भारत विरुद्ध बांग्लादेश आजपासून पहिली कसोटी

चेन्नई येथे रंगणार सामना : पहिल्या दिवशी पावसाची शक्यता, ऋषभ पंत परतणार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th September, 11:11 pm
भारत विरुद्ध बांग्लादेश आजपासून पहिली कसोटी

चेन्नई : भारत आणि बांग्लादेश यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये १९ सप्टेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरणार याची उत्सुकता लागून आहे.भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. २०२१ नंतर चेपॉक मैदानावरील हा पहिला कसोटी सामना असेल. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता सुरु होईल. नाणेफेकीचा कौल सकाळी ९ वाजता होईल. दरम्यान, कसोटीचा पहिला दिवसही पावसामुळे वाहून जाऊ शकतो. चेन्नईमध्ये पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पावसाची ४० टक्के शक्यता आहे. तिसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता आहे.
गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं की, सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना काही काळ वाट पाहावी लागेल. म्हणजेच संघात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना स्थान मिळणार आहे. भारतात झालेल्या मागच्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेल यष्टीरक्षक होता. पण त्याची जागा आता ऋषभ पंत घेणार आहे.
सहाव्या स्थानासाठी सरफराज खान आणि केएल राहुल यांच्या नावाची चर्चा झाली. शेवटच्या कसोटी सामन्यात सरफराजने चांगली कामगिरी होती. तर दुखापतीमुळे केएल राहुल खेळू शकला नव्हता. पण त्या आधीच्या मालिकेत केएल राहुलने चांगली कामगिरी केली होती. आता अनुभवाच्या पातळीवर केएल राहुलची निवड झाली आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीला येतील. तर शुबमन गिल तिसऱ्या स्थानावर उतरेल. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तसेच तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज संघात असतील.
आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू असतील. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल यात काही शंका नाही.
आतापर्यंत दोन्ही संघ १३ वेळा आमनेसामने आले आहे. त्यापैकी ११ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. बांगलादेशचा संघ स्पर्धेत उलटफेर करण्यासाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर व्हाईटवॉश देईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट खरी ठरली आहे. नुकतेच बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने सांगितले की, आमचा संघ भारताला पराभूत करण्यास सक्षम आहे. पहिल्या कसोटी सामन्यात हसन महमूद, नशीद राणा आणि तस्कीन अहमद यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. तर शाकिब अल हसन आणि मेहदी हसनवर फिरकीची जबाबदारी असेल.
भारत आणि बांग्लादेश कसोटी सामना जिओ सिनेमा अॅप आणि जिओ सिनेमा वेबसाईटवर लाईव्ह पाहता येईल. लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत असेल.सामना स्पोर्ट्स १८-१ एसडी, स्पोर्ट्स १८- १ एचडी, स्पोर्ट्स १८-२ हिंदी या चॅनेलवर पाहता येईल.
भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ कसोटी क्रिकेटमध्ये १३ वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताचं वजन अधिक आहे. भारताने ११ कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामने ड्रॉ झाले आहेत. या दोन सामन्यात बांगलादेशने भारताला चांगलंच झुंजवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बांगलादेशला कमी लेखणे महागात पडू शकते. भारत आणि बांग्लादेश यांच्यात मायदेशात आतापर्यंत एक कसोटी मालिका पार पडली आहे. तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली होती. ही मालिका २०१७ साली भारतात पार पडली होती. त्यानंतर भारत बांग्लादेश कसोटी सामना भारतात झालेला नाही. मागच्या दोन कसोटी सामन्यांचा विचार केला तर बांगलादेशला खूप वाईट पद्धतीने टीम इंडियाने पराभूत केले आहे. दोन्ही सामने भारताने एका डावाने जिंकले आहेत.
या सामन्यात ३५ वर्षीय अष्टपैलू रवींद्र जडेजाची नजर एका मोठ्या विक्रमावर असले. जर त्याने कसोटी सामन्यात सहा विकेट्स घेतल्यास तो कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांच्या क्लबमध्ये सामील होईल. जडेजाने ७२ कसोटी सामन्यांमध्ये २९४ विकेट घेतल्या आहेत. ३०० विकेट्स पूर्ण करण्यापासून तो फक्त सहा विकेट्स दूर आहे. आगामी मालिकेत त्याने असे केले तर तो कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, झहीर खान, अश्विन आणि इशांत शर्मा यांच्यानंतरचा सातवा गोलंदाज ठरेल.
कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
1. अनिल कुंबळे : १३२ सामने ६१९ विकेट्स
2. रविचंद्रन अश्विन : १०० सामने ५१६ विकेट्स
3. कपिल देव : १३१ सामने ४३४ विकेट्स
4. हरभजन सिंग : १०३ सामने ४१७ विकेट्स
5. इशांत शर्मा : १०५ सामने ३११ विकेट्स
6. झहीर खान : ९२ सामने ३११ विकेट्स
7. रवींद्र जडेजा : ७२ सामने २९४ विकेट्स

कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण केल्यानंतर, कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा आणि ३०० विकेट्स पूर्ण करणारा जडेजा हा तिसरा भारतीय अष्टपैलू खेळाडू बनेल. साल १९८३ मध्ये भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर १३१ कसोटी सामन्यांमध्ये ४३४ विकेट आणि ५२४८ धावा आहेत. त्याचबरोबर अश्विनने आतापर्यंत ५१६ कसोटी विकेट घेतल्या आहेत. याशिवाय १०० कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ३३०९ धावा आहेत. आता जडेजा त्याची बरोबरी करू शकतो. बांगलादेशविरुद्ध सहा विकेट्स घेता क्षणीच जडेजा ३०० कसोटी बळी घेणारा तिसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरेल. सध्या तो या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे.
२५० हून ​अधिक बळी घेणारे डावखुरे गोलंदाज
रंगना हेरथ (श्रीलंका) : १७० सामने ४३३ विकेट्स
डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड) : १८७ सामने ३६२ विकेट्स
डेरेक अंडरवुड (इंग्लंड) : १५१ सामने २९७ विकेट्स
रवींद्र जडेजा (भारत) : १३६ सामने २९४ विकेट्स
बिशनसिंग बेदी (भारत) : ११८ सामने २६६ विकेट्स
भारताचा संघ:

रोहित शर्मा, यशवी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश संघ:
महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), जाकेर अली, मेहदी हसन मिराज, खालेद अहमद, हसन महमूद, तस्किन अहमद, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा
आजचा सामना
भारत विरुद्ध बांगलादेश
स्थळ : एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
वेळ : सकाळी ९.३० वा.
प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१ एसडी, स्पोर्ट्स १८- १ एचडी, स्पोर्ट्स १८-२ हिंदी, जिओ सिनेमा