...तर गोवा मुक्ती दिन १८ डिसेंबर असता

ब्रिगेडियर सागत सिंग यांनी मांडवी नदी पार करून पणजीच्या लष्कर प्रमुखांकडून शरणागती स्वीकारण्याचा आदेश बेतीत तळ ठोकलेल्या आपल्या ब्रिगेडला दिला असता, तर गोवा अवघ्या

Story: इतिहासाची पाने चाळताना... |
29th September, 04:47 am
...तर गोवा मुक्ती दिन १८ डिसेंबर असता

ब्रिगेडचे प्रमुख ब्रिगेडियर सागत सिंग

भारतीय लष्कर गोव्यात याआधीच घुसल्याची थाप मारुन अमेरिकन राजदूताच्या दबावावर मात करणारे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यालयातून काढता पाय घेतला व हवाई दलाच्या खास विमानाने बेळगाव गाठले व  ४५० वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा मुक्त करण्यासाठी सज्ज असलेल्या शूरवीर जवानांना शुभेच्छा दिल्या. १७ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या मुहूर्ताची वाट न बघता शक्य तेवढ्या लवकर तोफा डागण्याचा सल्ला त्यांनी जवानांना दिला. 

देशभरातल्या विविध लष्करी छावण्यातून दोडामार्ग परिसरात जमा झालेल्या जवानांनी तोफा डागून शत्रू पक्षाला इशारा दिला आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. भारतीय लष्कराचा पोर्तुगीज सैनिकांनी इतका धसका घेतला होता की वाटेत त्यांना कुठेही प्रतिकार झाला नाही. दोडामार्ग, अनमोड घाट, पत्रादेवी तसेच कारवार, काणकोण भागातून कोणत्याही प्रतिकाराविना एकाचवेळी जवानांची घोडदौड चालू होती. 

भारतीय जवान येत असल्याचे दिसताच त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी वाटेतले सगळे  'सांकव' आणि छोटेमोठे पूल उडवून देण्याचे काम पळपुटे पोर्तुगीज सैनिक करत होते. सांखळीचा पूल पहाटे अडीच वाजता उडविण्यात आला, तर बाणस्तारीचा पूल दुपारी एक वाजता उडविण्यात आला. बोरी, केपे हे सासष्टी तालुक्याला जोडणारे पूल असेच दुपारीच उडविण्यात आले. भारतीय जवानांचा प्रतिकार करण्याची कुवत किंवा साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पोर्तुगीजांकडे नव्हते. त्यामुळे काढता पाय घेताना सर्व 'सांकव' आणि छोटेमोठे पूल उडवून द्या असे आदेश सर्वच पळपुट्या सैनिकांना दिले होते. मात्र कोणत्याही बिकट परिस्थितीवर मात करण्यात पारंगत असलेल्या भारतीय लष्करावर कोणताही परिणाम झाला नाही. 

भारतीय लष्कर सर्व परिसर ताब्यात घेत अवघ्या १७ तासातच म्हणजे संध्याकाळी ५ वाजता बेती किनाऱ्यावर दाखल झाले. पणजी हे राजधानीचे शहर असल्याने ते ताब्यात घेण्याची जबाबदारी बाणस्तारी मार्गे कूच करणाऱ्या तुकडीवर सोपविण्यात आली होती. बाणस्तारी पूल दुपारी एक वाजताच उडवून दिल्याने त्यानंतर थोड्याच वेळाने तेथे पोहचलेली तुकडी अडकून पडली. कुंभारजुवे कालव्याला भरतीचे पाणी असल्याने कालवा पार करणे अशक्य होते.

