भारतीय हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स

अंतिम फेरीत यजमान चीनचा पराभव : जुगराज सिंगचा निर्णायक गोल

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
17th September, 08:49 pm
भारतीय हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स

हुलुनबुर : हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात मंगळवारी (१७ सप्टेंबर) भारतीय संघाचा सामना चीनशी झाला. हा सामना जिंकण्यासाठी भारताला संघर्ष करावा लागला. पण अखेर भारताने १-० असा विजय मिळवला.

भारतीय संघासाठी एकमेव गोल बचावपटू जुगराज सिंगने चौथ्या क्वार्टरच्या १०व्या मिनिटाला केला. याआधीच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली होती. पहिले तीन क्वार्टर एकही गोल न होता ०-० असे बरोबरीत होते. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये जुगराजने मॅचविनिंग गोल करत जेतेपद पटकावले.

पाकिस्तानकडून कोरियाचा ५-२ने पराभव

मंगळवारीच स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि दक्षिण कोरिया यांच्यात लढत झाली. यामध्ये पाकिस्तानी संघाने ५-२ ने शानदार विजय मिळवत तिसरे स्थान मिळविले. या मैदानावर हा सामना फायनलच्या आधी झाला.

कोरियाला नमवत भारत अंतिम फेरीत

हा अंतिम सामना चीनमधील हुलुनबुर येथे झाला. तत्पूर्वी, भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. दुसरे म्हणजे, चीनचा हॉकी संघ प्रथमच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला. पण ते विजेतेपदापासून दूर राहिले.

भारताने सर्वाधिक ५ वेळा जिंकला चषक

भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद इतिहासात सर्वाधिक ५ वेळा (चालू हंगामासह) जिंकले आहे. पुरुष हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला हंगाम २०११ मध्ये खेळला गेला. त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले. यानंतर भारतीय संघाने २०१३, २०१८ आणि २०२३ चे हंगामही जिंकले आहेत. २०१८ मध्ये भारतीय संघ पाकिस्तानसोबत संयुक्त विजेता ठरला होता. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ८ हंगाम (सध्याच्या हंगामासह) झाले आहेत, त्यापैकी भारताने ५ वेळा, पाकिस्तानने ३ वेळा आणि दक्षिण कोरियाने एकदा विजेतेपद पटकावले आहे.