१९ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात : विराट कोहली लंडनहून थेट चेन्नईत दाखल
चेन्नई : बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेटपटू चेन्नईला पोहोचले आहेत. १९ सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे, त्याआधी टीम इंडियाचे सराव शिबिरही येथे होणार आहे. यासाठी रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली हे स्टार खेळाडू चेन्नईला पोहोचले आहेत.
विराट कोहली शुक्रवारी पहाटे ४ वाजता लंडनहून थेट चेन्नईत पोहोचला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि केएल राहुल विमानतळावर टीम बसमध्ये चढताना दिसले. त्याचवेळी विराट कोहली मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत विमानतळाबाहेर येताना दिसला. बीसीसीआयने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून त्यात १६ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानवर ऐतिहासिक २-० असा विजय नोंदवल्यानंतर बांगलादेश या मालिकेत प्रवेश करेल, तर या वर्षाच्या सुरुवातीला मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडला ४-१ ने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच कसोटी सामना आहे.यावर्षी जानेवारीतील दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. मुलगा अकायच्या जन्मामुळे तो इंग्लंडविरुद्ध भारताच्या घरच्या कसोटी मालिकेत खेळला नव्हता. अशा परिस्थितीत आता कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची मोठी संधी असेल. कोहलीचा यंदाचा फॉर्म काही विशेष राहिला नाही. कोहली टी-२० वर्ल्ड कपमध्येही संघर्ष करताना दिसला होता. श्रीलंका दौऱ्यातही त्याची बॅट तळपताना दिसली नव्हती.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही चेन्नईला पोहोचला आहे. रोहित विमानतळावरून बाहेर पडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये कर्णधार विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिसत आहे.
पहिल्या दिवशी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर खेळाडूंशी दीर्घ संवाद साधताना दिसले. मात्र, प्रशिक्षकांच्या ब्रिफिंगनंतर खेळाडूंनी सराव सुरू केला. विशेषत: विराट कोहलीने पहिल्या दिवसापासून फलंदाजीचा सराव सुरू केला.
विराट कोहलीने नेटमध्ये ४५ मि. पर्यंत फलंदाजी केली. यावेळी त्याच्या बॅटमधून उत्कृष्ट फटके निघत होते. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर विराट कोहली लंडनला गेला होता. अशा परिस्थितीत तो आता बांगलादेशसोबतच्या कसोटी सामन्यांसाठी भारतात परतला आहे. विराट कोहली दीर्घ विश्रांतीनंतर ज्या प्रकारे फॉर्ममध्ये दिसत आहे, ती टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे.
जसप्रीत बुमराहशिवाय पहिल्या दिवशी कोणताही वेळ न घालवता सराव करणारा खेळाडू जसप्रीत बुमराह होता. विराटसोबत बुमराहनेही नेटमध्ये खूप घाम गाळला. टी-२० विश्वचषकानंतर बुमराह प्रथमच टीम इंडियासाठी मैदानात उतरणार आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने बुमराहला श्रीलंका दौऱ्यात विश्रांती दिली होती. मात्र, आता तो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी ॲक्शनमध्ये दिसण्यासाठी सज्ज झाला आहे.
मॉर्ने मॉर्केल टीम इंडियात सामील
याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज मॉर्ने मॉर्केलही टीम इंडियात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला आहे. मॉर्केल वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासोबत नव्हता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सूचनेनुसार मॉर्केलची टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मॉर्केलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे गोलंदाज आणखी सुधारतील अशी अपेक्षा आहे.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
बांगलादेशचा कसोटी संघ
नजमुल शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी मिराज, जॅकर अली अनिक, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद.