‘कर्तृत्वशून्यते’च्या सापळ्यात काँग्रेस नेतृत्व

काँग्रेस संघटनात्मक दुर्बलतेत अडकलेली असून राहुल गांधी अपप्रचारावर भर देतात. सत्याऐवजी असत्य कथनावर भर देणारे राहुल गांधी ‘कर्तृत्वशून्यते’च्या सापळ्यात अडकले आहेत.

Story: विचारचक्र |
13 hours ago
‘कर्तृत्वशून्यते’च्या सापळ्यात काँग्रेस नेतृत्व

काँग्रेसचे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक निकालावरून निवडणूक आयोगावर आरोपांची राळ उडवणे चालूच ठेवले आहे. महाराष्ट्रातील पराभव राहुल गांधींना पचवता न आल्याने त्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात आठ टक्के मतदार वाढले, असे म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर खोट्या आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे. फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आरोपातील हवा काढून घेताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघात झालेल्या मतदारवाढीची आकडेवारीच सादर केली. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उबाठा, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे स्वप्नभंग झाले.

लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे महाविकास आघाडीचे नेते विधानसभा निवडणूक जिंकल्याच्या तोऱ्यात वावरत होते. लोकसभा निवडणुकीतील यश हा अपघात होता, हे मानण्यास महाविकास आघाडीचे नेते तयारच नव्हते. राजकारणात असे अपघात वारंवार घडत नसतात, याचा शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही विसर पडला. लोकसभा निवडणुकीत ९९ जागा मिळाल्यामुळे राहुल गांधींचे विमान भलतेच वर गेले होते. ९९ जागा मिळणे हा आपल्या नेतृत्वाचा विजय आहे, अशा भ्रमात वावरणाऱ्या राहुल गांधींनी स्वतःबद्दल अनेक गैरसमज करून घेतले आहेत.

संविधान बदलाचा अपप्रचार, शहरी नक्षलवादी शक्तींनी अनेक समाजघटकांमध्ये निर्माण केलेले दहशतीचे वातावरण याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने वाटलेले फॉर्मचे प्रकरण निकालानंतर उजेडात आले. लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणा विधानसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला पुन्हा धक्का दिला. हरयाणाच्या निवडणुकीत संविधान बदलाच्या अपप्रचारातील हवा निघून गेली होती.

निवडणुकीतील विजयासाठी संघटनात्मक बाजूकडे विशेषत्वाने मेहनत घ्यावी लागते. नवीन मतदारांची नोंदणी, जुन्या मतदार यादीतील नावांतील दुरुस्त्या, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांची मतदार म्हणून नोंदणी, मयत मतदारांची नावे वगळणे अशा अनेक गोष्टींकडे संघटनेला लक्ष द्यावे लागते. काँग्रेसच्या संघटनेला अनेक वर्षांत अशा मुद्द्यांकडे लक्ष देण्याची सवयच राहिलेली नाही.

इंदिरा गांधी यांच्या वलयामुळे १९७१, १९८० अशा दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये तसेच अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही मोठे बहुमत मिळत असे. १९७० च्या दशकापर्यंत काँग्रेसची संघटना गल्लीपासून दिल्लीपर्यंत लक्षणीय प्रमाणात सक्रिय होती. पक्ष सदस्य नोंदणी, नेते-कार्यकर्त्यांसाठी अभ्यास शिबिरे असे अनेक उपक्रम काँग्रेसकडून होत असत. इंदिरा गांधी यांनी काँग्रेसची पक्ष संघटना हळूहळू संपवून टाकली. नेहरू-गांधी घराण्याची हुजरेगिरी करणाऱ्या मंडळींना सरकारमध्ये आणि संघटनेमध्ये मानाचे पान मिळू लागले.

पंडित नेहरूंच्या कृपेमुळे इंदिरा गांधींना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले. मात्र त्यानंतर आपले नेतृत्व प्रस्थापित करताना इंदिरा गांधींना मोठा संघर्ष करावा लागला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी झटका दिल्यानंतर इंदिरा गांधी जनतेत पुन्हा गेल्या. राहुल गांधींना या पद्धतीने संघर्ष करत राजकारण करण्याची सवय नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगावर आरोपांची राळ उडवण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून त्यांना आपल्या नेतृत्वातील दोषांवर पांघरूण घालायचे आहे.

