्थ नाही. पण ज्या पद्धतीने फादर बोल्मेक्स परेरा यांनी म्हटले आहे की गोंयकारांनी गोवा सांभाळण्यासाठी, गोव्याच्या जमिनी राखण्यासाठी एकत्र यायला हवे. वेलिंगकर सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत आता जे बोलले आहेत, तेच ते दरवर्षी बोलतात. पण याचवेळी आंदोलने तयार झाली. त्यामुळे वेलिंगकरांना पेरण्यापेक्षा आंदोलकांना पुढे करणारे किंवा फूस लावणारेही काही घटक असू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. कारण ही सगळी राजकीय चाल असू शकते.

फादर बोल्मेक्स यांनी ‘गोमंतकीय जागे झाले पण ही जागृती जरा जास्तच होते. धर्मावरून वाद, भांडण नको. गोव्यात शांती हवी. धर्मांमध्ये तणाव निर्माण करून बेकायदा जमीन रुपांतरापासून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सावध व्हा’ असा सल्ला दिला असून, तो योग्य आहे. आमच्या श्रद्धास्थानांविषयी कोणीतरी विधान केले, मग ते बोल्मेक्स असो किंवा वेलिंगकर असोत म्हणून आमच्या श्रद्धास्थानांना, श्रद्धेला थोडाच तडा जाणार आहे? पोलीस आणि न्यायालय योग्य ती कारवाई करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होईल, असे वर्तन कोणी करू नये. रस्त्यांवर उतरून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा पायंडा कोणीच घालून देऊ नये. आज वेलिंगकरांच्या विधानामुळे रस्त्यावर उतरलेल्या ख्रिस्ती बांधवांना पाहून उद्या दुसऱ्या धर्मातील लोकही हीच पद्धत अवलंबणार नाहीत कशावरून? सर्वांनी एक लक्षात घ्यायला हवे की गोव्यातील जनतेच्या संवेदनशीलतेचा अंत पाहण्याचाही प्रयत्न काही घटक करत असतील. अन्यथा 

शिवाजी महाराज, जुलूस, सेंट झेवियर यांच्या विषयावरून पुन्हा पुन्हा गोव्यात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न झालेच नसते. काही अदृश्य शक्तीही यामागे असू शकतात. धर्माधर्मांत फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे लक्ष न देता गोव्यातील धार्मिक सलोखा टिकवून ठेवतानाच गोव्याच्या अस्मितेचा, गोव्याच्या अस्तित्वाचा विषय जेव्हा उपस्थित होईल त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची तयारी ठेवायला हवी. कुठल्याही छुप्या कारस्थानांना बळी न पडता आणि खासकरून राजकीय शक्तींपासून अंतर ठेवून गोव्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याचा निर्धार करण्याची गरज आहे. शेवटी धर्म ही अफूची गोळी आहे, असे कार्ल मार्क्स यांनी म्हटले होते. या गोळीपासून सावध राहणे यातच गोव्याचे हीत आहे.


पांडुरंग गांवकर

९७६३१०६३००

(लेखक दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.)