कला, साहित्य, संगीत, चित्रकला अशा कलेच्या स्तरांविषयी निवेदकाला जुजबी तरी माहिती असायला पाहिजे. पण ती सगळीच प्रदर्शित करायची आवश्यकता मात्र नसते. संक्षिप्त बोलण्यातूनच श्रोत्यांपर्यंत ते ज्ञान ओघळत पोचायला पाहिजे.
आकाशवाणीच्या कार्यक्रमांना रंगत आणि स्वाद आणण्याचं काम निवेदक करत. मला एक आवाज फार फार आवडायचा. खूपच. तो म्हणजे बहुगुणी कलाकार पुरूषोत्तम सिंगबाळ यांचा. या आवाजाचा पोत रेशमी होता. स्वच्छ व निकोप असा हा आवाज. त्यात आर्जव असायचं.
सिंगबाळच्या कोंकणी निवेदनातून सादर झालेली इतर भाषांतील देशभक्ती व सामूहिक गीते, त्यांचा अनुवाद व कोंकणी अर्थ सांगण्याची त्यांची कथन हातोटी सगळंच काही लाजवाब होतं. बोलताना टायमिंग साध्य करण्याचं, विराम घेण्याचं वा मोड्युलेशन (चढ-उतार) यासंबंधींचं त्यांचं कौशल्य असामान्य होतं. त्यांना संगिताचं ज्ञान होतं. गोड कंठाने ते भजनं वगैरे गात. सिंगबाळ हे एक रसायनच होतं. ‘बाबू आमगेलो’ हे त्यांचं कोंकणी बालगीत हे सर्वश्रेष्ठ बालगीत असं माझं मत आहे. ‘बाबू आमगेलो, गोरो गोरो पिठा भोबो... हुनुहुनुलो शानुशानुलो, कोणे रे बाबाक मारलो? बाबून लायली तिती आऩी बाबून केली ताता...’ अशी वाक्यं त्या गीतात होती. संगीत गायनही छान होतं. लहानपणी व आताही मनाने लहान होऊन ते गाणं मी कितीदा ऐकलं याची मोजणी नाही करता येणार. मुलांसाठी गाणं कसं असावं याचा हा वस्तुपाठ होय.
आवाज हे एक ईश्वरी देणं होय. तो गुण आपल्यात उपजत असल्यास कलाकारानं तो विकसित करायला हवा. त्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत. रमेश सखाराम बर्वे, रामानंद जोशी व इतर अनेक निवेदकांनी आपली मुद्रा या क्षेत्रात कोरली. रमेशभाईंच्या आवाजात एक गोडवा होता. रामानंद जोशी हे निवेदकाप्रमाणेच गायकही होते. त्यामुळे त्यांच्या आवाजाला एक विशेष रचना व पोक्त पीळ होता. या दोघांची मराठी सुश्राव्य होती.
‘मनपसंत गीते’ हा आकाशवाणी पणजी केंद्राचा कार्यक्रम गाजला. टीव्ही येण्याअगोदर मनोरंजनाचा मोठा स्रोत म्हणजे हा साप्ताहिक कार्यक्रम. कुठलं गाणं येणार हे माहीत नसल्यानं आम्ही उत्सुकता ताणून, श्वास रोखून ऐकत बसायचो. प्रतिमा शिरोडकर याही उत्कृष्ट निवेदक. त्यांनीही या कार्यक्रमात निवेदनाद्वारे रंगत आणली. रसिक श्रोते फर्माईश करून पत्रं लिहायचे. त्या क्रमाप्रमाणे गाणी येत.
श्रावण महिना सुरू झाल्याबरोबर ‘श्रावणात घन निळा बरसला’ यायचे. निवेदक दोन चार लालित्यपूर्ण ओळींनी श्रावणाचं वातावरण निर्माण करायचा. भाऊबीजेच्या वा रक्षाबंधनाच्या वेळी ‘धागा जुळला, जीव फुलला... वेड्या बहिणीला भाऊ मिळाला, भाऊ मिळाला’, ‘वेड्या बहिणीची वेडी रे माया...’ हे गाणं हमखास असायचंच. सुधीर फडकेंची भावगीतं असायची. ‘गीतरामायण’ यायचं. ‘मोगरा फुलला’, ‘शुक्रतारा’ व इतर अजरामर गाणी यायची. वसंतराव देशपांडे, जितेन्द्र अभिषेकी व इतरांची नाट्यगीते यायची. निवेदकांना दोन गीत प्रसारणामधली जागा भरून काढून श्रोत्यांच्या हृदयाशी संवाद साधण्याची कला अवगत होती. हा ‘मनपसंत गीतं’ कार्यक्रम गाजला. गोवा रेडियोच्या इतिहासातील ते एक सोनेरी पान होतं. पर्व होतं.
मी आकाशवाणी पणजीच्या वृत्तविभागात वृत्तनिवेदक-अनुवादक ह्या पदावर सेवा देऊन निवृत्त झालो. निवेदनाची धाटणी वेगळी व वृत्तनिवेदनाची शैली वेगळी असते. निवेदनात नाट्यमयता चालते. हवीच. पण वृत्तनिवेदनात नाट्यमय शब्दफेक नको. दोहोंतला फरक दर्शवणारी विभाजित रेषा अतिसूक्ष्म आहे.
‘एफएम’ वाहिनी सुरू झाल्यावर आरजे, डिजे ही संस्कृती आली. आकाशवाणी पणजी केंद्रावर एफएम वाहिनी सुरू झाल्यावर अऩेक कोंकणी, मराठी, इंग्रजी निवेदकांना नैमित्तिक निवेदक म्हणून आपली कला सादर करण्याची संधी प्राप्त झाली. खाजगी एफएम वाहिन्या सुरू झाल्या. देशभर त्या लोकप्रिय झाल्या. ‘फोन इन’ कार्यक्रम लोकांना आवडू लागले. फोनवरील श्रोत्यांकडे निवेदकानं बातचीत करणं ही एक आगळी कला. त्याला हजरजबाबीपणा, समयसूचकता हवी. फोन करणाऱ्याकडे बोलतानाच त्याला हवं असलेलं गीत संगणकावर शोधत संवाद चालू ठेवून तो गुंडाळून ते गीत योग्य टायमिंग साधत वाजवणं हे कौशल्य.
निवेदकाला जितकं सामान्य ज्ञान असेल तितकं बरंच. कला, साहित्य, संगीत, चित्रकला अशा कलेच्या स्तरांविषयी निवेदकाला जुजबी तरी माहिती असायला पाहिजे. पण ती सगळीच प्रदर्शित करायची आवश्यकता मात्र नसते. संक्षिप्त बोलण्यातूनच श्रोत्यांपर्यंत ते ज्ञान ओघळत पोचायला पाहिजे.
मुकेश थळी
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)