यशच्या स्पर्शाने वर्षाच्या मनात एक वीज चमकली. चार वर्षांपूर्वी त्यांच्यामध्ये झालेल्या सर्व चांगल्या व वाईट घटनांचा प्रवाह तिच्या डोळ्यांसमोरून फिरू लागला.
‘किती अंधार केला आहे या पावसाने! असं वाटतंय, की रात्रीचे आठ वाजले आहेत.” हातातील चहाचा कप सांभाळत वर्षा सोफ्यावर बसलेल्या तिच्या सासूबाईंना म्हणाली. “वर्षा, पावसाचं तर ठीक आहे गं; पण चहाबरोबर भजी बनवण्याचं आश्वासन दिलेलं ते पूर्ण नाही केलं तू...” तिच्या सासूबाई तिची खिल्ली उडवत हे म्हणाल्या खऱ्या, पण त्यांच्या बोलण्यात अगदी मायेचा सूर ओसंडून वाहत होता.
“हो हो! आधी यांना उठवते व लगेच भजी करायला घेते हो!” वर्षा उद्गारली. तिच्या सासुबाईंनी अगदी कौतुकाने तिच्याकडे पाहिलं. ‘अशी कशी ही पोर! एवढं माझ्याकडून पाप घडलं तरी हिच्या मनात माझ्याबद्दल भरलंय ते फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम!’ त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. वर्षा नुसती हसली. बाहेर बघत राहिली. तिच्या हातातल्या कपातला चहा घोट घोट पीत राहिली. मघापासून पावसाने तिच्या अंगात भरलेली थंडगार हुडहुडी आता गरम गरम वाफाळत्या चहाने कुठल्या कुठे पळून गेली. तिला जरा बरं वाटलं. वर्षा आणि तिच्या सासूबाई अश्या कितीतरी वेळ मग गप्पच करत राहिल्या.
आता पाऊस थांबला होता. वर्षाची गप्पांमधून खिडकीतून बाहेर नजर गेली. थांबलेला पाउस पाहताच तिने घड्याळात पहिले तर संध्याकाळचे सहा वाजत आले होते. तिने चहा संपवून टीपॉयवर ठेवलेला आपला आणि सासुबाईंचा चहाचा कप उचलला आणि नेऊन किचनच्या सिंकमध्ये ठेवला. आता ती शयनगृहात आली. शयनगृहाच्या दोन्ही खिडक्या उघड्या होत्या. बाहेरील व्हरांड्यात दोन पक्षी बसले होते. बिचारे पावसात चिंब भिजून कोमेजल्यासारखे झाले होते. वर्षाला आठवलं... तिची आई नेहमी म्हणायची की, ‘संध्याकाळच्या वेळेला कधी झोपू नये, अशाने लक्ष्मी नाराज होते व धंद्यात नुकसान होते.’
तिने पाहिलं तर यश शांत झोपला होता. समाधानाचे सुख त्याच्या चेहऱ्यावर झोपेतसुद्धा स्पष्ट दिसत होते. “पाउस थांबला... ढग निघून गेले... आकाश स्वच्छ झालंय...” तिने स्वतःलाच म्हटलं. त्याला उठवायला म्हणून ती त्याच्या जवळ गेली. वर्षा हळुवारपणे त्याच्या गादीवर बसली व त्याचा चेहरा न्याहाळू लागली. तिने अलगद त्याच्या दाढीला स्पर्श करत त्याला हलवले व म्हणाली, “अहो उठा ना! आता खूप उशीर झाला आहे.” काही क्षणातच यश जागा झाला व पाठमोऱ्या उभ्या राहिलेल्या वर्षाचा हात धरत म्हणाला, “थोडा वेळ बसुयात का आपण दोघं एकांतात?”
यशच्या स्पर्शाने वर्षाच्या मनात एक वीज चमकली. चार वर्षांपूर्वी त्यांच्यामध्ये झालेल्या सर्व चांगल्या व वाईट घटनांचा प्रवाह तिच्या डोळ्यांसमोरून फिरू लागला. ते म्हणतात ना, ‘नातं एकदा तुटलं, तर ते पुन्हा जोडता जरूर येतं. पण पूर्वीप्रमाणे ते कधीच होत नाही.’ त्यांचंही काहीसं असंच झालं होतं. तिचे डोळे आपोआप भरून वाहू लागले. यशला कसंसंच झालं. त्याने तिला जवळ घेतलं. तिचे डोळे पुसले. त्याच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
“वर्षा, आपण घटस्फोट घेऊन खूप मोठी चूक केली हे मी मानतो. तू आई होऊ शकत नाहीस म्हणून माझ्या आईने तुला घराबाहेर काढले त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. नेमकं कुठे चुकलं व गोष्टी कशा घडत गेल्या मला काहीच समजलं नाही गं! तुझ्याविना मी ही गेली चार वर्षे कसा जगलो, हे मला विचार. नाही गं मी जगू शकत तुझ्याशिवाय वर्षा...” यश डोळ्यातले अश्रू पुसत बोलला.
यशला अजूनच जवळ ओढून त्याचे डोळे तिने पुसले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून वर्षा म्हणाली, “सोडून दे त्या आता पूर्वीच्या गोष्टी. पुन्हा पुन्हा माफी मागून मनस्ताप करून घेऊ नकोस. आईंनी मला समजून घ्यायला हवं होतं. तुमच्यावर सुद्धा खूप ताण आला होता. मी तुम्हाला माझ्यासोबत घर सोडायचं नाही असं वचन दिल्या कारणाने तुम्हीही बांधलेले होतात. माझ्या मनात तुमच्या बद्दल राग नाहीच हो. माझ्यासाठी ही गेली चार वर्षे खूप त्रासदायक होती पण झालं गेलं सगळं विसरून जाऊन आपण नव्याने सुरुवात केली आहे ना!” काही क्षणातच लहानगा केशव खोलीमध्ये आला व यशच्या अंगावर चढत म्हणाला, “पप्पा माझ्यासोबत खेळायला चला.” याशपासून हलकेच विलग होऊन यश व केशवची मस्ती पाहून वर्षाला तिचे हसू अनावर झाले.
वर्षाच्या संसाराची नवी सुरुवात झाली होती. एका अनाथ मुलाला दत्तक घेऊन या दांपत्याला आई-बाबा होण्याचे सुख मिळाले होते. यश व वर्षाच्या सासूबाईंना पण आता कळले होते, की आयुष्यात कोणत्याच गोष्टी सदैव टिकणाऱ्या नसतात, पण खरी माणसे आणि खरी नाती ही कायम मनात राहतात, त्यांना कुणीही विलग करू शकत नाही. त्यांच्याकडून झालेल्या अक्षम्य कृत्याचे त्यांना आता अतिशय वाईट वाटत होते. त्याचा त्यांना पश्चातापही होत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या चुका विसरून, वर्षाची माफी मागून नव्या आनंदाने एक नवी सकाळ त्यांच्या संसारात आणली होती.
सुरज गायकवाड
दिवार, तिसवाडी