जगाला हवामान बदलाच्या तीव्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे. खरेतर हवामान बदलास भारतासह इतर विकसित देशही अधिक कारणीभूत आहेत. सध्या भारतासह नेपाळ देशाला पूर आणि भूस्खलनाचा सामना करावा लागत आहे.
नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचे संकट ओढवले आहे. नेपाळमधील पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनांत आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला असून, १२६ लोक जखमी आहेत तसेच, २६ जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती नेपाळच्या गृहमंत्रालयाने व्यक्त केली आहे.
अनेक ठिकाणचे रस्ते आणि पूलही वाहून गेले आहेत. पावसामुळे नदी-नाले भरून वाहत असून नदीकाठच्या भागातील अनेक घरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. अनेक महामार्ग, राजधानी काठमांडूला जोडणारे अनेक रस्तेही पावसामुळे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडचणी येत आहेत.
२९ सप्टेंबरपर्यंत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पावसाचा मुक्काम वाढण्याचा अंदाज आहे. याबाबत नेपाळ पोलिसांचे उप-प्रवक्ते वरिष्ठ अधीक्षक बिश्वो अधिकारी हे म्हणाले की, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे. धाडिंगजवळ दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड हटवून रस्ता मोकळा करण्यासाठीचेही प्रयत्न सुरू आहेत. नेपाळच्या विविध भागांमध्ये दरड कोसळून महामार्ग बंद झाल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. तेथे अडकून पडलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
काठमांडूमधील चंद्रगिरी नगरपालिका आणि धाडिंगच्या सीमेवरील झापलेखोला येथे भूस्खलनानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या वाहनांमधून २१ मृतदेह बाहेर काढण्यात आले. सशस्त्र पोलीस दलाचे सह-प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी या ठिकाणाहून १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर आतापर्यंत पुरात अडकलेल्या ३,६०० हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे ३०० हून अधिक घरे आणि १६ पुलांचे नुकसान झाले आहे. यासह चार काँक्रिट पूल, तीन सस्पेंशन पूल आणि ७ विविध प्रकारचे पूलही वाहून गेल्याची माहिती आहे. काठमांडू घाटातील तीन जिल्ह्यांमधून जवळपास २ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून जगाला बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी, पूर, भूस्खलन अशा घटना सध्या जगात घडत असून याची कारणही मानव निर्मित आहेत.
गणेशप्रसाद गोगटे