प्रशासनातील समन्वयाचा अभाव आणि कंत्राटदारांची मनमानी वृत्ती याचा फटका बहुतेक वेळा सर्वसामान्य जनतेला बसतो. जहनाबाद येथील महामार्गाचे बांधकाम याचे ताजे उदाहरण आहे. हा रस्ता बांधण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु वन विभागाची झाडे कापण्याला परवानगी न मिळाल्यामुळे झाडे तशीच ठेवून सभोवती रस्ता बांधून पूर्ण केला आहे. येथे दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे. प्रशासनाच्या एकंदरच कारभाराबाबत जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राजधानी पटनापासून ५० किमी अंतरावर जहनाबाद येथे हा रस्ता बांधण्यात आला आहे. पटना ते गया महामार्गाचा भाग असलेला हा रस्ता ७.४८ किलोमीटरचा आहे. पूर्ण वाढ झालेली मोठी झाडे रस्ता बांधताना कापली गेलेली नाहीत. रस्ता बांधणी करताना प्रशासनाने वन विभागाकडे झाडे कापण्याची परवानगी मागितली होती. नियमानुसार जितकी झाडे कापली जातील, त्याच्या तिप्पट झाडे लावली जाणे आवश्यक असते. त्यानुसार ही झाडे कापण्याच्या बदल्यात वन विभागाने १४ हेक्टर जमिनीची मागणी केली होती. तेवढी जागा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने वन विभागाने ‘ना हरकत’ दाखला (एनओसी) दिला नाही. कंत्राटदाराने मात्र झाडे न कापता रस्ता बांधून पूर्ण केला. अपघाताचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनाने झाडांना रेडियम लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
सूर्याच्या प्रकाशात या रस्त्यावरून वाहने चालवताना चालक झाडे पाहून वळून जातात; परंतु रात्रीच्या अंधारात ही झाडे जीवघेणी ठरत आहेत. आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली नसली तरी अनेक दुचाकीस्वारांना अपघात झाले आहेत. सरकारच्या निष्काळजीपणामुळे जनतेचे जीवन धोक्यात आले आहे. रस्ता बांधला गेला; पण मूलभूत सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्त्याचे काम सुरू असताना प्रशासनाच्या विभागांमध्ये समन्वय का नव्हता, कायदेशीरदृष्ट्या सर्व बाबींची पूर्तता करूनच रस्ता का बांधला नाही, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
रस्त्याच्या मधोमध असलेली ही झाडे एका ओळीत नाहीत. कोणतेही झाड कुठेही असल्याने झाडांमुळे किरकोळ अपघातही झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपाय केले जात आहेत. रिफ्लेक्टर बसवण्यात आले आहेत, ड्रमही उभारण्यात आले आहेत. या झाडांना धडकल्याने मोठी दुर्घटना घडली आणि एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, या प्रश्नाचे सरकारकडे उत्तर आहे का?
- प्रदीप जोशी