स्वच्छता पंधरवडा

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
29th September, 03:29 am
स्वच्छता पंधरवडा

तुम्ही सर्वांनी तुमच्या शाळेत स्वच्छता पंधरवडा / स्वच्छता पखवाडा साजरा केला असेलच. आपलं घर, शाळा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे त्याचबरोबर आपली वैयक्तिक स्वच्छता म्हणजेच आपले शरीर स्वच्छ ठेवणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आपलं शरीर जर स्वच्छ असेल तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं. शारीरिक स्वच्छता आपला आत्मविश्वास सुद्धा वाढवायला मदत करते. 

आपल्या आजूबाजूला अनेक विषाणू, जीवाणू असतात. ते वेगवेगळ्या मार्गांनी शरीरात प्रवेश करून वेगवेगळे रोग निर्माण करू शकतात. रोग निर्माण करणारे असे हे विषाणूंनी शरीरात प्रवेश करू नये म्हणून शरीराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. 

शारीरिक स्वच्छतेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत शरीराचा प्रत्येक भाग स्वच्छ ठेवणे म्हणजेच शारीरिक स्वच्छता. 

शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण रोज आंघोळ करतो की नाही? काही काही मुलं तर दोन दोन दिवस आंघोळ करत नाहीत. अश्या मुलांचं शरीर हे भयानक रोगांचं घर बनतं. 

आता तुम्ही सगळे स्वावलंबी झाला आहात त्यामुळे तुम्ही स्वतःच कोणाचीही मदत न घेता आंघोळ करता. हे करत असताना मात्र पटापट आंघोळ उरकणे असं न करता शरीराचा प्रत्येक भाग नीट स्वच्छ करावा विशेषतः काखा, जांघा, बेंबी, मान हे भाग नीट स्वच्छ करावे. असे न केल्यास या भागांमध्ये घाम साठून त्या ठिकाणी वेगवेगळे इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते.  आंघोळ केल्यानंतर धुतलेले स्वच्छ कपडे घालावे. एकदा वापरलेले कपडे न धुता परत वापरू नये. 

आपल्या हातांनी आपण जेवतो, त्यामुळे हातांची स्वच्छता सुद्धा महत्त्वाची आहे. हात न धुता पदार्थ खाल्ले तर हातावरील किटाणू पोटात जाऊन उलट्या, जुलाब असे रोग निर्माण करतात. जेवणापूर्वी, जेवण झाल्यावर, खेळून आल्यानंतर, पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यावर साबण लावून हात स्वच्छ धुवावे. नखं कापलेले असावी, हात धुताना नखं सुद्धा स्वच्छ धुवावी.

दात स्वच्छ ठेवावे. दातांची स्वच्छता पचन नीट होण्यासाठी आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपताना दात घासून झोपावे, हिरड्या स्वच्छ ठेवाव्या. काहीही खाल्लं की लगेच चूळ भरावी. 

नाक, कान, डोळे नीट स्वच्छ करावे. काहींना नाकात बोट घालायची सवय असते. नाक स्वच्छ करण्यासाठी असं काही जण करतात. नाकामध्ये बोट घातल्याने आतमध्ये जखम होऊ शकते. अनेकदा नाकात असलेले केस तुटतात. ज्यामुळे नाकाच्या आतील भागात सूज येते, जखमही होऊ शकते. म्हणून रोज रात्री थोडंसं खोबरेल किंवा तीळ तेल बोटावर घेऊन हलकेच नाकाला आतून लावले असता, नाक स्वच्छ राहण्यास मदत होते. धूळ, धूर, परागकण हे तेलामुळे नाकात चिकटून राहतात आणि त्यांचा श्वसन संस्थेत प्रवेश आपण रोखू शकतो. असे केल्याने वारंवार सर्दी, खोकला होणार नाही.

केस आठवड्यातून किमान ३ वेळा नीट धुवावे. केस नीट धुतले नाही विंचरले नाहीत तर केसांत कोंडा होतो, उवा - लिखा होतात. उवांमुळे डोक्यात पुरळ येते, खाज येते, वेदना होतात, केस सुद्धा विंचरता येत नाही. केसात कोंडा होतो व केस गळायला लागतात. केस नीट धुतले, विंचरले की आपण सुंदर दिसतो, केसांची वाढ सुद्धा चांगली होते.

अंतर्वस्त्रं, मोजे यांचा वापर करण्यापूर्वी ते स्वच्छ धुतले आहेत याची खात्री करणं सुद्धा गरजेचं आहे. 

 रोज झोपण्यासाठी वापरत असलेले अंथरूण, पांघरूण सुद्धा स्वच्छ धुतलेले असावे. स्वच्छ अंथरुणावर झोप सुद्धा चांगली लागते व आपले शरीर निरोगी व प्रसन्न राहते.

वर सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. पण बऱ्याचदा आळसामुळे या गोष्टी आचरणात आणल्या जात नाही. पण मला माहितीये तुम्ही सगळी गुणी मुलं आहात त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की आचरणात आणाल आणि आपलं शरीर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ, सुंदर ठेवाल व जीवाणू, विषाणूं पासून होणाऱ्या रोगांपासून स्वतःचं रक्षण करणार.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य