डिजिटल

Story: छान छान गोष्ट |
29th September, 03:26 am
डिजिटल

सकाळचे दहा वाजले होते. आज रविवार असल्याने बाबा घरातच निवांत पेपर वाचत बसले होते. त्यांनी आशूला आवाज दिला, “आशू... सारखा त्या मोबाईलवर असतो. काल लाईटचं बिल भरलंच नाही. घराच्या बाहेर पडत जा जरा.”

“बाबा आपलं काम झालंय. मी ऑनलाईन बिल भरलंय कालच.” त्यानं बेडरुममधूनच गेम खेळताना बाबांना ओरडून सांगितलं.

“आॅनलाईन? कसं?”

“आता सगळी बिलं ऑनलाईन भरता येतात बाबा.”

“बघू..” आशूने त्यांना मोबाईलमध्ये दाखवलं.

“अरे वा...  हे छानच झालं की! पण बिल कसं?”

“ते येतंच ना घरपोच.”

“आणि डोळे गेलेत त्याचं काय? सारखं सारखं तेच. मोबाईल झालं की तो कॉम्प्युटर. त्या फेसबुक आणि व्हाट्सऍपने काही सुचतच नाही आजकालच्या मुलांना. विश्रांती अशी नाहीच. पूर्वीसारखे बैठे खेळ नाहीत की घराबाहेर पडायला नको यांना. सगळं आयतंच घरी मागवता येतं म्हणे. हं !” आईचा त्रागा सुरूच होता.

बाबा म्हणाले, “अगं मग चांगलंच आहे की. या सुखसुविधांचा उपयोग आपल्याला होतोच आहे ना. कामं पटापट होतात. व्याप वाचतो. पायपीट वाचते.”

“प्रकृती बिघडते ना मग घरातच बसून. शरीराला व्यायाम नाहीच. शारीरिक कष्ट करणारी बहुतेक आपली शेवटची पिढी."

“अगं, मग तितकी प्रगतीही केलीये ना माणसाने?”

“आशू, ती गेम बंद कर आधी."

“जाऊ दे गं... आणि नाहीतरी पूर्वीसारखी शेतीची काम होणार आहेत का आजच्या मुलांकडून?”

तेवढ्यात मोलकरीण आली.

“बाईसाहेब, भांडी धुवायला द्या.”

“हिला विचार. काय गं सखूबाई, तुझा मुलगा पण शाळेत जातो ना?”

“व्हय सायेब, यंदा बोर्डाला बसणारे.”

“मग त्याला येतं का मोबाईल, इंटरनेट वगैरे?”

“न्हाई सायेब. आम्ही गरीब माणसं. इथं दोन येळच्या जेवणासाठी कमावता कमावता पूर्ण दिस जातोय न् त्याच्यातून बचत करीत करीत याच शिक्षण चाललंय बघा. कुटून आणता मोबाईल?”

“मग तुझा मुलगा शाळेव्यतिरिक्त काय काम करतो रिकाम्या वेळात?”

“तो बापाबरोबर जातो की मजुरीला. कांदे काढतो, पाणी भरतो. घास कापतो... आता पेरणीपण कराया शिकलाय. खेळ म्हणाल तर सुरपारंबी, लपाछपी, लगोऱ्या, विटीदांडू, तलावात पोहतो.”

“आमच्या आशूला फक्त मोबाईलवर गेम खेळायला सांगा.”

आशूचे मित्र तिथे खेळायला आले होते.

“तुम्हाला काय काय येतं रे मोबाइलमधलं?”

सखूही ऐकायला लागली.

“काका, ते इंटरनेटवर प्रत्येक गोष्टीची माहिती उपलब्ध असते. प्रत्येक गोष्टीवरचा व्हिडीओ, काॅलेजचं ऍडमिशन, अभ्यासाच्या नोट्स, आॅफिसची माहिती, मेल, पुस्तकं, वेबसाईट्स, नोकऱ्या, वर्तमानपत्रे, मासिके, मेहंदी, रांगोळी, जगातल्या गोष्टी आणि आणखीही बरंच काही.” मुलं एकेक करुन सांगत होती. 

आशू म्हणाला, “बाबा, मी एक गोष्ट तुमच्यापासून लपवली.”

“कोणती?”

“मी गेल्या वर्षभरात एक ऑनलाईन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा कोर्स पूर्ण केलाय. ती कंपनी मला आता जॉब ऑफर करतेय.” सगळ्यांना आनंद झाला. त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग त्यानं स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी केला. 

सगळ्यांनी आशूचं अभिनंदन केलं. सखू म्हणाली, “पोरानं नाव काढलं सायेब तुमचं. माझ्या किसन्यालाबी शिकवता का रे इंटरनेट?”

सगळी मुले म्हणाली, “हो नक्कीच!”


 सोमेश कुलकर्णी