हृदयात वाजे समथिंग!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
22nd September, 04:04 am
हृदयात  वाजे समथिंग!

आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव, आपण झोपल्यावरही जो अवयव काम करतो त्या अवयवाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. हा अवयव म्हणजेच आपले हृदय. 

हृदय किती महत्त्वाचे आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. हृदय आपल्या पूर्ण शरीराला रक्त व रक्तामार्फत प्राणवायू पुरवण्याचं काम दिवस-रात्र करत असतं. हृदयाची धडधड थांबली तर शरीराच्या अवयवांना ऑक्सिजन मिळणे बंद होते. अशा स्थितीत सर्व अवयव निकामी होऊन मृत्यू होतो. 

हे हृदय कसं असतं माहितीये? कमळाची कळी जशी असते त्या आकाराचं आपलं हृदय असतं. आणखीन एक गंमत म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या बंद मुठीचा जेवढा आकार असतो तेवढ्याच आकाराचं प्रत्येकाचं हृदय असतं. 

हृदय जे रक्ताचे पंपिंग करते त्याला हृदयाचे ठोके असे म्हणतात. आपण धावताना, उड्या मारताना, घाबरलेलो असताना, आपल्याला राग आला असताना हे ठोके वाढतात. अश्या वेळी शांत बसून लांब श्वास घेऊन सोडणे असे काही वेळा केले की परत हे ठोके पूर्ववत होते तसे कमी होतात, हृदयाची धडधड नॉर्मल होते. आपल्या जीवनासाठी हृदय निरोगी असणे अत्यंत महत्वाचे आहे म्हणून लहानपणापासून हृदयाची काळजी घेण्याची सवय लावावी. 

त्यासाठी पुढील गोष्टी कराव्या - 

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवणारे पदार्थ खावे. जसे की - डाळिंब, आवळा, आंबा, महाळुंग, कोकम (सोलकढी, कोकम सरबत, आमसूल)

सतत घरात बसून मोबाईलवर व्हिडिओ गेम्स खेळणे कमी करून मैदानी खेळ खेळणे जसे की फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, दोरी उड्या, बॅडमिंटन इ. 

आपली पचन संस्था जर निरोगी असेल, तर आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते म्हणून संध्याकाळी लवकर जेवावे, जेवताना टिव्ही, मोबाईल वापरू नये, बोलू नये. 

एका जागी बसून मन लावून ताजे, गरम जेवण जेवावे.   गरम गरम भातावर किंवा पोळीला लावून रोज चमचाभर साजूक तूप खावे. 

रोज प्राणायाम करावा. 

खूप राग, चिडचिड करणे, मोठ्याने ओरडणे या गोष्टी टाळाव्या. 

खूप तिखट, बाजारातले तेलकट पदार्थ जसे की वडा, सामोसा, फ्रेंच फ्राईज, खूप चॉकलेट्स, चिप्स, पिझ्झा, मैद्याचे पदार्थ खाऊ नये. 

सॉफ्ट ड्रिंक्स - पेप्सी, कोकाकोला, मिरींडा, एनर्जी ड्रिंक्स, सोडा पिऊ नये. 

आत्तापासून जर या गोष्टी आपण सुरू केल्या तर मोठे झाल्यावर आपल्याला हृदयाचे आजार होणारंच नाही. आहे की नाही सोप्पं? 

आपल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा या टीप्स सांगा आणि एकमेकांचे हृदयाचे ठोकेही ऐका.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य