हॉकी इंडियाने उडवला पाकचा धुव्वा

आशियाई चॅम्पियन्स स्पर्धा : २-१ ने पराभव करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
14th September, 11:44 pm
हॉकी इंडियाने उडवला पाकचा धुव्वा

मोकी : आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने पाकचाही २-१ ने धुव्वा उडवला आहे. राउंड रॉबिन फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या अखेरच्या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. गत चॅम्पियन भारतीय संघाचा यंदाच्या हंगामातील हा सलग पाचवा विजय ठरला.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघात चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. सातव्या मिनिटाला पाकिस्तानच्या अहमद नदीमने गोल डागत आपल्या संघाचे खाते उघडले. पाकिस्तानची आघाडी भेदून काढत भारताने सामना खिशात घातला. सरपंच साब अर्थात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतरित करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने ही आघाडी शेवटपर्यंत टिकवत सामना आपल्या नावे केला.
भारताने आठव्यांदा उडवला पाकचा धुव्वा
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने आठव्यांदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत १२ वेळा समोरासमोर आले आहेत. यात पाकिस्तानला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. उर्वरित दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
पाक खेळाडूचा रडीचा डाव
भारत-पाक यांच्यातील सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वातावरण तापल्याचे चित्रही पाहायला मिळाले. भारताच्या जुगराज याला पाकिस्तानच्या अशरफ राणा याने टक्कर मारली. या सीननंतर जुगराज डेकवर आदळल्याचा सीन पाहायला मिळाला. या घटनेनंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना खुन्नस देताना दिसले. रडीचा डाव खेळणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूला येलो कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर १० खेळाडूंसह खेळण्याची वेळ आली.
अंतिम सामना १७ रोजी
भारतीय हॉकी संघासह पाकिस्तानच्या संघाने आधीच सेमीफायनलमध्ये स्थान पक्क केले आहे. भारतीय संघ ५ पैकी ५ सामन्यातील विजयासह १५ गुणांसह गुणतालिकेत सर्वात आघाडीवर आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाच्या खात्यात २ विजय २ अनिर्णित सामन्यासह भारताकडून मिळालेल्या एका पराभवाची नोंद आहे. त्यांच्या खात्यात ८ गुण जमा आहेत. दोन्ही संघ पहिल्या दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे फायनलमध्ये पुन्हा भारत पाक यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळू शकते. १६ सप्टेंबरला या स्पर्धेतील सेमीफायनल सामना होणार असून १७ सप्टेंबरला हॉकीतील आशियाई चॅम्पियन कोण? त्याचा निकाल लागेल.