बेती किनाऱ्यावरून पणजीच्या दिशेने तोफा डागण्यात आल्या. तोफांचे गोळे पणजीत पडताच पणजी विभागीय लष्कर प्रमुख आग्रुपेमेंतो जुआंव द कॅस्ट्रो यांच्या पोटात गोळा उठला. भारतीय लष्कराशी दोन हात करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व मनुष्यबळ पोर्तुगीजांकडे नव्हते. आर्च बिशप जुझे व्हिएरा आल्वेनारझ यांच्याशी त्यांनी संपर्क साधला, तेव्हा पणजी वाचविण्यासाठी बिनशर्त शरणागती पत्करावी असा सल्ला त्यांनी दिला. शरणागती पत्र तयार करून बेतीत तळ ठोकलेल्या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडे पोहचविण्यासाठी पाद्री ग्रेगोरियो सौदा आंताव यांना रात्री आठच्या सुमारास होडीने बेतीला पाठविण्यात आले. 

मेजर एस. एस. सिंधू यांच्याकडे हे पत्र सुपूर्द करण्यात आले. या ब्रिगेडचे प्रमुख ब्रिगेडियर सागत सिंग यांच्याशी संपर्क साधणे शक्य न झाल्याने शरणागती स्वीकारण्याचे सोपस्कार त्या रात्री पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे उद्या सकाळी १० वाजेपर्यंत आम्ही गोळीबार किंवा इतर कोणतीही कारवाई करणार नाही असे तोंडी आश्वासन देऊन पाद्रीला परत पाठविण्यात आले.

भारतीय लष्कराच्या सदोष दळणवळण यंत्रणेमुळे ब्रिगेडियर सागत सिंग यांच्याशी संपर्क साधणे शक्य झाले नाही. हा संपर्क साधला गेला असता, तर मांडवी नदी पार करून भारतीय लष्कराने पणजी काबीज केली असती. पणजीच्या लष्कर प्रमुखाने शरणागती पत्करली असती. पणजी ही गोव्याची राजधानी असल्याने पणजी काबीज करताच संपूर्ण गोवा भारताच्या ताब्यात आला असता. गोव्याचे गव्हर्नर जनरल व्हासाल दा सिल्वा यांनी पणजीतील आपले मुख्यालय सोडून वास्कोत आसरा घेतला होता.

ब्रिगेडियर सागत सिंग यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असताना फोर्ट आग्वाद तुरुंगातील सुमारे   साठ स्वातंत्र्यसैनिक कैद्यांची हत्या केली जाईल अशी माहिती मेजर एस. एस. सिंधू यांना मिळाली. या माहितीची खात्री करून घेण्यासाठी मेजर सिंधू काही अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आग्वाद तुरुंगात गेले. आग्वाद तुरुंगाच्या गेटवर लोकांना पाहून आतील एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने आपल्या सुरक्षारक्षकांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यामुळे मेजर सिंधू व इतर अधिकारी असलेल्या वाहनात ग्रेनेडचे स्फोट होऊन मेजर सिधू, कॅप्टन विनोद सेहगल व आणखी एक अधिकारी शहीद झाले. हा प्रकार घडल्यानंतर बेतीतून आणखी कुमक मागवण्यात आली. या पथकाने गोळीबार करताच पोर्तुगीजांनी पांढरे निशाण फडकावले पण शरणागती पत्करली नाही. भारतीय पथकाने इशारा देताच त्यांनी शस्त्रे खाली टाकून शरणागती पत्करली.

लष्कराच्या वेगवेगळ्या पथकांनी १८ डिसेंबर रोजी संध्याकाळपर्यंत फोंडा, मडगाव, केपे, काणकोण हा संपूर्ण परिसर पणजी व वास्को वगळता काबीज केला होता. ब्रिगेडियर सागत सिंग यांनी मांडवी नदी पार करून पणजीच्या लष्कर प्रमुखांकडून शरणागती स्वीकारण्याचा आदेश बेतीत तळ ठोकलेल्या आपल्या ब्रिगेडला दिला असता, तर गोवा अवघ्या २४ तासात मुक्त झाला असता. १९ डिसेंबर ऐवजी १८ डिसेंबर गोव्याचा मुक्ती दिन ठरला असता.


गुरुदास सावळ, (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)