म्हापसाच्या यश पवारचा ‘जम्पिंग जॅक्स’मध्ये विश्वविक्रम

गिनीज बुक ऑफ वर्ड मध्ये झाली नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th September, 11:13 pm
म्हापसाच्या यश पवारचा ‘जम्पिंग जॅक्स’मध्ये विश्वविक्रम

जम्पिंग जॅक्स खेळा मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड नोंदविलेला यश विवेक पवार आपल्या आई वडिलांसोबत      

मोरजी : म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाच्या यश पवार या विद्यार्थ्याने जम्पिंग जॅक्स मध्ये ३० सेकंदात ७७ जम्पिंग जॅक्स काढून या पूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढीत आपल्या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ड मध्ये नोंद केली आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्याला हे यश आले.
६ वर्षांपूर्वी यात यशला अपयश आले होते. त्यानंतर त्याने सातत्याने सराव करून यशने हे अपूर्व यश मिळवले. प्रत्येक सेकंदला २.५ जम्पिंग जॅक मारणारा यश ३० दिवसात १० हजार जम्पिंग जॅक्स मारण्यात यशस्वी झाला होता. जम्पिंग जॅक्स हा एक विरळा क्रीडा प्रकार असून त्यासाठी खुप मेहनत करावी लागते. त्यात दंड, गुडघे यांना मोठ्या प्रमाणात दुखापत होते. शरीराला असह्य वेदना होत असतात. यशने हा विश्व विक्रम करताना जिद्दीने अनेक अडथळे पार केले. अनेक वर्षे जिद्दीने प्रयत्न केल्या नंतर अखेर १६ मेमध्ये यश विश्वाविक्रमी कामगिरी करण्यात यशस्वी झाला. त्याने ३० सेकंदात ७७ जम्पिंग जॅक्स ची नोंद केली. त्यासाठी त्याने सलग २१ महिने खडतर सराव केला विश्व विक्रमचा संकल्प केलेल्या यशला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. त्याने दुसऱ्यांदा प्रयत्न केला, त्यातही तो अपयशी ठरला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याला अपूर्व असे यश मिळाले.
या संदर्भात बोलताना यश पवार म्हणाला, जीवनात यश पहिल्याच प्रयत्नात मिळत नसते. त्यासाठी सातत्य पूर्ण आणि जिद्दीने सराव करण्याची गरज असते. आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून प्रयत्न केल्यास यश आपलेच असते, असे तो म्हणाला. या पुढे आपणच केलेला हा विश्व विक्रम मोडण्यासाठी माझा या खेळातील सराव चालूच राहणार आहे. या कामी मला माझे आई-वडील आणि क्रीडा शिक्षक यांचे प्रोत्साहन मिळाल्याचे त्याने कृतज्ञता पूर्वक नमुद केले. यश पवार हा क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे अधिकारी विवेक पवार आणि कोलवाळ येथील डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका राजश्री आखर्गेकार पवार यांचा मुलगा आहे.