‘केळवण’ आठवणीतली...

काही दिवसांपूर्वी बेळगावला माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नात हा आनंद सोहळा खूप दिवसांनी अनुभवला. तो उकडीच्या मोदकाचा आग्रह, पारंपरिक धोतर उपरणे घेऊन वाढणारे वाढपी. मजा आली. लक्षणीय होतात हो असे सोहळे!

Story: आठवण |
28th September, 05:23 pm
‘केळवण’ आठवणीतली...

परवा माझ्या मुलीच्या मैत्रिणीचा केळवणाचा कार्यक्रम ठरविला होता. तसे लवकरच तिचे लग्न ठरले. अवघ्या बाविसाव्या वर्षी अर्थात आमच्या जमान्यात हेच योग्य वय होते लग्नाचे. पण आता करिअर फर्स्ट या संकल्पनेमुळे मुले मुली यांचे लग्नाचे वय वाढलेच आहे.

आमच्या म्हणजेच माझे मिस्टर आणि मी यांच्या प्लॅननुसार तिचे केळवण रीतिनुसार घरीच करायचे ठरविले. काय बेत करायचा बरे? इस्वण आणावा की पापलेट? चिकन आणायचे का? वडे की पाव? बरेच डीस्कशन झाले. सध्या काय रिटायरमेंट मुळे दोघेही निवांतच. तेवढ्यात आमची लेक आली कामावरून. फ्रेश झाल्यावर आमचा केळवणाचा मेनू दाखविला तिला, कागद वाचल्यावर ती कुत्सित हसून म्हणते कशी, "काय मम्मा? आता केळवण काय घरी देतात का? तुम्ही घरी काहीच करू नका आणि केळवण काय केळवण? ब्रायडल वेलकम मील म्हणतात त्याला. मी मस्त पैकी उद्यासाठी रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक केले आहे. तुम्ही घरी काहीच करू नका." म्हटले ठीक आहे, पडत्या फळाची आज्ञा मानून दुसऱ्या दिवशी मडगावातील एका हायफाय रेस्टॉरंटमध्ये गेलो. दोघींनी असे काही पदार्थ ऑर्डर केले की त्यांची नावे डोक्यावरून गेली हो पार. काय खाल्ले व काय मागवले हे त्या दोघींनाच माहीत. घरी आलो मिस्टरांनी माझ्याकडे बघितले, कळले मला, गप्प उठले, भात लावला.

खरेच पूर्वी केळवण हा प्रकार किती सुंदर होता हो! छान रांगोळी काढलेले ताट, त्यात, भावी वर किंवा वधूला आवडणारे पदार्थ, गोड तिखट वगैरे. तो प्रेमळ आग्रह, मस्करी, लाजणे आणि नंतर एक छोटीशी प्रेमळ भेट. केळवण हा मान असायचा आपल्या जवळच्यांचा.

दोन वर्षापूर्वी लग्नाला गेले होते परिचितांच्या, चार दिवसांचे आमंत्रण, एक दिवस संगीत, मेंदी, मग हळद, देवकार्य, मग लग्न. अरे बापरे! किती तो थाट!  आमच्या वेळेस हळद असायची, पण संगीत हा प्रकार हल्लीचा. वेस्टर्न म्युझिक वर डान्स, उत्तेजक पोशाख, अगदी सगळे वेगळेच. त्यात अपेय पान ही होतेच. रात्री दोन वाजले. परत दुसऱ्यादिवशी मेहंदीचा कार्यक्रम, मग हळद. पार पिट्टा पडला. दोन दिवसात माझी अशी परिस्थिती झाली तर त्या वधुवराचे काय? सध्या लग्नात प्रेम आग्रह, मानपान सगळं आहे, पण कुठेतरी आपला सोज्ज्वळपणा, पारंपरिकता नष्ट होत चालली आहे. असे वाटत नाही का? रिसेप्शन म्हणजे तर भारी भारी ड्रेस मेटरियलची जाहिरातच दिसते जणू, नुसती फॅशन परेड...

त्यात ते बुफे, दहा बारा स्टॉल्स, वेगवेगळे पदार्थ, कुठे चायनीज,  कुठे चाट, कुठे पंजाबी ह्या गडबडीत आपले वरणभात, मसाले भात, भजी कुठे दिसतच नाहीत. मुळात काचेचे ताट, प्लेट म्हणतात त्याला पडून फुटायची भीती, सांभाळता सांभाळता अर्धी भूक तिथेच जाते. यजमान बिचारे जेवण कसं झालंय हे विचारतात आणि जातात. बरं, परत काही घ्यायला जायची लाज. कोण काय म्हणतील, हसतील, हा एक न्यूनगंड.

अहो, लग्नाची पंगत म्हणजे कशी अगदी ऐसपैस. तो मसाले भात, ती परात भजांची, जिलब्या, बरोबर तांब्याभर मठ्ठा, अगदी जुगलबंदी जशी. तो, वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणणारा केटरर आता सध्या फक्त प्लेट मोजतो.

खरे सांगा असे किती वाचक आहेत जे बुफे जेवून खरोखर तृप्त होतात? मी तर पंगत नसेल तर सरळ घरी कुकर लाऊन मगच समारंभाला जाते. उगाच अर्धवट पोटी राहायला नको.

अर्थात अगदीच नाही असे नाही. काही दिवसांपूर्वी बेळगावला माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नात हा आनंद सोहळा खूप दिवसांनी अनुभवला. तो उकडीच्या मोदकाचा आग्रह, पारंपरिक धोतर उपरणे घेऊन वाढणारे  वाढपी. मजा आली. लक्षणीय होतात हो असे सोहळे!

ही चेष्टा मुळीच नाही. पण खरंच सांगा कुठे गेले हो आपले सण- समारंभ? आपले रितीरिवाज? कोणाचेतरी  अंधानुकरण वाटत नाही का? आपलीही लग्ने दोन तीन दिवस चालायचीच हो, आत्ताही चालतात पण त्या फुगड्या, ती गाणी स्वतः रचलेल्या मंगलाष्टका कुठे गेल्या? ते मानपान, पाठवणी, अक्षदा टाकणं, हार घालणे परस्परांना, एक वेगळी मजा होती. आता वर सांगितल्याप्रमाणे फक्त फॅशन परेड.

मला आधुनिकतेबद्दल आकस आहे किंवा मी ऑर्थोडॉक्स आहे असे मुळीच नाही पण परक्या चालीरीती अंगिकारताना आपले स्वत्व आपण सोडू नये असे माझे मत. ज्यांच्या चालीरीती आपण अंगिकारतोय ते त्यांच्या पारंपरिकतेमध्ये बदल करतात का? नीट पहा, उत्तर नाही असेच येईल मग आपण का?


रेशम जयंत झारापकर

मडगाव