इंदिरा गांधी यांनी जनता पक्षातील मतभेदांमुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी ओळखली. याच मुद्द्याचा वापर करत इंदिरा गांधींनी मतदारांना साद घातली. राहुल गांधींचे नेतृत्व मतदारांना काँग्रेसकडे आकृष्ट करण्यास वारंवार अपयशी ठरले आहे. राहुल गांधींना मतदारांमध्ये आपल्या नेतृत्वाबद्दल विश्वासार्हता निर्माण करण्यात सातत्याने अपयश येत आहे. २०१२च्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी काँग्रेसचे मुख्य प्रचारक होते. तेव्हापासून आतापर्यंत राहुल गांधींना मतदारांनी सातत्याने नाकारले आहे. कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये स्थानिक नेतृत्वाने केलेल्या संघर्षामुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला आहे. या विजयात राहुल गांधींचे काहीच योगदान नाही.

मतदार आपल्याला सातत्याने का नाकारत आहेत, याची कारणे शोधून त्याप्रमाणे आपल्या वर्तनात बदल करण्याऐवजी राहुल गांधींनी अपप्रचाराचा कुटील मार्ग स्वीकारला आहे. धादांत खोटी माहिती प्रसारित करून मतदारांमध्ये अस्वस्थता, असंतोष निर्माण करण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना असत्य कथनाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. चर्चेदरम्यान राहुल गांधींनी अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत हुतात्मा दर्जा दिला जात नाही, याशिवाय हुतात्मा झालेल्या अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांनाही मदत दिली जात नाही, असा आरोप केला होता. यावेळी राहुल गांधींनी बुलढाण्यातील हुतात्मा अग्निवीर अक्षय गवते याचा उल्लेख केला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांचा आरोप सपशेल खोटा असल्याचे लोकसभेतच सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या दाव्यानंतर हुतात्मा अग्निवीरचे वडील लक्ष्मण गवते यांनी त्यांना आतापर्यंत एकूण एक कोटी दहा लाख रुपयांची मदत मिळाल्याचे सांगितले. त्यानंतरही राहुल यांनी आपला ‘असत्य कथन’चा घेतलेला वसा चालूच ठेवला.

‘सत्य की रक्षा हर धर्म का आधार है!’ असे म्हणत राहुल गांधींनी हुतात्मा अग्निवीर अजय सिंह यांच्या कुटुंबीयांना लष्कराकडून कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळाले नसल्याचा दावा एक्स या समाजमाध्यमावर केला होता. राहुल गांधींनी हा दावा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजय सिंह याच्या वडिलांनी लष्कराकडून आपल्याला भरपाई मिळाल्याचे स्पष्ट केले. या मुद्द्यावरून राजकारण करू नका, अशी विनंती करणारा अजय सिंह यांचे वडील चरणजीत काला यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता.

राहुल गांधींनी जनतेमध्ये सरकारविषयी, व्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण व्हावा, संशय निर्माण व्हावा, या एकमात्र हेतूने खोटी माहिती पसरवण्याचा उद्योग चालू ठेवला आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचे तपशीलवार, मुद्देसूद उत्तर दिले आहे. तरीही त्यांनी आपले असत्य कथन बंद केलेले नाही. जनतेत जाऊन संघटना बांधण्याचा, संघर्ष करण्याचा लढाऊ मार्ग स्वीकारण्याऐवजी राहुल गांधी यांनी हा मार्ग निवडला आहे. अंगी काहीच कर्तृत्व नसल्यामुळे असत्य कथनाच्या सापळ्यात ते अडकले आहेत. त्यातून बाहेर पडणे त्यांना अवघड झाले आहे.


- केशव उपाध्ये

(लेखक भाजपचे महाराष्ट्रातील प्रवक्ते आहेत.)