बांगलादेश गडगडला; भारतीय संघाला पहिल्या कसोटीत विजयाची संधी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
20th September, 10:16 pm
बांगलादेश गडगडला; भारतीय संघाला पहिल्या कसोटीत विजयाची संधी

चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवला जात आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३०८ धावांची आघाडी घेतली असून भारत तिसऱ्याच दिवशी विजयाचा प्रयत्न करताना दिसणार आहे.

भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात ३ गडी गमावून ८१ धावा केल्या. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला होता. यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराहने ४ बळी घेतले. शुभमन गिल दुसऱ्या डावात ३३ धावा करून नाबाद राहिला.

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही भारताची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाने ६७ धावांवर ३ विकेट गमावल्या. रोहित शर्मा अवघ्या ५ धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वाल १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर विराट कोहली १७ धावा करून बाद झाला. त्याने ३७ चेंडूंचा सामना करत २ चौकार मारले. ६४ चेंडूंत ३३ धावा केल्यानंतर गिल नाबाद राहिला. ऋषभ पंत १२ धावा करून नाबाद राहिला.

३ बळी घेऊनही बांगलादेश अडचणीत!

भारताने दुसऱ्या डावात ३ विकेट गमावल्या आहेत. पण ३०८ धावांची आघाडीही घेतली आहे. हे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवले तरी ते जड जाऊ शकते. पहिल्या डावात १४९ धावांवर बांगलादेशचा संघ गडगडला. चेन्नईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येत होते. त्यामुळे बांगलादेशला दुसऱ्या डावातही फलंदाजी करणे सोपे जाणार नाही. टीम इंडिया तिसऱ्या दिवशी धावसंख्या अधिक वाढवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळेच बांगलादेशवर संकटाची स्थिती आहे.

पहिल्या डावात बांगलादेशची खराब फलंदाजी

बांगलादेशकडून पहिल्या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. त्यांच्याकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक ३२ धावा केल्या. त्याने ६४ चेंडूंचा सामना करत ५ चौकार मारले. मेहदी हसन मिराज २७ धावा करून नाबाद राहिला. ५२ चेंडूंचा सामना करताना त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. कर्णधार शांतो २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

दुसऱ्या डावातही रोहित-विराट अपयशी

पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही रोहित आणि विराट काही विशेष करू शकले नाहीत. पहिल्या डावात ६ धावा करून रोहित बाद झाला. तर विराटही ६ धावा करून बाद झाला. आता दुसऱ्या डावात कोहली १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर रोहित ५ धावा करून बाद झाला. टीम इंडियाला आता केएल राहुल, रविचंद्रन अश्विन आणि जडेजा यांच्याकडून आशा आहे.